पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला यावर्षी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. खलिस्तान या वेगळ्या राष्ट्राची मागणी करणारे शीख अतिरेकी सुवर्ण मंदिरामध्ये तळ ठोकून बसले होते. या शीख अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई जून १९८४ मध्ये सुरू करण्यात आली होती. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनदरम्यान शेकडो सामान्य नागरिकांचा तसेच ८७ भारतीय जवानांचाही मृत्यू झाला होता. सुवर्ण मंदिर हे शिखांचे पवित्र धर्मस्थळ मानले जाते. या कारवाईमुळे या सुवर्ण मंदिराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, हे ऑपरेशन का करावे लागले आणि पुढे त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम झाले याचा आढावा घेणे गरजेचे ठरते.

ब्लू स्टार ऑपरेशन का करावे लागले?

‘बिझनेस स्टँडर्ड’ने दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य प्राप्तीवेळी झालेल्या फाळणीदरम्यानच वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ‘खलिस्तान’ या नावाने शिखांनाही वेगळा देश मिळायला हवा, अशी मागणी कालांतराने जोर धरू लागली. कारण या फाळणीमुळे पंजाब प्रांतही दोन्ही देशांमध्ये विभागला गेला. यामुळे शीख समाजाची महत्त्वाची पवित्र धर्मस्थळे आणि ठिकाणे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये गेली. तसेच नदीच्या पाण्याच्या विभागणीवरूनही बरेच वादविवाद होऊ लागले. या सगळ्याची परिणिती म्हणून शिखांना वेगळे राष्ट्रच मिळायला हवे, ही मागणी पंजाब राज्यातील शिखांमध्ये जोर धरू लागली. पाकिस्तानने फुटीरतावाद्यांच्या या मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवून मदत केल्याचे म्हटले जाते. १९६६ मध्ये पंजाब प्रांताचे विभाजन करून हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर १९७० मध्ये, देशात आणि परदेशाबाहेर स्थायिक झालेल्या शीख समुदायांमधील फुटीरतावाद्यांमध्ये खलिस्तान चळवळीला वेग आला. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला वेगळ्या खलिस्तानची मागणी करणाऱ्या फुटीरतावाद्यांची चळवळ अधिकच जोर धरू लागली. शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांनी स्वत:साठी वेगळे खलिस्तान राज्य निर्माण करण्याचा निर्धार पक्का केला. या सगळ्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे नाव आघाडीवर होते. त्यांनी ठिकठिकाणी प्रक्षोभक भाषणे देण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध शीख पत्रकार खुशवंत सिंग यांनी भिंद्रनवालेंबद्दल म्हटले होते की, भिंद्रनवाले प्रत्येक शीख व्यक्तीला ३२ हिंदू लोकांना मारण्यासाठी भडकवायचे, यामुळे शिखांचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे ते म्हणत.

हेही वाचा : महात्मा गांधींच्या आदर्शावर चालणाऱ्या भारतीय आणि आफ्रिकन काँग्रेसची राजकीय अवस्था एकसारखीच का झाली?

