ज्ञानेश भुरे
देशातील उदयोन्मुख क्रीडापटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणारे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. यंदाच्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पूर्वनियोजित कार्यक्रमापेक्षा सात वर्षे उशिराने होत आहेत. अर्थात यानंतरही स्पर्धेचे महत्त्व कमी होत नाही. खेळाडूंमध्ये आजही तितकेच आकर्षण आहे. त्यांच्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ असते. अशा या स्पर्धेत आतापर्यंत कुणाचे किती वर्चस्व राहिले आणि यंदा कुणाचे राहणार या विषयी केलेले हे विश्लेषण…
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यामागचे उद्दिष्ट काय ?
विविध क्रीडा प्रकारात स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक खेळाडू चमकत असतात. त्यांची जागा घेण्यासाठी दुसरी फळी नेहमीच तयार असते. आपल्या आदर्श खेळाडूच्या पावलावर पाऊल टाकून त्याला पुढे जायचे असते. अशा दुसऱ्या फळीच्या क्रीडा नैपुण्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि नव्या पिढीला ऑलिम्पिक चळवळीची माहिती होण्यासाठी या स्पर्धेची सुरुवात झाली. यंदा या मालिकेतील ही ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला कशी सुरवात झाली?
भारतात १९२०च्या दरम्यान ऑलिम्पिक चळवळीला सुरुवात झाली. भारताने या चळवळीचा एक भाग म्हणून १९२० अँटवर्प ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला. चार वर्षांनी १९२४ मध्ये भारतीय ऑलिंपिक संघटनेची (१९२४) स्थापना झाली. त्याच वर्षी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडीसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हीच पहिली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मानली जाते. अर्थात, भारतीय ऑलिम्पिक स्पर्धा म्हणून ती खेळविली गेली. याच नावाने १९३८पर्यंत स्पर्धा होत राहिल्या. पुढे १९४०पासून १९७९पर्यंत त्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखल्या गेल्या. १९७९पासून या स्पर्धा उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर भरवल्या जाऊ लागल्या.
विश्लेषण : रशियन चित्रपटसृष्टीने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला बॉयकॉट करण्यामागचे कारण काय? जाणून घ्या
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वर्चस्व कोणाचे राहिले आहे ?
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कुणा एका राज्याची मक्तेदारी राहिलेली नाही. पण, बहुतेक स्पर्धेत यजमान राज्याचे वर्चस्व राहिले आहे यात शंका नाही. गेल्या तीन स्पर्धा याला अपवाद ठरतात. क्रीडा मंडळ म्हणून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागास मान्यता मिळालेल्या सेनादलाच्या संघाने गेली तीन वर्षे म्हणजे २००७ (आसाम), २०११ (झारखंड) आणि २०१५ (केरळ) मध्ये विजेतेपद मिळविले आहे. १९८७मध्ये केरळ, १९९४मध्ये महाराष्ट्र, १९९७मध्ये कर्नाटक यांच्याप्रमाणे पुढे मणिपूर, पंजाब, आंध्र प्रदेश या यजमान राज्यांनी विजेतेपद मिळविले आहे.
यजमान राज्यांचे वर्चस्व का राहते?
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नियमाप्रमाणे देशातील आठ अव्वल संघ आणि वैयक्तिक प्रकारात आठ अव्वल खेळाडूंना संधी मिळत असते. यजमान या नात्याने त्या राज्य संघाला स्पर्धेत थेट प्रवेश असतो. त्यामुळे यजमान राज्यातील खेळाडूंवर पात्रतेचे दडपण नसते. त्यापेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे खेळाडूंच्या आहाराचा येथे खूप मोठा परिणाम होत असतो. इतर राज्यांतील खेळाडू एखाद्या राज्यात खेळायला जातात तेव्हा त्यांना तेथील आहार पचतोच असे नाही. त्याच वेळी पात्र खेळाडूंनी कोठून खेळावे यावर बंधन नसते. अनेकदा यजमान राज्य आपल्या उणिवा लक्षात घेऊन अधिक पारितोषिक रक्कम जाहीर करून दुसऱ्या राज्यातील खेळाडू्ंना आकर्षित करतात. अशी अनेक कारणे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमानांचे महत्त्व वाढवतात.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत कुणाचे वर्चस्व राहिले आहे?
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यजमानांच्या यशाला जरा बाजूला केले, तर महाराष्ट्र आणि सेनादल संघांचेच वर्चस्व राहिल्याचे दिसून येते. सेनादलाने सलग तीन वेळा, तर महाराष्ट्राने दोनदा विजेतेपद मिळविले आहे. नवी दिल्ली येथे १९८५मध्ये झालेल्या पहिल्या अधुनिक (ऑलिम्पिक धर्तीवरील) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपद मिळविले.
विश्लेषण: ‘गेम्सक्राफ्ट’ कंपनीला २१ हजार कोटींची GST नोटीस का बजावण्यात आली? कंपनीवर नेमके आरोप काय?
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे महत्त्व काय?
देशात प्रत्येक खेळाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा होतात. पण, या स्पर्धेतील कामगिरीकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. यातील कामगिरीने खेळाडूची ओळख होत नाही. पण, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळाडू जिंकला, त्याने पदक जिंकले की तो घराघरात पोहोचतो. कारण, या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होत असते. जेव्हा स्पर्धा आणि खेळाडू या सर्वसामान्य जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचतात तेव्हा त्या खेळाची आणि खेळाडूची लोकप्रियता अधिक वाढते. हेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे महत्त्व आहे. त्यामुळे या स्पर्धा आयोजनात सातत्य असण्याची आवश्यकता आहे. हे सातत्य टिकले तर खेळाडूंमध्ये उत्साह राहील आणि खाजगी कंपन्यादेखील प्रायोजक म्हणून पुढे येऊ शकतील.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कुठल्या खेळांचा समावेश असतो?
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या पूर्णपणे ऑलिम्पिक चळवळीचा एक भाग असतात. त्यामुळे ऑलिम्पिक पात्र खेळांचा या स्पर्धेत समावेश असतो. त्याचबरोबर यजमान राज्यांना त्यांच्या पसंतीचाही खेळ खेळविण्याची मान्यता असते. अर्थात, या सगळ्यावर एक बैठक होते आणि त्यात खेळांची संख्या निश्चित केली जाते. या बैठकीत मान्यता मिळालेल्या सर्व खेळांना संधी मिळते. यजमान राज्ये आपली ताकद लक्षात घेऊन काही खेळांच्या सहभागासाठी आग्रह धरतात. त्यावर बैठकीत विचार करून निर्णय घेतला जातो.
विश्लेषण : केनियाचा किपचोगे कशा प्रकारे ठरतो मॅरेथॉन शर्यतींचा बादशहा?
या वर्षी नवीन काय?
यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत लडाख, दादरा आणि नगर हवेली, दीव आणि दमण हे केंद्रशासित प्रदेशांचे संघ प्रथमच सहभाग घेतील. त्याचवेळी बोडोलॅंडला अटींवर यंदा सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. समाविष्ट क्रीडा प्रकारांचा विचार केल्यास या वेळी ३५ क्रीडा प्रकारांत स्पर्धा होणार आहेत. या वेळी हॅंडबॉलला अगदी ऐनवेळी संघटनात्मक वादामुळे स्पर्धेतून वगळण्यात आले. मल्लखांब आणि योगासन या खेळांचे या वर्षी पदार्पण होईल.