हिरे, सोने अशा मौल्यवान धातूंनी समृद्ध देश म्हणून भारताकडे पाहिले जायचे. हिरे निर्यातदारांमध्ये आजही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या आणखी एका दुर्मीळ आणि मौल्यवान हिऱ्यामुळे भारत चर्चेत आहे. हा हिरा आहे ‘द गोलकोंडा ब्लू.’ भारताच्या राजघराण्याशी संबंधित असणारा हा हिरा लिलावात विकला जाणार आहे. क्रिस्टीजनकडून १४ मे रोजी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील फोर सीझन्स हॉटेल डेस बर्ग्स येथे मॅग्निफिसेंट ज्वेल्स सेलचे आयोजन करण्यात आले आहे. तिथेच या हिऱ्याचा लिलाव होणार आहे.

क्रिस्टीजनकडून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या, मौल्यवान आणि निळ्या रंगाच्या हिऱ्याचा लिलाव करण्यात येत आहे. ‘द गोलकोंडा ब्लू’ असे नाव देण्यात आलेला हा हिरा एकेकाळी भारतीय राजघराण्याकडे होता. हा हिरा सध्याच्या तेलंगणातील प्रसिद्ध गोलकोंडा खाणींमधून आला आहे, त्यामुळे याला गोलकोंडा ब्लू असे नाव देण्यात आले आहे. काय आहे ‘द गोलकोंडा ब्लू’चा इतिहास? गोलकोंडा खाणीत कोणकोणते हिरे सापडलेत? जाणून घेऊ या.

‘द गोलकोंडा ब्लू’ असे नाव देण्यात आलेला हा हिरा एकेकाळी भारतीय राजघराण्याकडे होता. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘द गोलकोंडा ब्लू’चा इतिहास काय आहे?

गोलकोंडा ब्लू हा भारताच्या शाही राजघराण्याचा एक भाग होता. क्रिस्टीजच्या माहितीनुसार, हा हिरा २३.२४ कॅरेटचा. याचा आकार नाशपातीसारखा आहे. हा हिरा एकेकाळी इंदूरचे महाराज यशवंतराव होळकर दुसरे यांच्या मालकीचा होता. १९२० आणि १९३० च्या दशकात महाराज यशवंतराव होळकर आणि त्यांच्या पत्नी यांना त्यांच्या शोभिवंत जीवनशैलीसाठी ओळखले जात असायचे. यशवंतराव होळकर त्यांच्या अभिजात सौंदर्यदृष्टीसाठी प्रसिद्ध होते.

१९१३ साली यशवंतराव होळकर यांचे वडील आणि इंदूरचे तत्कालीन शासक तुकोजीराव होळकर तिसरे यांनी फ्रेंच लक्झरी ज्वेलरी आणि वॉच हाऊस असणाऱ्या ‘चौमेट’कडून नाशपातीच्या आकाराचे दोन हिरे मिळवले. ‘चौमेट’मधील नोंदींनुसार त्यांना ४६.७० आणि ४६.९५ कॅरेटचे दोन अविभाज्य नाशपातीच्या आकाराचे हिरे दाखवण्यात आले. दहा वर्षांनंतर तुकोजीराव होळकर तिसरे यांनी ‘चौमेट’ला नाशपातीच्या आकाराचा गोलकोंडा हिरा ब्रेसलेटमध्ये बसवण्याचे काम दिले.

१९३३ मध्ये होळकर यांनी पॅरिसमधील ज्वेलरी हाऊस ‘मौबौसिन’ यांना त्यांचे अधिकृत ज्वेलर म्हणून नियुक्त केले. या फ्रेंच कंपनी ‘मौबौसिन’ने इंदूरच्या राजाच्या शाही संग्रहाची पुनर्रचना केली, त्यात त्यांनी गोलकोंडा ब्लू आणि इंदूर पेअर्स या दोन्ही हिऱ्यांसाठी एक लांब हार तयार केला. फ्रेंच कलाकार बर्नार्ड बुटेट डी मोनवेल यांनी इंदूरच्या महाराणी संयोगिताबाई होळकर यांच्या चित्रात हा हार रेखाटला आहे. महाराणी संयोगिताबाई होळकर १९३० च्या दशकात आधुनिक शैलीतील दागिने परिधान करत असे. १९४६ मध्ये न्यूयॉर्कचे ज्वेलर हॅरी विन्स्टन यांनी इंदूर पेअर्सची खरेदी केली.

