पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२७ ऑक्टोबर) त्यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमात ऑनलाइन फसवणुकीच्या धोक्यावर प्रकाश टाकला. सरकारी आकडेवारीनुसार २०२४ च्या पहिल्या तिमाहीत भारतीयांनी ‘डिजिटल अरेस्ट’ या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारामुळे भारतीय नागरिकांनी १२०.३० कोटी रुपये गमावले. भारतीय सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटरद्वारे केंद्रीय स्तरावर सायबर गुन्ह्यांचे निरीक्षण करणाऱ्या गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतीयांना लक्ष्य करण्यात आलेल्या चार प्रमुख ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांपैकी ‘डिजिटल अरेस्ट’ हा एक आहे. डिजिटल अरेस्टसह ट्रेडिंग घोटाळे, गुंतवणूक घोटाळे व रोमान्स/डेटिंग घोटाळ्यांचाही यात समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले, “आम्हाला असे आढळून आले की, भारतीयांनी डिजिटल अरेस्ट घोटाळ्यामुळे १२०.३० कोटी रुपये, ट्रेडिंग घोटाळ्यात १,४२०.४८ कोटी रुपये, गुंतवणूक घोटाळ्यात २२२.५८ कोटी रुपये व रोमान्स/डेटिंग घोटाळ्यात १३.२३ कोटी रुपये गमावले आहेत.” हा जानेवारी ते एप्रिलदरम्यानचा डेटा आहे. काय आहेत हे घोटाळे? भारतीयांची कशी फसवणूक केली जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा : ‘Aadhar Card’ला जन्म तारखेचा पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कारण काय? कोणती कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार?

ट्रेडिंग घोटाळा

भारतात आर्थिक फसवणुकीसाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढत आहे. घोटाळेबाज प्रसिद्ध ब्रॅण्ड व व्यावसायिक असल्याचे भासवून बनावट गुंतवणूक ग्रुप तयार करतात आणि स्टॉक व ट्रेडिंग कोर्स ऑफर करतात. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या मते, स्कॅमर प्रतिष्ठित फंड हाऊसचे प्रतिनिधी म्हणून व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना ग्रुपचे आमंत्रण पाठवितात. हा घोटाळा एक प्रकारे होत नाही, तर अनेक टप्प्यांमध्ये होतो. घोटाळेबाज एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करून आधी गुंतवणूक ग्रुपमध्ये जोडतात. एका ग्रुपमध्ये ती व्यक्ती जोडली गेल्यानंतर असे अनेक ग्रुप तयार केले जातात आणि त्यात प्रसिद्ध गुंतवणूकदारांच्या प्रोफाइल शेअर केल्या जातात. त्यात स्टॉक व गुंतवणुकीविषयीचे सल्ले दिले जातात आणि सक्रिय सदस्यांना त्यात गुंतवले जाते.

भारतात आर्थिक फसवणुकीसाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

यापैकी कोणतेही ॲप शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे नोंदणीकृत नसते; परंतु पीडितांना याची माहिती नसते. विश्वासार्हता मिळविण्यासाठी यात मेसेजेसही पाठविले जातात; ज्यामुळे समोरची व्यक्ती खरी असल्याचा समज निर्माण होतो. पीडितांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात आणि गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. एकदा पैसे मिळाल्यानंतर घोटाळे करणारे गायब होतात.

डिजिटल अरेस्ट

सायबर गुन्हेगार संभाव्य पीडितांना कॉल करतात आणि सांगतात की, त्यांना बेकायदा वस्तू, ड्रग्ज, बनावट पासपोर्ट आदी अवैध वस्तूंचे कुरिअर पाठविण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये फसवणूककर्ते एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईक किंवा मित्रांशी संपर्क साधतात आणि त्यांना सांगतात की, तुमचा मित्र, भाऊ किंवा बहीण एखाद्या गुन्ह्यात किंवा अपघातात सामील असल्याचे आढळले आहे आणि ते आमच्या ताब्यात आहेत. लोकांना खरे वाटावे यासाठी पोलिसांच्या छायाचित्रांचा आणि ओळखपत्रांचादेखील वापर केला जातो. त्यानंतर खटला बंद करण्यासाठी नातेवाईक किंवा पीडितांकडून पैशांची मागणी केली जाते.