भिंद्रनवालेंनी माजवली होती दहशत

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, भिंद्रनवाले हे पूर्वी शीख सेमिनरी दमदमी टकसालचे नेते होते. ते आपणच ‘शिखांचा अस्सल आवाज’ असल्याचा दावा करायचे. पंजाबमधील शिरोमणी अकाली दल या प्रादेशिक पक्षाच्या वाढत्या प्रभावाला रोख लावण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुरुवातीला भिंद्रनवाले यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भिंद्रनवाले यांची प्रक्षोभक भाषणे आणि त्यांचा तरुण शिखांवर पडणारा प्रभाव पाहता ते पंजाबमधील एकूणच राजकारणासाठी मोठी समस्या ठरू लागले. १९८२ मध्ये भिंद्रनवाले यांनी अकाली दलाने आयोजित केलेल्या कायदेभंग चळवळीत सहभाग नोंदवला. यावेळी पोलिसांकडून पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी त्यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराचा आसरा घेतला. १९८३ मध्ये पोलिस उपमहानिरीक्षक ए. एस. अटवाल हे सुवर्ण मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले असता त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, हल्लेखोराने गोळ्या झाडल्यानंतर सुवर्ण मंदिरात प्रवेश केला. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, केपीएस गिल यांनी लिहिले आहे की, “पोलिस महानिरीक्षक अटवाल यांची हत्या ही या सगळ्या प्रकरणाची फक्त सुरुवात होती. यानंतर असे अनेक छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सुवर्ण मंदिराच्या आसपासच्या गटारांमध्ये आणि परिसरामध्ये आढळून येऊ लागले.” त्यावेळी पंतप्रधानपदी असणाऱ्या इंदिरा गांधी यांना या सगळ्या प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्याची निकड भासू लागली. मे १९८४ मध्ये त्यांनी आपला निर्णय पक्का केला आणि भारतीय सैन्याला सुवर्ण मंदिरात घुसून कारवाई करण्याचे आदेश दिले.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, प्रणब मुखर्जींसारख्या अनेक केंद्रिय मंत्र्यांनी या निर्णयाबाबत हरकत घेऊनही ‘ब्लू स्टार ऑपरेशन’ राबवण्यात आले. २९ मेपर्यंत, पायदळाचे सैन्य आणि निमलष्करी दलाचे कमांडो अमृतसरला पोहोचले होते. एकीकडे भारतीय सैन्य कारवाईच्या तयारीत असताना दुसरीकडे भिंद्रनवाले आणि त्यांचे अतिरेकी सहकारीही निष्क्रिय राहिले नव्हते. त्यांनीही आधीपासूनच तयारी सुरू केली होती. सुवर्ण मंदिरात मोठ्या प्रमाणावर जमा केलेला दारुगोळा आणि शस्त्रसाठा त्यांच्या सोबतीला होता. आपल्या या शस्त्रसाठ्याच्या जोरावर भारतीय सैन्याविरोधात युद्ध पुकारण्यासाठी ते तयार झाले होते. भिंद्रनवाले यांच्या समर्थकांना मेजर जनरल शाहबेग सिंग यांनी याबाबतचे प्रशिक्षण दिले होते. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार मेजर जनरल शाहबेग सिंग यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून भारतीय लष्कराने बडतर्फ केले होते.

पुढे काय घडले?

१ जून रोजी भारतीय सैन्याने संपूर्ण सुवर्ण मंदिराला वेढा घातला होता. यादरम्यान पंजाबमध्ये रेल्वे, रस्ते आणि हवाई सेवा बंद करण्यात आली होती. सुवर्ण मंदिराचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला. संपूर्ण अमृतसरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. सीआरपीएफचे जवान रस्त्यावर गस्त घालत होते. सुवर्ण मंदिरात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्गदेखील पूर्णपणे बंद करण्यात आले होते. भारतीय सैन्य आणि खलिस्तान्यांमध्ये चकमक घडू लागली. या चकमकीमध्ये ११ निष्पाप नागरिकांचा जीव गेला. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुवर्ण मंदिरात असलेल्या अतिरेकी खलिस्तानींची असलेली क्षमता आणि त्यांना दिलेले प्रशिक्षण याबाबत सीआरपीएफचे जवान अनभिज्ञ होते. ३ जून रोजी संपूर्ण पंजाबमध्ये ३६ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली. संपूर्ण पंजाबमधील संपर्क आणि दळणवळण ठप्प झाले होते. पंजाबमध्ये माध्यमांनाही परवानगी नव्हती तसेच विजेचा पुरवठाही बंद करण्यात आला होता.

५ जून रोजी भारतीय सैन्याने सुवर्ण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. सुवर्ण मंदिराच्या आत बचावात्मक पावित्र्यात असलेल्या खलिस्तान्यांचा घेराव नष्ट करणे हे यामागचे उद्दिष्ट्य होते. भारतीय जवानांना खलिस्तान्यांचे संरक्षणात्मक कडे भेदण्यात यश आले; मात्र, सुवर्ण मंदिरात घुसण्याची मोठी किंमत चुकवावी लागली. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, पत्रकार शेखर गुप्ता यांनी या सगळ्या घटनाक्रमाचे वृत्तांकन करताना म्हटले आहे की, “सुवर्ण मंदिराच्या परिक्रमेवर असलेल्या प्रत्येक जिन्याची वाट रोखून धरण्यासाठी भारतीय सैन्याने गडबड केली. या सगळ्याची कल्पना मेजर जनरल शाहबेग सिंग यांना आधीच होती. त्यामुळे त्यांनी प्रत्येक जिन्यावर पाय ठेवताच आग लागेल, अशी व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेक जवान त्याला बळी पडले.” यानंतर कमांडर्सनी रणगाड्यांचा वापर करण्याचे ठरवले.