त्यांनी ४४.१४ आणि ४६.३९ कॅरेटचे हिरे कापले आणि ते त्यांच्या वैयक्तिक संग्रहात ठेवले, असे ‘फिलिप्स ऑक्शन हाऊस’बीने सांगितले आहे. जानेवारी १९४७ मध्ये ज्वेलर हॅरी विन्स्टन यांनी २३ कॅरेटचा हिरा विकत घेतला, त्यानंतर त्यांनी तो हिरा २३ कॅरेट वजनाच्या अशाच पांढऱ्या हिऱ्याबरोबर एका ब्रोचमध्ये बसवला. ज्वेलर हॅरी विन्स्टन यांनी तो ब्रोच बडोद्याच्या महाराजांना विकला. हा ब्रोच विन्स्टोन यांनी पुन्हा मिळवला आणि त्याला नवीन स्वरूप देऊन रत्नाच्या रूपात पुन्हा विकला, त्यामुळे हा हिरा भारतीय राजघराण्यातून विदेशात गेला.

‘गोलकोंडा ब्लू’चा लिलाव

गोलकोंडा ब्लू हिऱ्याची किंमत ३५ ते ५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ३०२ ते ४३१ कोटींच्या घरात आहे. हा हिरा पहिल्यांदाच क्रिस्टीज कंपनीच्या लिलावात विकला जाणार आहे. २३.२४ कॅरेटचा हा हिरा प्रसिद्ध पॅरिसियन ज्वेलरी डिझायनर JAR ने एका सुंदर अंगठीत बसवला आहे. “या कॅलिबरचे रत्न आयुष्यात एकदाच बाजारात येतात,” असे क्रिस्टीजचे आंतरराष्ट्रीय ज्वेलरीप्रमुख राहुल कडकिया यांनी ‘फोर्ब्स’ला सांगितले. त्यात असेही म्हटले आहे की, हा हिरा त्याच्या शाही वारसा, त्याचा रंग आणि वेगळ्या आकारामुळे गोलकोंडा ब्लू खरोखरच जगातील दुर्मीळ हिऱ्यांपैकी एक आहे.”

गोलकोंडा ब्लू हा लिलावात विकला जाणारा सर्वात मोठा हिरा असणार आहे, मात्र लिलावात विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या हिऱ्यांच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश होणार नाही; कारण यापूर्वी याहून महागड्या हिऱ्यांचा लिलाव झाला आहे. मे २०१६ मध्ये क्रिस्टीच्या जिनिव्हा लिलावात १४.६२ कॅरेटचा ‘ओपेनहायमर ब्लू’ ५७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ४९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकला गेला आहे. ‘फोर्ब्सनुसार, ‘ओपेनहायमर ब्लू’ हा लिलाव झालेला सर्वात महागडा फॅन्सी व्हिव्हिड ब्लू हिरा आहे. एप्रिल २०२२ मध्ये १५.१० कॅरेटचा ‘डी बियर्स ब्लू’ हा हिरा सोथेबीच्या हाँगकाँग लिलावात ५७.४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ४९४ कोटी रुपये किमतीला विकला गेला.

गोलकोंडा खाणीतील प्रसिद्ध हिरे

गोलकोंडा हिरे हे जगातील सर्वोत्तम पारदर्शक आणि दुर्मीळ रत्ने आहेत. गोलकोंडा खाणीतील प्रसिद्ध रत्नांमध्ये कोहिनूर, आग्रा हिरा, अमेरिकेतील स्मिथसोनियन राष्ट्रीय नैसर्गिक संग्रहालयातील होप हिरा, इराणमधील दर्या-इ-नूर आणि प्रिन्सी हिरा या हिऱ्यांचा समावेश आहे. ४५.५२ कॅरेट वजनाचा ‘होप हिरा’ हा सर्वात मोठा फॅन्सी ब्लू हिरा आहे.