एकीकडे भारतातील काही उद्योजक कर्मचाऱ्यांनी ९० तासांपेक्षा अधिक काम केले पाहिजे, असे विधान करतात, तर दुसरीकडे ब्रिटनमधील २०० कंपन्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आठवड्यातून चार दिवसांचे काम आणि तीन दिवस सुट्टी ही योजना राबवत आहेत. चार दिवसांच्या आठवड्याने कर्मचाऱ्यांना अधिक आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळेल, अशी भूमिका या कंपन्यांच्या व्यवस्थापनाने घेतली आहे. ब्रिटनमधील कंपन्यांनी राबवलेल्या चार दिवसांच्या आठवड्याच्या योजनेविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनमधील कंपन्यांची भूमिका काय?

कर्मचाऱ्यांच्या हितासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये चार दिवसांचा आठवडा ही मोहीम राबवण्यात आली आहे. चार दिवसांचे काम आणि तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी अशी योजना कंपन्यांकडून राबवण्यात येत आहे. आता ब्रिटनमध्येही ही योजना राबवण्यात आली आहे. या देशातील २०० पेक्षा अधिक कंपन्यांनी आता त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही पगाराची हानी न करता कायमस्वरूपी चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याची योजना राबवली आहे. ‘फोर डे वीक फाउंडेशन’चा हवाला देत ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार विविध क्षेत्रांतील पाच हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

कोणत्या कंपन्यांनी योजना स्वीकारली?

चार दिवसांचा आठवडा स्वीकारलेल्या २०० कंपन्यांपैकी ३० कंपन्या विपणन, जाहिरात आणि प्रसारमाध्यमे क्षेत्रांतील आहेत. नवीन योजना फायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी ती स्वीकारली आहे. धर्मादाय, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि सामाजिक सेवा उद्योगातील २९ संस्था आहेत, तर तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील २४ आणि व्यवसाय, सल्लागार आणि व्यवस्थापन क्षेत्रातील २२ कंपन्या आहेत, ज्यांनी चार दिवसांचा आठवडा या योजनेला मान्यता दिली आहे. या कंपन्यांमधील पाच हजारांपेक्षा अधिक कर्मचारी या योजनेचा लाभ घेणार आहेत. 

या योजनेचा फायदा काय?

‘फोर डे वीक फाउंडेशन’ या संस्थेने ही योजना राबवण्यासाठी कंपन्यांशी चर्चा केली आणि त्यांना या योजनेचे महत्त्व पटवून दिले. संस्थेचे मोहीम संचालक जो रायल यांनी याबाबत सांगितले की पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचे प्रारूप आता कालबाह्य झाले आहे. भविष्यात ते राबविणे अयोग्य ठरणार आहे. दिवसा ९ ते ५ काम आणि पाच दिवसांचा कामाचा आठवडा हे प्रारूप राबवून आता १०० पेक्षा अधिक वर्षे झाली असून कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन प्रारूप राबविणे गरजे आहे. चार दिवसांचा आठवडा कर्मचाऱ्यांना ५० टक्क्यांहून अधिक मोकळा वेळ देईल आणि त्यांना अधिक आनंदी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देईल, असे जो रायल यांनी सांगितले. त्यांच्या मते, कामाचे चार आठवडे आणि वेतनात कोणतीही कपात न करणे हे कर्मचारी आणि कंपन्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यास आणि कमी तासांसाठी समान आऊटपुट तयार करून उत्पादकता सुधारण्यास मदत होईल, असे कर्मचारी तज्ज्ञांनी सांगितले. 

ब्रिटनमध्ये ही योजना कशी राबविली गेली?

करोनाकाळात घरून काम करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी पारंपरिक काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची मागणी केली. अधिकाधिक वेळ कुटुंबासाठी घालविण्यासाठी कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यातून जगभरातील अनेक देशांमध्ये चार दिवसांच्या कामकाजाचा आठवडा ही योजना राबवण्यात आली. २०२२ मध्ये ब्रिटनमध्ये चार दिवसांचा आठवडा मोहीम ही एक पायलट योजना होती, ज्यामध्ये ७० कंपन्यांचा समावेश होता. केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ, बोस्टन महाविद्यालय आणि इतर संस्थांतील तज्ज्ञांनी ही योजना अभ्यासल्यानंतर चार दिवसांच्या आठवड्याला मान्यता देण्यात आली. तज्ज्ञांनी या योजनेची चाचणी करताना ८८ टक्के कंपन्यांनी सांगितले की, चार दिवसांच्या आठवड्यामुळे कर्मचारी चांगले काम करत आहेत, तर ९५ टक्के कंपन्यांनी उत्पादकतेवर होणाऱ्या परिणामाबद्दल सांगितले. एकूण कंपन्यांना ही योजना आवडली आणि त्यांनी ती राबवण्याचा निर्णय घेतला. 

कोणत्या देशांमध्ये चार दिवसांचा आठवडा?

जगभरातील अनेक देशांमध्ये चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा ही योजना राबविण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये २६ कंपन्यांनी चाचणी स्वरूपात ही योजना राबविली आहे. बेल्जियममध्ये चार दिवसांचा आठवडा ही योजना राबविताना कामाचे तास मात्र वाढविण्यात आले आहेत. म्हणजे चार दिवस कर्मचाऱ्यांना आठ तासांऐवजी १० तास काम करावे लागत आहेत. युरोपमधील अनेक देशांमध्ये चार दिवसांच्या आठवड्याला मान्यता देण्यात आली आहे. जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, आयर्लंड, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्तुगाल, स्कॉटलंड, स्पेन, स्वीडन या देशांमधील काही कंपन्यांनी चार दिवसांच्या कामकाजाचा आठवडा ही योजना राबविली आहे. संयुक्त अरब अमिराती या देशाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारी अर्धदिवसाची सुट्टी दिली असून साडेचार दिवसांचा आठवडा ही योजना राबविली. अमेरिका, ब्राझील, कॅनडामधील काही कंपन्यांनी चाचणी स्वरूपात ही योजना राबविली आहे.  

sandeep.nalawade@expressindia.com