२ जानेवारी १९५४ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. हा निर्णय भारतीयांच्या असामान्य कामगिरीचा गौरव करण्याचा होता. या दिवशी भारतातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्याच वर्षी पद्म पुरस्कारांचीही घोषणा झाली. त्याच निमित्ताने या पुरस्कारांविषयी जाणून घेणे संयुक्तिक ठरावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत सरकारच्या सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गॅलेनटरी (शौर्य) आणि सिव्हिलियन्स (नागरी) अशा दोन पुरस्कारांचा समावेश होतो. शौर्य पुरस्कार भारत सरकारकडून सशस्त्र सेवेतील असमान्य कामगिरी- पराक्रमासाठी देण्यात येतो. भारत सरकारने सशस्त्र दलातील अधिकारी/ कर्मचारी, तसेच इतर कायद्याने स्थापन केलेल्या दलांच्या आणि नागरिकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या कार्यकर्तृत्त्वाचा सन्मान करण्यासाठी गॅलेनटरी किंवा शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. तर सिव्हिलियन्स अर्थात नागरी पुरस्कार हे नागरिकांसाठी असतात. नागरी पुरस्कार दोन प्रकारचे आहेत, ते म्हणजे भारतरत्न आणि पद्म पुरस्कार.

भारतरत्न पुरस्कार

भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, २ जानेवारी १९५४ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी हा पुरस्कार सुरू केला. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. दरवर्षी या पुरस्कारासाठी पंतप्रधान तीन जणांची निवड करतात. या सन्मानाच्या विजेत्याला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले (सनद) प्रमाणपत्र दिले जाते. तसेच पिंपळाच्या पानाच्या आकाराचे पदकही दिले जाते. हा पुरस्कार भारतीय पुरस्कारांच्या श्रेणीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात अतुलनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. ज्या वेळेस हा पुरस्कार सुरू झाला त्या वेळी तो सर्व क्षेत्रांसाठी खुला नव्हता. केवळ कला, विज्ञान, साहित्य, सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जात होता. परंतु २०११ साली या पुरस्कारासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या कालखंडात जनतेकडून सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न दिले जावे अशी मागणी करण्यात आली होती. परंतु त्यावेळी भारतरत्नच्या यादीत क्रीडा विभाग समाविष्ट नव्हता. याच पार्श्वभूमीवर तत्कालीन क्रीडा मंत्री अजय माकन यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिले आणि विनंती केली; क्रीडा विभागाला हा पुरस्कार मिळण्याची तरतूद असावी. यानंतर सरकारने हा निर्णय घेतला, भारतरत्न हा पुरस्कार सगळ्या विभागांसाठी खुला केला जाईल, ज्यात क्रीडा विभाग सुद्धा समाविष्ट असेल. त्यामुळेच २०१४ मध्ये सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. परंतु त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील कोणालाही हा पुरस्कार अद्याप मिळालेला नाही. २०१३ साली सुभाषचंद्र अग्रवाल यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे इतर विभागासाठी भारतरत्न हा पुरस्कार का खुला करण्यात आला? यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. यावर उत्तर देताना सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार देता यावा यासाठी भारतरत्न सर्व विभागासाठी खुले करण्यात आले, असे उत्तर देण्यात आले. केवळ इतकेच नाही तर १९५५ साली पंडित जवाहरलाल नेहरू आणि १९९८ साली एम जी रामचंद्रन यांना भारतरत्न दिल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या संबंधांमुळे भारतरत्न देण्यात येतो, असाही आरोप झालेला आहे.भारतरत्न हे सुरुवातीच्या काळात सुवर्ण पदकाच्या स्वरूपात देण्यात येत होते. नंतरच्या काळात पदकाचे स्वरूप बदलले. नंतर या त्याला पिंपळपानाचा आकार देण्यात आला.

अधिक वाचा: हैफाची लढाई: इस्रायलच्या निर्मितीत भारतीय सैनिकांचा ‘तो’ लढा ठरला निर्णायक !

भारतरत्न पुरस्कारासाठी कोण पात्र आहे?

या पुरस्कारासाठी भारतीय नागरिकांना प्राधान्य दिले जात असले तरी कोणत्याही राष्ट्रीयत्वाचे नागरिक हा पुरस्कार प्राप्त करण्यास पात्र आहेत. त्यास जाती, लिंग यात भेद नाही. दरवर्षी फक्त तीन नामांकित व्यक्तींना पुरस्कार दिला जातो.

पहिला भारतरत्न पुरस्कार

पहिला भारतरत्न पुरस्कार १९५४ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नामांकित तिघांना प्रदान केला होता. १९५४ साली तीन भारतरत्न पुरस्कार विजेते होते; सी. राजगोपालाचारी यांनी अण्वस्त्रांच्या वापराला विरोध केल्यामुळे जागतिक शांततेसाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते, त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या वाढदिवशी, म्हणजे ५ सप्टेंबर आपण दरवर्षी शिक्षक दिन साजरा करतो. डॉ. सी.व्ही. रामन हे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या प्रशंसनीय कार्यासाठी त्यांना भारतरत्न मिळाले. भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले होते.

अधिक वाचा: कुरळ्या केसांमागील विज्ञान आणि इतिहास काय सांगतो?

पद्म पुरस्कार काय आहेत?

पद्म पुरस्कार हा अत्यंत महत्त्वाचा नागरी सन्मान मानला जातो जो दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जातो. पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री अशा तीन विशिष्ट श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण पुरस्कार हे राष्ट्रासाठी अनुकरणीय आणि सन्माननीय सेवेचे प्रतीक आहे ज्यामुळे जगभरातील लोकांमध्ये तिरंग्याबद्दल आदर आणि सन्मान वाढला आहे. पद्मभूषण पुरस्काराने राष्ट्रासाठी उच्च दर्जाच्या सेवेसाठी नागरिकांचा गौरव केला जातो. पद्मश्री पुरस्कार हे राष्ट्रसेवेचे प्रतीक आहे. एका वर्षात १२० पेक्षा जास्त पद्म पुरस्कारांना परवानगी नाही. प्राप्तकर्त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते. पद्म पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा दरवर्षी मार्च- एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो. पद्म पुरस्कारांचे पूर्वी पाहिला वर्ग, दूसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा तीन विशिष्ट भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. त्यानंतर १९५५ मध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे नामकरण करण्यात आले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 years of bharat ratna why and when was this highest civilian honor started svs