– धर्मेश शिंदे

वयाच्या आठव्या वर्षी चवींचे ज्ञान मुलांना थोड्या फार प्रमाणात येत असते. या वयात एका रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात शिरून तेथील कर्मचाऱ्यांना ‘शर्ली टेंपल’ या माॅकटेलमधली चूक दाखवून त्यात सुधारणा घडवणारा लिओ केली जगभरात गाजत आहे. त्याच्याविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

कोण आहे लिओ केली?

लिओ केली हा ११ वर्षीय पेय समीक्षक आणि कलाकार आहे. त्याने वयाच्या आठव्या वर्षी ‘शर्ली टेंपल’ या माॅकटेलमधली चूक शोधून काढत त्यात सुधारणा घडवून आणली. त्याच्या समीक्षक वृत्तीमुळे तो अनेकांचा लाडका झाला आहे. त्याच्या समाजमाध्यमांवरील उपस्थितीमुळे दूरचित्रवाणी आणि चित्रपटात त्याला संधी मिळत गेल्या, ज्यात ‘द ड्रू बॅरीमोर शो’मधील त्याच्या भूमिकेचा समावेश आहे. यामधून तो जगभरातील प्रेक्षकांसमोर आला. लिओने जेनिफर लॉरेन्स अभिनीत ‘नो हार्ड फीलिंग्स’मधून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर ‘डिअर सांता’मध्ये भूमिका केली. २०२५ची सुरुवात त्याने ‘लाॅ ॲंड ऑर्डर’ या मालिकेतील पाहुण्या कलाकाराच्या रुपात केली. केविन जेम्स आणि क्रिस्टीना रिक्की यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गन्स अप’ या चित्रपटातही तो आहे.

लिओ केली कसा बनला ‘शर्ली टेंपल किंग’?

आचारी जीन-जॉर्जेस व्होंगेरिक्टन हे ग्रीनविच, कनेक्टिकट येथील त्यांच्या रेस्टॉरंट हॅपी मंकीमध्ये स्वयंपाकघरात काम करत होते, तेव्हा एका कर्मचाऱ्याने त्यांना बाजूला सारले. एक आठ वर्षांचा मुलगा आत येत होता. त्याने ‘शर्ली टेंपल’ या माॅकटेलमधली चूक दाखवून दिली. शेफ व्होंगेरिक्टन यांनी कबूल केले की अमेरिकेचे आवडते मॉकटेल चुकले आहे. व्होंगेरिक्टन आणि त्यांच्या टीमने अकराव्या तासात लहान-बॅच ग्रेनेडाइन, घरगुती आले सिरप आणि ताजिन मसाला वापरून शर्ली टेंपल रेसिपी शोधून काढली. समीक्षकांनी त्याला ९.३ रेटिंग दिले. हे सर्व लिओ केलीमुळे घडल्याने त्याला ‘शर्ली टेंपल किंग’ अशी ओळख मिळाली.

लिओ केलीच्या पेय समीक्षणाचा प्रभाव 

लिओ केली हा लहानपणापासूनच पेयांचे समीक्षण करत आहे. इंस्टाग्रामवर आणि कधीकधी छोट्या व्हिडिओंमध्ये तो रंग, कार्बोनेशन आणि ग्रेनेडाइनची गुणवत्ता यासारख्या घटकांचा विचार करून ‘शर्ली टेंपल’ला १० पैकी गुण देतो. इंटरनेटवर मत मांडणाऱ्या अन्न समीक्षकांमध्ये लिओ केलीची भर पडली आहे. त्याचे पेय समीक्षण इतरोच्या तुलनेत अधिक योग्य ठरत असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे.

लहानपणापासून आवड

लिओने २०१९ मध्ये आपले इंस्टाग्राम खाते सुरू केले. जेव्हा तो सहा वर्षांचा होता तेव्हा त्याने त्याचे पहिले पेय समीक्षण चित्रित केले आणि तेव्हा त्याचे खात्याचे नाव समोर आले. न्यूपोर्टमधील गुर्नी या लक्झरी रिसॉर्ट येथील तलावाजवळ ‘शर्ली टेंपल’ची पीत असताना लिओने त्याच्या वडिलांना व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितले. त्याचे वडिल टॉम केली हे क्रीडा आणि मनोरंजन एजन्सीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांना वाटले की तो व्हिडिओ हिट होईल. लिओचे व्यक्तिमत्त्व जन्मल्यापासूनच लोकांना आवडते, असेही त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. त्याचे पालक त्याचे इंस्टाग्राम खाते व्यवस्थापित करतात. त्याचे दोन लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत. पेय समीक्षण हे त्याचे काम नाही, त्याचा छंद आहे असे त्याची आई लिसा केली म्हणते. तो एक मुलगा, एक मोठा भाऊ आणि एक विद्यार्थी देखील असल्याचे त्या आवर्जुन सांगतात.

काय आहेत लिओचे निकष?

लिओचे निकष सरळ आहेत. तो लिंबू सोडा पेक्षा आले सिरपला पसंती देतो आणि प्लास्टिकच्या कपमध्ये पेय देणे, दुकानातून विकत घेतलेले ग्रेनेडाइन वापरणे किंवा तीन पेक्षा कमी चेरींनी सजवणे यासारख्या विविध चुकांसाठी गुण वजा करतो. त्याचे रेटिंग प्रामाणिक ठेवण्यासाठी, तो सामान्यत: पूर्वसूचना न देता रेस्टॉरंटला भेट देतो आणि त्याचे पालक त्याच्या पुनरावलोकनांमधील सर्व जेवणासाठी पैसे देतात. अधूनमधून, तो लो-ब्रिम कॅप किंवा बनावट मिशा घालून जेवतो (ज्यामुळे त्याची ओळख होणार नाही). आतापर्यंत फक्त एकाच ‘शर्ली टेंपल’ला त्याने पूर्ण गुण दिले ते म्हणजे मिडटाउनमधील लोटे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमधील ‘शर्ली टेंपल’. २०१९ मध्ये, लिओने लाँगहॉर्न स्टीकहाऊसमध्ये शर्ली टेंपलला शून्य चेरी असल्याबद्दल पाच गुण दिले. चार महिन्यांनंतर जेव्हा हे पुनरावलोकन प्रसारित झाले, तेव्हा अधिकाऱ्यांनी याची नोंद घेतली. आतापर्यंत ५०० हून अधिक ठिकाणी लिओच्या समीक्षणामुळे रेसिपीमध्ये सुधारणा झाली आहे. 

काय आहे शर्ली टेंपल?

शर्ली टेंपल मॉकटेल हे आले, लिंबू सोडा, किंवा लिंबूपाणी, ग्रेनेडाइन आणि चेरीपासून बनवलेले अल्कोहोल नसलेले पेय आहे. हे बहुतेकदा अल्कोहोलिक कॉकटेलला पर्याय म्हणून दिले जाते. काही ठिकाणी लिंबू सोडाऐवजी संत्र्याचा रस देखील वापरला जात आहे. १९३० आणि १९४० च्या दशकात चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या बाल अभिनेत्री, गायिका आणि नर्तिकेच्या नावावरून शर्ली टेंपलचे नाव ठेवण्यात आले आहे.

Story img Loader