3,800-year-old pyramid: पूर्व कझाकिस्तानमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी एक गोंधळात टाकणारी रचना शोधली आहे. या शोधामुळे जागतिक स्तरावर अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ३,८०० वर्षे जुनी असलेली ही रचना षटकोनी आहे. अभ्यासकांनी या रचनेची ओळख पिरॅमिड म्हणून केली आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हे स्मारक सुमारे १० फूट (३ मीटर) उंच आहे. त्यामुळे या रचनेमागे काही विशेष उद्देश असू शकतो. अशा प्रकारची भूमितीय रचना या पूर्वी या प्रदेशात आढळलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीन ओळख शोधणे

एल. एन. गुमिल्येव युरेशियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ उलान उमितकालियेव यांच्या नेतृत्त्वाखाली २०१४ साली टोकतामिस गावाजवळील किरीकुंगिर स्थळावर संशोधनास सुरुवात झाली होती. या स्थळावर सुरु असलेल्या संशोधनात एक आगळी वेगळी रचना उघडकीस आली. हा पिरॅमिड षटकोनी आहे. त्याची प्रत्येक बाजू ४३ फूट लांब आहे, असे उमितकालियेव यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. एकूणच आशियातील कांस्ययुगीन संस्कृतींचा मागोवा घेताना या रचनेची मदत होणार आहे. मोठ्या सामूहिक रचनांची योजना करताना बांधकाम करणाऱ्यांनी अनेकदा कला आणि खगोलशास्त्र यांचा संगम साधलेला दिसतो. या भागातील काही समूहांमध्ये आपल्या गटातील महत्त्वाच्या सदस्यांना मान देण्यासाठी दफन केल्यानंतर त्यावर मातीच्या ढिगाऱ्याच्या मदतीने स्मारक उभारण्याची परंपरा होती. या मातीच्या थरांमुळे खाली दफन केलेल्या नाजूक वस्तू जपल्या गेल्या.

संस्कृती आणि कारागिरीचे थर

या ठिकाणी केलेल्या संशोधनात संशोधकांना घोड्यांची हाडे आणि सुंदर मृद्भांडे सापडले आहे. यावरून स्थानिक लोक त्यांच्या परंपरांमध्ये प्राण्यांना मान देत होते, असे आढळून आले आहे. या स्थळावर सोन्याची कुंडलं देखील सापडली आहेत. यावरून याकाळात याभागात लोकांनी धातुकामात तज्ज्ञता मिळवल्याचे दिसते. या ठिकाणाचा संबंध तज्ज्ञांनी अँड्रोनोव्हो समुदायांशी जोडला आहे. हा समुदाय सुमारे इ.स.पू. २००० ते ९०० दरम्यान मध्य आशियाच्या भागात विकसित झाला होता. या समुहाला घोडे पाळण्यासाठी आणि प्रगत कौशल्याने दगडी रचना उभारण्यासाठी ओळखले जात असे.

प्राण्यांना महत्त्व देणारी संस्कृती

या पिरॅमिडच्या बाह्य भिंतींसाठी मोठ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. तर आतील भागात अनेक वर्तुळाकार रचना दिसतात. आधी म्हटल्याप्रमाणे या रचनेतील भिंती ४२ फूट (१३ मीटर) लांब आहेत, तर त्यावर पूर्वी मातीचे आच्छादन असण्याची शक्यता होती. आता मात्र छताकडचा भाग मोकळा आहे. या स्थळावर सापडलेल्या पुरावशेषांच्या माध्यमातून ही पशुपालकांची संस्कृती असल्याचे दिसते. या स्थळावर सापडलेल्या वस्तूंवरून लक्षात येते की, व्यापाऱ्याच्या माध्यमातून अनेक वस्तूंची देवाणघेवाण झाली होती. एकूणच पाळीव प्राणी ही या समाजाची संपत्ती होती. या स्थळावर सापडलेली घोड्यांची हाडं या समुदायासाठी घोड्याचे असलेलं महत्त्व विशद करतात. कदाचित घोड्यांचा वापर हा धार्मिक विधींसाठी देखील केला जात असावा अशी शक्यता पुरातत्त्व अभ्यासक व्यक्त करतात.

विस्तृत कांस्ययुगीन जाळ्याचा पुरावा

या भागातील जुन्या स्मारकांमधून व्यापारी मार्गांवर आकार घेतलेल्या संस्कृती दिसतात. या व्यापारी मार्गांनी स्टेपेतील भाषांचा आणि श्रद्धांचा प्रसार होण्यास मदत केली. प्राचीन प्रवाशांनी या खुल्या गवताळ प्रदेशांमधून जाताना फक्त मौल्यवान वस्तूच नव्हे तर कल्पना, कारागिरीचे कौशल्य आणि विविध परंपरा देखील बरोबर नेल्या. त्यांनी या मार्गावरच्या समाजांना आकार दिला. ऐतिहासिक नोंदी दर्शवतात की, पाळीव घोड्यांनी या प्रदेशांमध्ये हालचालीत मोठा बदल केला.

घोड्यांमुळे संस्कृतींचे वहन

विद्वानांचे असे मत आहे की, घोड्यांच्या संस्कृतीने समाजांना लांब अंतरावर संपर्क साधण्यास मदत केली. त्यामुळे विणकाम, मातीचे भांडे आणि धातू वितळवण्याच्या प्रक्रियेत प्रगती झाली. हा प्रभाव कदाचित या षटकोनी पिरॅमिडच्या रचनेवरही झाला असेल असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. या रचनेत असलेले काही आकार आणि भिंतीवरील चिन्हांचा संबंध धार्मिक विधींशी असू शकतो. कांस्ययुगीन समाजांनी सामूहिक भेटीच्या जागांना किती महत्त्व दिले हे या संशोधनातून कळते. अफगाणिस्तानपासून कॅस्पियन समुद्रापर्यंत झालेल्या उत्खननांमध्ये अंत्यसंस्काराच्या पद्धतींमध्ये समानता आढळते. कबरींमध्ये अनेकदा वैयक्तिक अलंकार, साधने आणि जेवणाच्या अवशेषांचा समावेश असायचा. त्यातूनच मृत व्यक्तीच्या सामाजिक दर्जाचा पुरावा मिळत असे.

पिरॅमिडबद्दल नवीन दृष्टीकोन

या स्थळावरील अभ्यासामुळे इतिहासकारांमध्ये मोठी उत्सुकता वाढली आहे. कांस्ययुगीन समाजांनी आपला दर्जा कसा व्यक्त केला, हे शोधण्यासाठी हा अभ्यास सुरु आहे. मध्य आशियातील कांस्ययुगीन स्थळं जागतिक स्तरावर फारशी चर्चेत नव्हती. त्यामुळेच अभ्यासक किरीकुंगिरच्या स्थापत्य रचनेची इतर भव्य संकुलांशी तुलना करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे काही समानता आढळू शकते अशी आशा आहे. अनेक लोक या षटकोनी पिरॅमिडच्या कोड्याने प्रभावित झाले आहेत. हे एका खास व्यक्तीचे विश्रांतीस्थान असावे, असाही कयास व्यक्त केला जात आहे. अशा वास्तूंचा अभ्यास करून लोकांनी आध्यात्मिक श्रद्धा आणि परंपरा कशा एकत्र केल्या हे भविष्यात समजू शकेल अशी संशोधकांना आशा आहे.