पॅरिसमधील ८६० वर्षे जुने ऐतिहासिक नोत्र दाम पाच वर्षांनंतर, ७ डिसेंबरला पुन्हा सुरू झाले. रविवारी तेथे सामूहिक प्रार्थनाही झाली. केवळ फ्रान्सच नव्हे तर इतर देशांसाठीही ही घटना महत्त्वाची आहे.

ऐतिहासिक कॅथेड्रल पुन्हा सुरू

पॅरिसचे आर्चबिशप लॉरेंट अलरिच यांनी ७ डिसेंबर रोजी एका शानदार सोहळ्यामध्ये ऐतिहासिक नोत्र दाम कॅथेड्रलचे दरवाजे उघडले. ही केवळ फ्रान्ससाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची घटना आहे. जगभरातील रसिकजन, भाविक आणि संस्कृतीचे भान असलेल्या लोकांचे या सोहळ्याकडे लक्ष होते. यावेळी प्रार्थना म्हटली गेली, गीत गायले गेले आणि कॅथेड्रलच्या पुनर्बांधणीमध्ये हात लागलेल्या असंख्य व्यक्तींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सोहळ्याला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ आणि जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. या निमित्ताने अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की, इलॉन मस्क आणि ब्रिटनचे युवराज विल्यम यांच्यासह अनेक महत्त्वाचे जागतिक नेते एकत्र आले.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
mahakumbh 2025 kumbh mela kicks off with paush poornima in prayagraj
‘महाकुंभ’ आज पासून ; पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान; ४५ दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
article about ugc revises vice chancellor selection process
समोरच्या बाकावरून : मांजराच्या पावलांनी ती येते आहे…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर

नोत्र दामचे ऐतिहासिक महत्त्व

“पुढेमागे ही वास्तू नष्ट झाली तर त्याच्या तोडीचे काहीही उभे नसेल,” असे कॅथेड्रलचे १२व्या शतकातील नॉर्मन महंत रॉबर्ट डी थोरिग्नी यांनी म्हटले होते. पुढे युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माची गाथा सांगणारी अनेक कॅथेड्रल आणि चर्च उभे राहिले. त्यापैकी अनेकांनी नोत्र दामवरून प्रेरणा घेतली होती असे म्हटल्यास अतिशोयक्ती होणार नाही. पॅरिसच्या सीन नदीमध्ये इल दे ला सिते या बेटाच्या अर्ध्या भागावर, २० हजार चौरस फूट जागेमध्ये उभारलेल्या नोत्र दामची भव्यता आणि सौंदर्य यामुळे ते फ्रान्समधील आणि फ्रान्सबाहेरील धार्मिक आणि बिगर-धार्मिक, आध्यात्मिक आणि नास्तिक अशा सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करत राहिले. ही वास्तू प्रार्थना, मानवी कल्पकतेचे उदाहरण आणि लवचिकतेचे प्रतीक असल्याचे म्हटले जाई. १५ एप्रिल २०१९ रोजी त्याच्या घुमटाला लागलेल्या आगीमध्ये त्याचे छत आणि मनोरा नष्ट झाले, त्यावेळी फ्रान्समधील, युरोपमधील आणि त्यापलिकडील इतर देशांमधील लोक हळहळले होते.

हेही वाचा :विश्लेषण : सीरियातील बंडानंतर इस्रायलने गोलन पठाराचा ताबा का घेतला? हा प्रदेश पश्चिम आशियासाठी का महत्त्वाचा?

कॅथेड्रल आणि चर्च यांमधील फरक

संस्कृती आणि धर्मसत्तेचा विचार करता, कॅथेड्रल हे चर्चेपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असते. ख्रिश्चन भाविकांची उपासना, प्रार्थनेसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतीला चर्च म्हणतात. पाद्री किंवा पाद्रींचा गट चर्चचे व्यवस्थापन पाहतात. कॅथेड्रल हे बिशपची गादी असलेले चर्च असते. धर्मप्रांताचे मध्यवर्ती प्रार्थनास्थळ म्हणून ओळखले जातात. बहुतेक ठिकाणी कॅथेड्रलचा समावेश त्यांच्या भागातील सर्वात जुन्या इमारतींमध्ये होतो. तेथील समुदायाची संस्कृती आणि वारसा यासाठी त्याचे महत्त्व अधिक असते.

पुरातन सौंदर्याला नवी झळाळी

कॅथेड्रलची नवी तेजस्वी गुणवत्ता हे त्याचे सर्वात चित्तवेधक वैशिष्ट्य म्हणता येईल. अनेक वर्षे साचलेल्या काजळीमुळे आलेली अंधारी, स्तंभांवरील शिल्पकामाचा फिकटलेपणा आता दूर झाला आहे. त्याशिवाय १९व्या शतकात पुनर्बांधणी केलेल्या चॅपेलच्या भिंतींवरील ऐतिहासिक चित्रेही अबाधित राखण्यात यश आले आहे. त्याचवेळी कॅथेड्रलमध्ये काही बदलही करण्यात आले आहेत. मजबूत ओक लाकडाने तयार केलेल्या आसनांची संख्या १,५०० इतकी आहे. पादरींचे पोषाखही बदलले आहेत.

