थायलंडचे पंतप्रधान स्रेथा थविसिन यांना तेथील न्यायालयाने राज्यघटनेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पदावरून हटवण्याचा आदेश दिल्यानंतर तिथे सत्ताबदल झाला आहे. माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची ३७ वर्षीय कन्या पेतोंगतार्न शिनावात्रा या नुकत्याच पंतप्रधान झाल्या आहेत. त्यांच्या राजकारणातील उदयाकडे कसे पाहिले जाते हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थायलंडमध्ये राजकीय उलथापालथ

मावळते पंतप्रधान स्रेथा थविसिन यांना राज्यघटनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तेथील कॉन्स्टिट्यूशनल कोर्टाने मागील आठवड्यात दोषी ठरवले. त्यानंतर तेथे नवीन पंतप्रधान निवडण्याची गरज निर्माण झाली होती. माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची कन्या पेतोंगतार्न शिनावात्रा यांच्याकडे पुढील वारसदार म्हणून पाहिले गेले आणि त्यांची निवडही झाली. शिनावात्रा या मध्यम-उजव्या फेउ थाई पक्षाच्या सदस्य आहेत. मागील वर्षी झालेल्या पार्लमेंटरी निवडणुकीत फेउ थाई पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता आणि मूव्ह फॉरवर्ड पार्टी (एमएफपी) सर्वाधिक जागा मिळवून पंतप्रधानपदासाठी आघाडीवर होता. मात्र, फेउ थाईचे नेते आणि पेतोंगतार्न यांचे पिता, माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांनी राजकीय जुळवाजुळव केली आणि त्यानंतर फेउ थाईच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर आली. स्रेथा थविसिन हे पंतप्रधान झाले आणि वर्षभरातच शिक्षा भोगलेल्या वकिलाला मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतल्याच्या कारणावरून पदच्युतही झाले. त्यानंतर पार्लमेंटने शिनावात्रा यांची पंतप्रधानपदी निवड मान्य केली. त्या थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

हेही वाचा – ‘या’ राज्यात ६९ हजार सहायक शिक्षकांची नव्याने भरती? नेमके प्रकरण काय?

पेतोंगतार्न यांची राजकीय पार्श्वभूमी

शिनावात्रा घराण्याने गेल्या काही वर्षांमध्ये थायलंडच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. थाकसिन शिनावात्रा हे २००१ ते २००६ या कालावधीत पंतप्रधान होते. पाच वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या भगिनी यिंगलक या २०११ ते २०१४दरम्यान पंतप्रधान झाल्या. दोन्ही भावंडांना लष्करी बंडामध्ये पद सोडावे लागले. ७५ वर्षीय थाकसिन राजकारणात येण्यापूर्वी पोलिसात होते. अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये त्यांनी व्यवसाय उभारले होते. गरीब व ग्रामीण जनतेसाठी कल्याणकारी धोरणे त्यांनी राबवली. त्याचवेळी, कदाचित राजकारणाचा भाग म्हणून, ते समाजाच्या अभिजन व लब्धप्रतिष्ठित व्यक्तींबद्दल तिटकारा असल्याचे दाखवत. मात्र २००६मध्ये, त्यांच्यावर व्यवसायांवर कर न भरल्याचे आरोप झाले. त्यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आणि त्यांना लष्करी बंडाद्वारे पदच्युत करण्यात आले. सत्ता गेल्यानंतरही थाकसिन हे थायलंडच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात.

पेतोंगतार्न यांच्यापुढील आव्हाने

पेतोंगतार्न या तीनच वर्षांपूर्वी राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी ब्रिटनमध्ये हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले असून राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या थाकसिन यांच्या रेंड हॉटेल समूहाचा कारभार सांभाळत होत्या. बीबीसीने प्रकाशित केलेल्या प्रोफाइलनुसार, पेतोंगतार्न यांनी स्वतःचे वर्णन कनवाळू भांडवलदार, सामाजिक उदारमतवादी असे केले आहे. मात्र, त्यांचे व्यक्तिमत्त्व शिनावात्रा कुटुंबापेक्षा फार काही वेगळे नाही असे तेथील राजकीय निरीक्षक सांगतात. तेथील अर्थव्यवस्था आणि दुभंगलेला समाज ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. त्यासाठी आर्थिक आणि राजकीय या दोन्ही प्रकारच्या सुधारणा हाती घेणे याला त्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्या आपल्यासमोरील आव्हानांचा कसा सामना करतात त्यावर एक वर्ग लक्ष ठेवून असणार आहे.

अर्थव्यवस्था सावरण्याचे आव्हान

निक्केई एशियाच्या अहवालानुसार, थायलंडमध्ये २०१४च्या सत्तापालटानंतर तेथील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर दरवर्षी १ ते ४ टक्के इतकाच राहिला आहे. त्याच्या तुलनेत संपूर्ण आग्नेय आशियामधील देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सुमारे ५ टक्के इतका आहे. एकेकाळी स्वस्त मजूर आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक यामुळे थायलंडची अर्थव्यवस्था वेगाने वाढली होती. पण व्हिएतनाम आणि अन्य शेजारी देशांनी आपापला औद्योगिक विकास साधण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. त्याचा थायलंडला तोटा होत आहे. थायलंडवरील कर्ज कमी करण्याचेही आव्हान शिनावात्रा यांच्यासमोर असेल.

हेही वाचा – Kolkata Doctor Rape and Murder : भारतातील डॉक्टरांना केंद्रीय संरक्षण कायद्याची गरज का आहे?

पुढे काय?

पेतोंगतार्न या आपल्या वडिलांच्या छायेतून कितपत बाहेर पडू शकतील याबद्दल निरीक्षकांना शंका आहे. एक तर त्यांच्याकडे अनुभव नाही आणि दुसरे म्हणजे त्यांचे वडील थाकसिन महत्त्वाकांक्षी आहेत. ते गेल्याच वर्षी प्रतिस्पर्ध्यांशी जुळवून घेऊन १५ वर्षांच्या विजनवासानंतर मायदेशी परतले आहेत. यापुढेही थायलंडच्या राजकारणावर आपली सत्ता कायम राखण्यात त्यांना रस असेल. कदाचित पेतोंगतार्न या वडिलांच्या सांगण्यानुसारच धोरणे राबवतील आणि त्यानुसार राजकीय पावले उचलतील असे मानले जात आहे.

nima.patil@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 37 year old young woman as pm of thailand who is paetongtarn shinawatra what challenges do they face print exp ssb