२०२४ मध्ये एकापाठोपाठ एक येणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांनी नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. हे वर्ष संपत आले असले तरी फसव्या बॉम्बच्या धमक्या अजूनही सुरूच आहेत. सोमवारी (९ डिसेंबर) सकाळी दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांसह दिल्ली पोलिस आणि बॉम्ब निकामी पथक (बीडीएस) आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल आणि पश्चिम विहारमधील जीडी गोएंका येथे पोहोचले. परंतु, त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही आणि अधिकाऱ्यांनी या धमक्या फसव्या असल्याचे मानले. शाळांना येणाऱ्या धमक्यांचे नेमके प्रकरण काय? शैक्षणिक संस्थांना येणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांमध्ये वाढ झाली आहे का? त्यामागील कारणं काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
दिल्लीच्या शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या
दिल्लीतील एकूण ४४ शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. आरके पुरममधील डीपीएस, पश्चिम विहारमधील जीडी गोएंका, मयूर विहारमधील मदर मेरी स्कूल, चाणक्यपुरीतील ब्रिटीश स्कूल, मयूर विहारमधील सलवान पब्लिक स्कूल, मंडी हाऊसमधील मॉडर्न स्कूल, केंब्रिज स्कूल, पितमपुरामधील ब्रिलियंट्स कॉन्व्हेंट स्कूल, वसंत कुंजमधील दिल्ली पब्लिक स्कूल इत्यादी शाळांचा समावेश आहे. “बॉम्ब लहान आहेत आणि योग्यरित्या लपविलेले आहेत,” असे ईमेल शाळांना मिळाले. बॉम्ब निकामी करण्यासाठी ईमेल पाठवणाऱ्याने ३० हजार डॉलर्स मागितले. “त्याचा स्फोट झाल्यास इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही, परंतु बॉम्बचा स्फोट झाल्यावर बरेच लोक जखमी होतील,” असे इमेलमध्ये लिहिण्यात आले होते. शाळेच्या बसेस येत होत्या, पालक त्यांच्या मुलांना शाळेत सोडत होते आणि कर्मचारी सकाळच्या वर्गासाठी तयारी करत होते, अशा व्यस्त वेळेत ही धमकी आली. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना तात्काळ घरी परत पाठवले.
हेही वाचा : ‘Uber’ने आता बोटसुद्धा बुक करता येणार; उबरने सुरू केलेली नवीन सेवा काय आहे?
दिल्ली अग्निशमन विभागाला सकाळी ६.१५ वाजता जीडी गोएंका स्कूलमधून पहिला कॉल आला आणि त्यानंतर डीपीएस आरके पुरमचा दुसरा कॉल सकाळी ७.०६ वाजता आला. स्थानिक पोलिस, बॉम्ब शोधक पथके आणि श्वान पथकासह शाळांमध्ये पोहोचलेल्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी शोध घेतला. एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत दोन्ही शाळांमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. दिल्ली पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत आणि आयपी ॲड्रेस शोधत आहेत. दुसरीकडे लखनौ, उत्तर प्रदेश, दिल्लीच्या शेजारी तीन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बचा इशारादेखील फसवा असल्याचे सिद्ध झाले, असे ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले. शनिवारी रात्री एका अज्ञात कॉलरने उत्तर प्रदेश पोलिसांच्या एकात्मिक आपत्कालीन प्रतिसाद लाईनवर ११२ वर कॉल केला आणि आलमबाग बस थांबा, चारबाग रेल्वेस्थानक आणि हुसेनगंज मेट्रो स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. कॉलनंतर तिन्ही ठिकाणी सर्वसमावेशक तपासणी करण्यात आली.
शैक्षणिक संस्थांना बॉम्बस्फोटाच्या धमक्यांमध्ये वाढ
४० हून अधिक शाळांना आलेल्या या धमक्यांच्या एक आठवड्या आधी रोहिणीच्या व्यंकटेश्वर ग्लोबल स्कूलला बॉम्बची धमकी मिळाली, जी नंतर फसवी असल्याचे कळले. ऑक्टोबरमध्ये दिल्लीतील दोन आणि हैदराबादमधील एकासह देशभरातील अनेक सीआरपीएफ शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर देशातील सर्व संलग्न शाळांना सतर्क करण्यात आले होते. मात्र, या धमक्या फसव्या असल्याचे निष्पन्न झाले. २० ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या रोहिणी भागातील एका सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ जोरदार स्फोट झाला. इमारतीच्या भिंतीचे नुकसान झाले आणि आसपासच्या व्यवसायांचे आणि कारचेही नुकसान झाले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. खलिस्तान समर्थक गटाने टेलिग्रामवर स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
मदुराईच्या तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या; ज्यानंतर विद्यार्थ्यांना घरी पाठवावे लागले. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ग्रेटर कैलास-१ येथील कैलास कॉलनीतील समर फील्ड स्कूलला शाळा उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला. शाळेचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. मे महिन्यात बॉम्बची धमकी दिल्यानंतर दिल्ली-एनसीआरच्या ६० हून अधिक शाळा रिकाम्या करण्यात आल्याने अनेक जण घाबरले होते. ९ एप्रिलच्या सुरुवातीला कोलकाता आणि आसपासच्या भागातील जवळपास २०० सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा इशारा देणारे ईमेल आले, असे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात सांगण्यात आले.
फसव्या बॉम्बच्या धमक्यांचे प्रमाण वाढले
अलीकडच्या काही महिन्यांत असंख्य भारतीय हॉटेल्स, रेल्वेस्थानके आणि विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत, त्या सर्व फसव्या असल्याचे सिद्ध झाले आहे. नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान सांगितले की, विमान कंपन्यांना फसव्या धमकीच्या कॉलची संख्या २०२३ मध्ये १२२ होती, जी २०२४ पर्यंत ९९९ पर्यंत वाढली आहे. या वर्षी सर्वात जास्त बॉम्बच्या धमक्या ऑक्टोबरमध्ये (६६६) विमान कंपन्यांना मिळाल्या होत्या, त्यानंतर जूनमध्ये १२२ धमक्या मिळाल्या होत्या. गेल्या वर्षी सर्वाधिक धमकीचे कॉल २०२३ च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आले होते, ज्याची संख्या केवळ १५ होती. मुरलीधर मोहोळ यांच्या मते पोलिसांना या धमक्यांबद्दल २५६ अहवाल प्राप्त झाले आहेत आणि १२ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. फसव्या धमक्यांच्या वाढीमुळे एअरलाइन्सचे वेळापत्रक गंभीरपणे विस्कळीत झाले आणि सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला.
अलीकडच्या काही दिवसांत ताजमहालमध्ये बॉम्ब असण्याची आणि इतरही काही ठिकाणी बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई पोलिसांना पाठवलेल्या धमकीच्या मेलचे कथित लक्ष्य होते. ट्रॅफिक पोलिस हेल्पलाइनवर शनिवारी पाठवण्यात आलेल्या व्हॉट्सॲप संदेशात दोन आयएसआय एजंट आणि पंतप्रधान मोदींविरोधात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिस आणि शहर सरकारला नोव्हेंबरमध्ये या प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) तयार करण्याचे आदेश दिले आहेत.