Why were illustrations from Ram to Akbar featured in the Constitution? नागपूरमध्ये आयोजित एका व्याख्यानात ॲड. विष्णू शंकर जैन यांनी संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये अकबराचे छायाचित्र का आहे? कोणत्या मानसिकतेतून हे छायाचित्र संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये समाविष्ट करण्यात आले, असे प्रश्न विचारत एका नव्या वादाला वाचा फोडली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर संविधानातील रामापासून ते अकबरापर्यंतच्या चित्रांविषयी जाणून घेऊ.
चित्रांचे विषय
वास्तविक भारतीय संविधान हे जगातील लिखित स्वरूपातील सर्वात मोठं संविधान आहे. भारतीय संविधानाची ओळख अनेक कारणांसाठी आहे. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये रंगवलेली २२ चित्रं. संविधानाच्या प्रत्येक पानावर हाताने रंगवलेली चित्रं भारतीय इतिहासाचे दर्पणच म्हणावे लागेल. भारतीय संविधान हे सुलेखनकार प्रेम बिहारी नारायण रैझादा यांनी हाताने लिहिले होते, तर चित्रांची संकल्पना आणि अंमलबजावणी शांतिनिकेतनमधील शिक्षक व प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस आणि त्यांच्या टीमने केली होती. या चित्रांमध्ये सिंधू संस्कृतीपासून ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामापर्यंतचा इतिहास दर्शवला आहे. या चित्रांमध्ये रामायण, महाभारतातील दृश्यांचाही समावेश आहे. शिवाय भारतातील भौगोलिक विविधताही या चित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. उंटांची मिरवणूक ते हिमालयातील उत्तुंग पर्वतरांगांचा यात समावेश आहे.
नंदलाल बोस यांचा दृष्टिकोन
मूलतः या चित्रांच्या संकल्पनेविषयी विचार करता या चित्रांच्या माध्यमातून नंदलाल बोस यांचा भारतीय इतिहासाविषयीचा दृष्टिकोन प्रकट होतो. मूलतः संविधानातील मजकुराला अनुसरून ही चित्र नाहीत. तर बोस यांनी त्यांना झालेले भारतीय इतिहासाचे आकलन चित्रांच्या माध्यमातून मांडले आहे. चित्रांचा विषय किंवा अनुक्रम याविषयी अभ्यासकांमध्ये निश्चितच मतभेद असू शकतात. परंतु, ज्यावेळी संविधानाची मांडणी केली, त्यावेळी इतिहासाचा निश्चित असा कालक्रम मान्य झालेला नव्हता, असे कलेतिहासकार आर. शिवकुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
कलाकारांची नेमणूक
शिवकुमार यांनी सांगितले की, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या होण्याआधी नंदलाल बोस यांच्याकडे चित्रांचे काम ऑक्टोबर महिन्यात देण्यात आले होते. हे काम पूर्ण होण्यास किती वेळ लागला हे सांगणे कठीण आहे. कारण काही ठिकाणी स्वाक्षऱ्या या चित्र रंगवलेल्या बॉर्डरच्या (चौकटीच्या) बाहेर गेलेल्या आहेत. त्यामुळे चित्र ही नंतर काढण्यात आली असावीत असे दिसते. संविधानाची दोन हस्तलिखिते आहेत. एक प्रत इंग्रजीत, तर दुसरी हिंदीत आहे. बोस यांच्याकडे हे काम बहुधा त्यांच्या राष्ट्रवादी चळवळीतील दीर्घ संबंधामुळे देण्यात आले. महात्मा गांधींचे निकटवर्तीय असलेल्या बोस यांनी १९३८ साली गुजरातमधील बडोली जवळ हरिपुरा येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनासाठी पोस्टर्स डिझाइन केली होती.
प्रत्येक पानासाठी २५ रुपये
संविधानावर काम करताना बोस यांच्या टीममध्ये त्यांचे निकटवर्तीय नातेवाईक, विद्यार्थी आणि सहकारी कलाकारांचा समावेश होता. या टीममध्ये कृपाल सिंग शेखावत, ए. पेरुमल आणि दिरेन्द्रकृष्ण देव बर्मन यांचा समावेश होता. प्रस्तावनेच्या पानावर बियोहार राममनोहर सिन्हा यांनी आकृत्या काढल्या असून त्यावर त्यांची स्वाक्षरी आहे, तर दीनानाथ भार्गव यांनी राष्ट्रीय प्रतीक अशोकस्तंभावरील सिंह काढले होते. शिवकुमार यांनी सांगितले की, नंदलाल यांच्या कागदपत्रांमध्ये सापडलेल्या एका नोंदीनुसार, ऐतिहासिक दृश्ये रंगवणाऱ्या कलाकारांना प्रत्येक पानासाठी २५ रुपये देण्यात आले होते.
