-राखी चव्हाण
मँचेस्टर मेट्रोपॉलिटिन विद्यापीठाच्या नेतृत्वात झालेल्या ‘स्टेट्स ऑफ द वर्ल्ड बर्ड्स’ या पर्यावरण आणि संसाधनांच्या वार्षिक पुनरावलोकनाच्या अभ्यासात जगभरात अस्तित्वात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ४८ टक्के प्रजातींची संख्या कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर त्याआधी भारतातील ८० टक्के पक्षी प्रजाती नाहीशा होत असून ५० टक्के प्रजाती वेगाने कमी होत असल्याची माहिती ‘स्टेट्स ऑफ इंडियाज बर्ड्स’च्या २०२० साली प्रकाशित झालेल्या अहवालात दिली आहे. पक्षी हे पर्यावरणीय आरोग्याचे संवेदनशील सूचक असल्यामुळे त्यांचे नुकसान म्हणजेच जैवविविधतेचे नुकसान आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रजाती नामशेष होणे म्हणजे काय?

पक्षी किंवा प्राणी हे त्यांच्या नैसर्गिक अधिवासातुन किंवा पृथ्वीतलावरुन संपणे म्हणजे नामशेष होणे असे आहे. मात्र, त्यांच्या शेवटच्या नोंदीनंतर पुढे अनेक वर्षे त्यास ‘फिअर टू एक्सटींक्ट’ म्हणजे नामशेष झाल्याची भिती असलेला असे संबोधले जात आहे. भारतातुन नामशेष झालेल्या किंवा होण्याचा धोका असलेल्या यादीत विसाव्या शतकामध्ये चार पक्ष्यांचा समावेश होता. त्यात गुलाबी डोक्याचे बदक, माऊंटेन क्वेल, ब्लेविटचा आऊल व जेर्डनचा कोर्सरचा समावेश होता. मात्र, १९८१ व १९९७ साली अनुक्रमे जेर्डन कोर्सर व ब्लेविटी आऊल म्हणजे रानपिंगळा या दोन पक्षांचा पुनर्शोध लागला. महाराष्ट्रातुन मात्र जेर्डन कोर्सर नामशेष झाला असे म्हणता येईल.

भारतातील पक्षी प्रजातींची स्थिती काय?

भारतातील सामान्य पक्ष्यांच्या काही टक्के प्रजाती दीर्घकाळ स्थिर आहेत किंवा वाढल्या आहेत तर गेल्या पाच वर्षांत काही प्रजातींच्या संख्येत घट झाली आहे. एकूणच १०१ प्रजातींचे वर्गीकरण ‘उच्च संवर्धन चिंता’ म्हणून केले गेले आहे. ज्या प्रजाती सर्वाधिक कमी झाल्या आहेत त्यात व्हाइट-रम्पेड गिधाड,(पांढरट पंखी गिधाड ), घार, रिचर्ड्स पिपिट, इंडियन वल्चर, लार्ज-बिल बिल्ट लीफ वॉरलर, पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर आणि कर्ल्यू सँडपीपर. यापैकी काही जागतिक पातळीवर धोक्यात आलेल्या प्रजाती आहेत. मध्य भारतातील पानगळीची वने उजाड केली जात असल्यामुळे रानपिंगळ्यांची संख्या कमी झाली आहे. पश्चिम घाटांवरील जंगले व हिमालयातील बेसुमार वृक्षतोडीमुळे आधीच दुर्मिळ असलेले पक्षी नामशेष होत आहेत.

पक्षी प्रजाती नामशेष होण्यामागील कारणे काय?

पक्ष्यांच्या अधिवासाचे नुकसान आणि ऱ्हास, जमिनीच्या वापरात होणारे बदल, जमिनीचा अतिवापर आणि हवामान बदल यामुळे गेल्या तीन दशकांमध्ये जागतिक स्तरावर पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. भारतात हवा आणि पाणी प्रदूषणाची वाढलेली पातळी, शेतीत रासायनिक कीटक नाशकाचा वाढता वापर आणि वृक्ष तोड इत्यादींमुळे पक्ष्यांच्या प्रजाती कमी होत आहेत. एकंदरीत ढासळत असलेले पर्यावरण मुख्यतः सर्व प्रकारची जैविक विविधता कमी होण्यास कारणीभूत असून त्यास पक्षीही अपवाद नाहीत. डायक्लोफेनॅकसारख्या रासायनिक तत्त्वांमुळे गिधाडांच्या प्रजाती अत्यंत धोक्यात आल्या आहेत. गवताळ प्रदेश कमी होणे, उच्चदाब वीजवाहिन्या आणि पाणस्थळांची दुरावस्था यामुळे माळढोक, तणमोर आणि सारस यासारखे पक्षी नामशेष होत आहेत.

पाणी, हवा, ध्वनी प्रदूषणाचा पक्ष्यांवर काय परिणाम होतो?

पक्ष्यांना पाणी आणि वायू प्रदूषणापासून धोका आहे, पण ध्वनी प्रदूषणामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. पक्ष्यांची प्रजनन क्षमता कमी होत असून त्यांच्या व्यवहारात बदल होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे त्यांच्या गाण्यावर, त्यांच्या आवाजावर परिणाम झाला आहे. आवाजामुळे पक्षी आपआपसात संवाद साधू शकत नाहीत आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यांच्या हार्मोन्समध्ये देखील बदल झाल्याचे दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 48 percent of bird species declining globally 50 percent declining strongly in india print exp scsg