– शैलजा तिवले

राज्यात १३ ते १५ वर्षे वयोगटातील ५.१ टक्के बालके तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचे जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षणामध्ये (जीवायटीएस) आढळले आहे. विशेष म्हणजे बहुतांश बालकांमध्ये दहाव्या वर्षापासून हे व्यसन सुरू झाले असून त्यात सिगारेट, विडी, हुक्का ओढणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यातही ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण अधिक आहे.

जीवायटीएस म्हणजे काय?

शाळेत जाणाऱ्या १३ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांमधील व्यसनाचे प्रमाण आणि व्यसन नियंत्रण याची पडताळणी ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हेमध्ये (जीवायटीएस) केली जाते. या सर्वेक्षणाची चौथी फेरी २०१९ मध्ये पार पडली. याचे राष्ट्रीय पातळीवरील निष्कर्ष गेल्या वर्षी जाहीर झाले होते. परंतु यावेळी प्रथमच राज्य पातळीवरील निष्कर्ष सर्वेक्षण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थेने (आयआयपीएस) नुकतेच जाहीर केले आहेत. या सर्वेक्षणाच्या पूर्वीच्या फेऱ्या २००३, २००६ आणि २००९ मध्ये घेण्यात आल्या होत्या. राज्यात ३५ शाळांमधील ३ हजार ७६५ बालकांचा यात समावेश आहे. यामध्ये नऊ सरकारी तर २० खासगी शाळा सहभागी झाल्या होत्या.

शहरात प्रमाण अधिक…

राज्यात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये मुलांचे प्रमाण ५.८ टक्के तर मुलींचे प्रमाण ४.४ टक्के आहे. यातील ४ टक्के बालके धूम्रपान करत असून २.४ टक्के बालके धूम्रपानाव्यतिरिक्त तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये १.४ टक्के बालके सिगारेट, तर १.६ टक्के बालके विडीचे सेवन करतात. धूम्रपान करण्याचे प्रमाण शहरात सर्वाधिक म्हणजे ४.३ टक्के आहे, तर ग्रामीण भागात ३.६ टक्के आहे. धूम्रपानाव्यतिरिक्त अन्य तंबाखूयुक्त पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाणही शहरात जास्त म्हणजे ३.१ टक्के तर ग्रामीणमध्ये १.७ टक्के आहे. सिगारेट ओढणाऱ्या बालकांचे प्रमाण शहरात १.९ टक्के तर ग्रामीणमध्ये ०.९ टक्के आहे. शहरात २.२ टक्के बालके विडी ओढत असून ग्रामीणमध्ये हे प्रमाण ०.९ टक्के आहे. धूम्रपानाव्यतिरिक्त तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाणही शहरामध्ये अधिक आहे. ग्रामीण भागात बालकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण १.७ टक्के आहे, तर शहरी भागात ते ३.१ टक्के आहे.

पान मसाल्यासह तंबाखू खाण्याचे व्यसन?

राज्यात सुमारे ४.५ टक्के बालकांनी एकदा तरी पान मसाल्यासह तंबाखूचे सेवन केले असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ४.८ टक्के तर शहरी भागातील ४.२ टक्के बालकांचा समावेश आहे.

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कधीपासून?

बालकांनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन साधारण दहाव्या वर्षापासून सुरू केल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे. शहरातील बालकांच्या तुलनेत ग्रामीण भागातील बालकांमध्ये याचे लवकरच व्यसन लागल्याचे दिसून आले आहे. शहरी भागातील अनेक बालके अकराव्या वर्षीच सिगारेट ओढण्यास सुरुवात करत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिक गंभीर असून नवव्या वर्षापासून बालकांच्या हाती सिगारेट आली आहे. विडी ओढणाऱ्या बालकांच्या बाबतीतही हीच स्थिती असून शहरी आणि ग्रामीण भागात अनुक्रमे दहाव्या आणि नवव्या वर्षी बालके व्यसनाधीन होण्यास सुरुवात झाल्याचे आढळले आहे. तंबाखूजन्य पदार्थ खाण्यासही बालकांनी साधारण वयाच्या दहाव्या वर्षी सुरुवात केली असल्याचे निरीक्षण अभ्यासात नोंदवले आहे.