संविधान लिहिण्यासाठी एकही पैसा घेतला नाही
असं मानलं जातं की, संविधान हाताने लिहिण्याची कल्पना पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती आणि म्हणूनच दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवीधर असलेले रैझादा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी लेखनकला कौशल्य आपल्या आजोबांकडून शिकले होते आणि त्यांनी हे काम लगेच स्वीकारले. त्यांनी यासाठी एकही पैसा घेतला नाही; फक्त एकच विनंती केली की प्रत्येक पानावर त्यांचं नाव आणि शेवटच्या पानावर त्यांच्या आजोबांबरोबर त्यांचं नाव असावं. संविधान सभागृहात त्यांना एक खोली देण्यात आली होती आणि त्यांनी सहा महिन्यांत हे काम पूर्ण केल्याचं सांगितलं जातं. त्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये पार्चमेंट शीट्सवर संविधान लिहिलं.
चित्रकलेची संकल्पना
शिवकुमार यांनी सांगितले की, संविधानातील मजकूर आणि चित्रांमध्ये थेट कोणताही संबंध नाही. नंदलाल बोस ही चित्र तयार करताना मजकुराचे चित्रण करत नव्हते किंवा त्याचा तपशीलवार अभ्यास करत नव्हते. त्यांनी एक प्राथमिक आराखडा तयार केला होता. त्यातील अनेक गोष्टी वगळण्यात आल्या तर काही नव्या गोष्टी जोडण्यात आल्या. मुघल स्थापत्यसह अकबर आणि शाहजहान यांच्या पोर्ट्रेट्सच्या जागी फक्त अकबराचे चित्र ठेवण्यात आले. डिएजीचे (DAG) सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिष आनंद यांनी सांगितले की, नंदलाल बोस यांचे करिअर जलरंगांच्या सौम्य छटांपासून ते शांतिनिकेतनमधील त्यांच्या अभिव्यक्तिवादी श्रमिक कलाकृतींपर्यंत वेगवेगळ्या शैलींनी समृद्ध आहे. संविधानातील चित्रांची निवड आणि शैली त्यांच्या या वैशिष्ट्यांचे दर्शन घडवते. संविधानातील चित्र काढणे हे जबाबदारीपूर्ण काम होते.
इतिहास आणि धर्मातून घेतलेली प्रेरणा
सिंधू संस्कृतीच्या स्थळावर उत्खननात सापडलेली बैलाची मृण्मय मुद्रा ही संविधानातील पहिली चित्रात्मक मांडणी आहे. याचे चित्रण ‘संघ आणि त्याचे प्रदेश’ या पहिल्या भागात दिसते. भाग दोन ‘नागरिकत्व’ मध्ये एका आश्रमाचे चित्र आहे. तिथे तपस्वी पुरुष प्रार्थना करत असून ध्यानमग्न वातावरण आहे. भाग पाच मध्ये दिसणाऱ्या दुसऱ्या आश्रमाच्या दृश्यात बुद्ध केंद्रस्थानी आहेतच . बुद्धांच्या आजूबाजूला शिष्य, प्राणी आणि पक्षी शांत वातावरणात आहेत. निवडक रंगीत चित्रांपैकी चौथ्या भागामध्ये दिसणारे २४ वे जैन तीर्थंकर महावीर यांचे ध्यानस्थितीत चित्र विशेष आहे. तेराव्या भागात महाबलीपुरममधील शिल्पकला आणि गंगेचे पृथ्वीवर आगमन दाखवले आहे. महाभारतातील युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुन आणि कृष्ण यांच्यातील संवादाचे आणि लंकेतील युद्धानंतर राम, लक्ष्मण आणि सीता घरी परत येत असल्याचे दृश्य देखील संविधानात रेखाटण्यात आले आहे.
भारताचे सम्राट
घटनेच्या सातव्या भागात सम्राट अशोक बुद्धधर्माचा प्रचार करताना हत्तीवर बसलेले दाखवले आहेत, तर नवव्या भागात राजा विक्रमादित्याच्या दरबारातील नर्तक आणि संगीतकारांचे चित्र आहे. घटनेत ठळकपणे दाखवलेली एकमेव स्त्री म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई तिचे चित्र सोळाव्या भागात आहे. यात भागात टिपूचेही चित्र आहे. पंधराव्या भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग यांचे चित्रण आहे. राणा प्रताप आणि रणजित सिंह यांची पोर्ट्रेट्स देखील असावीत, असे ठरवले गेले होते, पण जागेअभावी त्यांचा समावेश झाला नसावा,” असे शिवकुमार म्हणाले.
देशाचे स्वातंत्र्य आंदोलन
संविधानात गांधीजींची दोन चित्र आहे. एकदा दांडी यात्रेत सहभागी होताना आणि दुसऱ्यांदा दंगलग्रस्त बांगलादेशाला भेट देताना. त्यांचे स्वागत स्त्रिया आरतीचे तबक घेऊन करत आहेत, तर मुस्लिम शेतकरी कुर्फी टोपी घालून उभे आहेत. एकोणविसाव्या भागात सुभाषचंद्र बोस हिमालयाच्या पार्श्वभूमीवर झेंड्याला सलामी देताना दिसतात आणि आझाद हिंद फौजेचे सदस्य पुढे चालताना दाखवले आहेत. नेहरूंच्या चित्राचाही समावेश करायचा होता, पण तो अखेर वगळण्यात आला. शिवकुमार यांनी सांगितले की, घटनेतील तीन लँडस्केप्स ही नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर आणि त्यांच्या रचनेला राष्ट्रगीताला मानवंदना देण्यासाठी आहेत. यात भारताच्या वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेचे गौरवगान केले आहे.