सुवर्ण मंदिराचे पुजारी ग्यानी पूरण सिंग यांच्या म्हणण्यानुसार, रात्री १० वाजताच्या सुमारास रणगाडे आतमध्ये येऊ लागले. पुढील १२ तास, भारतीय सैन्याचे रणगाडे सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तवर हल्ला करत होते. अकाल तख्त शिखांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. याच ठिकाणी भिंद्रनवाले यांनी आसरा घेतला असल्याचे म्हटले जाते. ६ जूनच्या सकाळपर्यंत, सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्यात भारतीय जवानांना यश आले होते. सकाळी ११ वाजता २५ खलिस्तानी अतिरेकी बाहेर आले आणि त्यांनी आत्मसमर्पण केले. पत्रकार शेखर गुप्ता यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, “यावरूनच भारतीय सैन्याला अंदाज आला की, भिंद्रनवाले यांचा एकतर मृत्यू झाला असावा वा ते जखमी झाले असावेत वा ते पळून जाण्यात यशस्वी झाले असावेत.”

मात्र, भिंद्रनवाले यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तब्बल ४० मृतदेहांच्या ढिगाऱ्यांमध्ये भिंद्रनवालेंचा मृतदेह पडला होता. उर्वरित अतिरेकी खलिस्तान्यांनी १० जूनपर्यंत आत्मसमर्पण केले अथवा त्यांचीही हत्या करण्यात आली. या सगळ्या कारवाईमध्ये एकूण ५५४ खलिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला, तर ८७ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. यामध्ये काही सामान्य नागरिकांचाही समावेश होता. ब्लू स्टार ऑपरेशन अधिकृतपणे संपले असले तरीही आता एका वेगळ्या प्रकरणाची सुरुवात इथून होणार होती.

हेही वाचा : विठ्ठल मंदिरात सापडलेल्या तळघरातील मूर्तींबद्दल दावे-प्रतिदावे; वास्तव आणि मिथक काय?

ब्लू स्टार ऑपरेशनचे भारतीय राजकाणावर काय परिणाम झाले?

ब्लू स्टार ऑपरेशनची परिणिती पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या होण्यामध्ये झाली. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर संपूर्ण देशभरात शीखविरोधी दंगली पेटल्या. विशेषत: दिल्लीमधील शिखांवर हल्ले झाले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगली शमल्यानंतर राजीव गांधी यांनी आपल्या मनोगतात म्हटले होते की, “आपण इंदिराजींचे स्मरण ठेवले पाहिजे. त्यांची हत्या का झाली, याचेही स्मरण ठेवले पाहिजे. या सगळ्या प्रकारामागे कुणाचा हात आहे, त्यांचेही स्मरण ठेवले पाहिजे. जेव्हा इंदिराजींची हत्या झाली, तेव्हा देशभरात दंगली उसळल्या. भारतीयांचे मन दु:खावेग आणि संतापाने ओतप्रोत भरले होते, हे मी समजू शकतो. जेव्हा मोठे वृक्ष उन्मळून पडतात तेव्हा धरतीही कापू लागते.”

टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तामध्ये नमूद केले आहे की, ब्लू स्टार ऑपरेशन आणि त्याच्या परिणामांमुळे शिखांमध्ये भारत सरकारबद्दल अविश्वास आणि परकेपणाची भावना निर्माण झाली. या सगळ्याचा परिणाम पंजाबमधील काँग्रेसच्या राजकारणावर झाला. या सगळ्याचे परिणाम नंतरही दिसून आले. सूड म्हणून १९८५ मध्ये एअर इंडियाच्या विमानावर बॉम्बफेक करण्यात आली होती. १९८६ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल ए. एस. वैद्य यांचीही शीख अतिरेक्यांनी पुण्यामध्ये हत्या केली. या कारवाईमुळे भारतीय सैन्यातील अनेक शीख सैनिकांनी बंडखोरी केली. इतर अनेक शीखांनीही सरकारी नोकरीमधून राजीनामे दिले. मात्र, खलिस्तानी दहशतवादाची गंभीर समस्या १९९० च्या दशकातच संपुष्टात आली. मात्र, ती संपुष्टात येण्यासाठी भारताला मोठी किंमत चुकवावी लागली.