मॅक्राँ यांचा निर्धार

पाच वर्षांपूर्वी नोत्र दामच्या घुमटाला आग लागली तेव्हा मॅक्राँ हेच अध्यक्ष होते. कॅथेड्रलपासून सुरक्षित अंतरावर उभे राहून ते उघड्या डोळ्यांनी, विषादाने घुमट भस्मसात होताना पाहत होते. त्याचवेळी त्यांनी आपण पाच वर्षांमध्ये कॅथेड्रल पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हा ती अनेकांना अवास्तव वाटली होती. पण ती प्रत्यक्षात आणण्यात मॅक्राँ यांच्यासह फ्रान्सच्या हजारो कुशल कारागिरांना यश आले. दोन हजार कारागिरांनी मुख्यत्वे छिन्नी, हातोडा आणि हातांचा वापर करून काम पूर्ण केले.

हेही वाचा :खवय्यांच्या पसंतीमध्ये भारत जगात १२वा… चवदार प्रांतांमध्ये पंजाब ७वा, महाराष्ट्र ४१वा…‘टेस्ट ॲटलास’ची खुमासदार क्रमवारी!

विशेष खबरदारी

पुनर्बांधणी करताना कॅथेड्रलची मूळ रचना आणि त्याच्या बांधकामाच्या तंत्रज्ञानाला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. चौरसाकृती तुळया घडवताना, लाकडी आसने तयार करताना विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. आग लागली तेव्हा कॅथेड्रलच्या रंगीत काचांच्या खिडक्यांचे जतन करण्यात यश आले होते. त्याही स्वच्छ धुवून पुन्हा स्थापित करण्यात आल्या आहेत. घुमटामध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड आणि शिसाचा वापर करण्यात आला होता. आगीमध्ये लाकडाची राख झाली आणि शिसे वितळले. आता पुनर्बांधणी करताना पुढील ८६० वर्षे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतल्याचे या प्रकल्पाचे प्रमुखांनी सांगितले आहे.

पुनर्बांधणीचे वैशिष्ट्य

विशेष म्हणजे नोत्र दामच्या पुनर्बांधणीसाठी फ्रान्स सरकारला जवळपास काहीच खर्च करावा लागला नाही. ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याचे संकट टाळण्यासाठी फ्रान्समधील धनाढ्यांपासून जगभरातील सामान्यांपर्यंत निधी उभारणीला हातभार लावला. पुनर्बांधणीसाठी ७३.७० कोटी डॉलर इतका प्रचंड खर्च आला असून १५० देशांमधील तीन लाख ४० हजारांपेक्षा जास्त देणगीदारांनी तब्बल ८९.१० कोटी डॉलर इतका निधी उभा केला. आधुनिक इतिहासात फ्रान्सने यशस्वीपणे पूर्ण केलेले हे सर्वात मोठे पुनर्बांधणीचे काम आहे.

बदलते पर्यटन

आगीमुळे बंद पडण्यापूर्वी नोत्र दामला दरवर्षी १.२० कोटी लोक भेट देत असत, ते पुन्हा सुरू झाल्यानंतर हा आकडा वाढून दीड कोटीपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी नोत्र दामला प्रवेशशुल्क कधीच नव्हते. आताही विनातिकीट भेटीचा पर्याय खुला आहे. पण त्यासाठी रांगेत उभे राहण्याची तयारी हवी. अन्यथा काही शुल्क भरून ऑनलाईन तिकिट बुक करण्याची सोय आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरुवातीचे सहा महिने कॅथेड्रलमध्ये व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल, गटांना नाही. कॅथेड्रलची माहिती देणारे ॲप देखील सुरू करण्यात येत आहे.

हेही वाचा :Black Peter gold discovery: या ‘काळ्या’ मराठी माणसाने न्यूझीलंडमध्ये शोधली होती सोन्याची खाण; काय आहे इतिहास?

सांस्कृतिक महत्त्व

जागतिक पातळीवर संघर्ष कमी होत नसताना संपूर्ण जगाला बांधून ठेवणारी मानवी संस्कृती हीच एक गोष्ट असते. त्यामध्ये विविध प्रकारचे नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला आणि पाककृती असतात. नोत्र दाम कॅथेड्रल असते, लिओनार्दो दा व्हिन्सीची चित्रे असतात, आग्र्याचा ताजमहाल असतो, इजिप्तचे पिरॅमिड असतात, कैलासच्या लेण्या असतात, कोणार्कचे मंदिर असते. माणसाला माणसाशी जोडून ठेवणाऱ्या या सांस्कृतिक ठेव्यापैकी कशाचेही नुकसान झाले तरी शत्रू देशातील विचारी व्यक्तीही हळहळते. नोत्र दामचा घुमट आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर संपूर्ण जगाला वाटलेले दुःख ही त्याचीच प्रचिती होती आणि आता त्याची मूळ रूपात पुनर्बांधणी झाली असताना होणारा आनंदही एकाच जातीचा आहे.

nima.patil@expressindia.com

Story img Loader