कोटपा कायदा कागदावरच?

अठरा वर्षाखालील नागरिकांना तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यांतर्गत (कोटपा) केली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी योग्यरितीने होत नाही. सिगारेट ओढणाऱ्यांमधील ६३ टक्के आणि विडी पिणाऱ्यांमधील ७० टक्के मुले ही दुकाने, रस्त्यावरील पानाचे ठेले येथून खरेदी करतात. ग्रामीण भागातील बालकांना शहरी भागातील बालकांच्या तुलनेत हे पदार्थ सहजरीत्या उपलब्ध होत असल्याचे या अभ्यासात आढळले आहे. दुकानातून सिगारेट खरेदी करणाऱ्यांत मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या तुलनेत दुकानातून सिगारेट खरेदी करणाऱ्या मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे या अभ्यासात आढळले आहे. यामध्ये सुमारे ७७ टक्के मुली तर ५७ टक्के मुलांचा समावेश आहे. पानाच्या ठेल्यावरून सिगारेट खरेदी करणाऱ्या बालकांमध्ये मुलांचे प्रमाण १७ टक्के तर मुलींचे प्रमाण १५ टक्के आहे. परंतु सर्वसाधारण दुकानामधून सिगारेट खरेदी करणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ५२ टक्के तर मुलांचे प्रमाण २७ टक्के आहे.

सर्वसाधारण दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री?

पानाच्या ठेल्यांपेक्षा सर्वसाधारण दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ बालकांना सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून आले. पानाच्या ठेल्यावर १६ टक्के बालके सिगारेटची खरेदी करतात, तर दुकानांमध्ये खरेदी करणाऱ्या बालकांचे प्रमाण ३५ टक्के आहे. विडीच्याही बाबत हेच चित्र आहे. २४ टक्के बालके पान ठेल्यावरून तर ४८ टक्के बालके दुकानातू विडी खरेदी करतात.

तंबाखू व्यसनमुक्तीसाठीच्या मदतवाहिनीला कमी प्रतिसाद

राज्यात धूम्रपान करणाऱ्या बालकांपैकी २४ टक्के बालकांना हे व्यसन सोडण्याची इच्छा आहे, तर १९ टक्के बालकांनी गेल्या वर्षभरात सोडण्याचा प्रयत्नही केला आहे. तसेच यातील सुमारे ५० टक्के बालकांना धूम्रपान आरोग्याला हानिकारक असल्याची जाणीव असल्यामुळे ते सोडण्याची इच्छा आहे. मात्र तरीही तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन सोडण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मदतवाहिनीवर संपर्क साधून मदत घेणाऱ्या बालकांचे प्रमाण मात्र अवघे सहा टक्के आहे.

सर्वेक्षणातील धोरणात्मक शिफारशी

घरामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी बहुतांश वेळा धूम्रपान करत असल्याचे या सर्वेक्षणामध्ये बालकांनी नमूद केले आहे. धूम्रपानामुळे होणाऱ्या विपरित परिणामांबाबत पालकांनाही जागृत करणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणीही धूम्रपान करण्यास मज्जाव घालणे आवश्यक आहे. पानाचे ठेले किंवा दुकाने यामध्ये दर्शनी भागात मोठ्या अक्षरांमध्ये बालकांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये असे फलक लावण्यात यावेत. बालके आठव्या किंवा नवव्या वर्षीच व्यसनाकडे वळत असल्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर व्यसनाबाबत जनजागृतीचे कायर्कम हाती घ्यावेत. तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत माहिती किंवा जागृती करणारी माहिती शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावी, अशा शिफारशी आयआयपीएसने राज्याच्या आरोग्य विभागाला केल्या आहेत.

Story img Loader