काही प्रकरणांमध्ये पीडितांना स्काईप कॉलवरदेखील जोडले जाते. त्यासाठी सायबर गुन्हेगार पोलिस ठाणे किंवा सरकारी कार्यालयांसारखे दिसणारे स्टुडिओ तयार करतात आणि तेथे पोलिसांचे गणवेश घालून असतात. जोपर्यंत त्यांना पैसे पाठवले जात नाहीत, तोपर्यंत ते तुम्हाला कॉलच्या बाहेर पडण्याची परवानगी देत नाहीत. यात कायद्याचा धाक दाखवून तुम्हाला अडकवून ठेवले जाते.

डेटिंग घोटाळ्यात पीडित पुरुषांना विदेशी स्त्रियांद्वारे नातेसंबंध किंवा लग्नाचे आमिष दाखविले जाते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

गुंतवणूक घोटाळा (कार्य-आधारित)

पीडितांना सामान्यत: एखाद्या कंपनीच्या प्रतिनिधीच्या मालकीच्या परदेशी नंबरवरून एक व्हाट्सॲप संदेश प्राप्त होतो; ज्यामध्ये घरून काम करणार्‍यांना ३० हजार रुपये मिळण्याची ऑफर दिली जाते. पीडितांना पंचतारांकित रेटिंग देऊन, काही संस्थांचे सोशल मीडिया रेटिंग वाढविण्यास सांगितले जाते. काम पूर्ण झाल्यानंतर पीडितांना एक कोड प्राप्त होतो, जो त्यांना टेलीग्रामवर त्यांच्या प्रशासकाला देण्यास सांगितले जाते. प्रशासक पीडितांना त्यांचे पैसे कोठे पाठवायचे आहेत ते विचारतात आणि एक छोटी रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाते. या टप्प्यावर पीडिताला प्री-पेड किंवा व्यापारी कार्यात सहभागी होण्यास सांगितले जाते; ज्यामध्ये विशिष्ट रकमेनंतर जास्त परतावा देण्याचे वचन दिले जाते. गुंतवणुकीची रक्कम १५०० ते एक लाखांपर्यंत असू शकते. जे पीडित असे करण्यास नकार देतात, त्यांना अवरोधित केले जाते. ज्यांनी होकार दिला त्यांना सांगितले गेले की, पैसे आणि नफा एका दिवसात त्यांच्याकडे येईल. परंतु, दुसऱ्या दिवशी पीडितांना सांगितले जाते की, त्यांचे कार्य चांगले नव्हते आणि त्यांना पैसे देण्यास नकार दिला जातो.

हेही वाचा : Laxmi Vilas Palace: मराठी राजाने बांधलेला जगातील सर्वात मोठा राजवाडा गुजरातमध्ये; जाणून घ्या इतिहास

रोमान्स/डेटिंग घोटाळा

डेटिंग घोटाळ्यात पीडित पुरुषांना विदेशी स्त्रियांद्वारे नातेसंबंध किंवा लग्नाचे आमिष दाखविले जाते. या स्त्रिया नातेसंबंध किंवा लग्नाचा प्रस्ताव ठेवतात आणि नंतर वैयक्तिकरीत्या भेटण्याची योजना आखतात. परंतु, पीडिताला त्याच स्त्रीकडून कॉल येतो आणि सांगितले जाते की, तिला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे आणि तिला बाहेर पडण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. हे ठग बहुतेक डेटिंग आणि सोशल मीडिया साइट्सवर असतात आणि पीडिताचा विश्वास पटकन मिळविण्याचा प्रयत्न करतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 online scams targeted towards indians in recent months rac