जगातील सात खंडांमध्ये आता आठव्या खंडाची भर पडली आहे. शास्त्रज्ञांनी आता ‘झीलँडिया’ या ३७५ वर्षांपूर्वी ‘लुप्त’ झालेल्या खंडाचा शोध लावला आहे. हा आता जगातील आठवा खंड मानला जातो. भूकंपशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने ‘झीलँडिया’ किंवा ‘ते रिउ-ए-माउई’चा सुधारित नकाशा तयार केला आहे. ‘टेक्टॉनिक्स जर्नल’ या विज्ञानपत्रिकेत संशोधन अहवालात त्याचा तपशीलवार नकाशा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. मात्र या खंडाचा मोठा भूभाग हा प्रशांत महासागराखाली आहे. या सुधारित नकाशाने या ज्वालामुखीय पट्ट्याच्या (मॅग्मॅटिक आर्क) अक्षाचे स्थान दर्शवले आहे. त्यामुळे झीलँडिया खंड निर्मिती झाली आहे. तसेच येथे अनेक महत्त्वपूर्ण भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये सापडली. संशोधकांना समुद्राच्या तळातून मिळालेल्या खडकांच्या नमुन्यांतून मिळालेल्या माहितीद्वारे ही वैशिष्ट्ये समजली.
‘झीलँडिया’ नेमका कसा आहे?
‘झीलँडिया’ हा एक लांब, अरुंद भूभाग आहे. याचा उर्वरित बहुतांश भाग दक्षिण प्रशांत महासागरात बुडालेला आहे. सुमारे ९४ टक्के भाग पाण्याखाली गेला आहे, तर अवघा सहा टक्के भूभाग पाण्याच्या वर आहे. पाण्यावरील भूभागात ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणारा न्यूझीलंड हा देश आणि न्यू कॅलेडोनिया बेटांचा त्यात समावेश होतो. पश्चिमेला ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील केन पठारापर्यंत हा खंड पसरलेला आहे. न्यूझीलंड व्यतिरिक्त या खंडात ‘न्यू कॅलेडोनिया’सह ‘लॉर्ड हाऊ’ बेटाशी संबंधित अन्य ऑस्ट्रेलियन प्रदेशांचा समावेश आहे. त्याचे एकूण ४९ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असून, आकारमानाने हा खंड पूर्व आफ्रिकेतील मादागास्कर बेटाच्या सहापट आणि ऑस्ट्रेलियाच्या सुमारे निम्मा आहे. १६४२ मध्ये जेव्हा डच खलाशी हाबेल तस्मान दक्षिण गोलार्धात वसलेला एक विशाल खंड शोधण्याच्या मोहिमेवर गेला असताना या खंडाच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथम मिळाला. त्यानंतर २०१७ मध्ये भूवैज्ञानिकांच्या पथकाने त्याचा तपशीलवार शोध लावला. हा खंड सुमारे ५५ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या गोंडवन किंवा गोंडवाना या प्राचीन महाखंडाचा भाग होता. त्याने सध्या जगातील सर्वात लहान आणि सर्वात तरुण खंडाचा मान मिळवला आहे.
हेही वाचा : विश्लेषण: ऑक्टोबरातील चटके ‘हवामान बदला’चेच?
हा भूभाग खंड असल्याचा निष्कर्ष कसा?
गुरुत्वाकर्षणात पृष्ठभागाच्या बदलानुसार थोडे बदल होतात. या सूक्ष्म तरंग बदलांच्या नोंदीवरून पाण्याखालच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करता येतो. १९९० च्या दशकात व २०१४ च्या सुमारास उपग्रहांद्वारे मापन केले असता झीलँडियाचे अस्तित्व समजले. त्याची व्याप्तीही समजण्यास मदत झाली. त्यामुळे हा खंड असण्याच्या निष्कर्षास बळ मिळाले. या भूभागाचा बराच भाग पाण्याखाली सुमारे दोन किलोमीटर इतका खोल आहे. समुद्रतळाच्या इतर भागापासून या पृष्ठभागाची उंची सुमारे ११०० मीटर इतकी आहे. हा थर आजूबाजूच्या समुद्रतळापेक्षा वेगळा असल्याचेही भूशास्त्रीय विश्लेषणाद्वारे आढळले आहे. झीलँडियाचा थर हा शिलारसजन्य खडक, उष्णता व दाबामुळे रूपांतरित खडक तसेच गाळजन्य खडकांपासून तयार झाला आहे. एरवी समुद्राचा तळ प्रामुख्याने शिलारसापासून निर्मित खडकांचा असतो. २०१७ च्या अभ्यासात, या खडक नमुन्यांत वनस्पतींचे परागकण आणि उथळ पाण्यात आढळणाऱ्या प्राण्यांचे अवशेष सापडले. त्यावरून संशोधकांनी हा सर्व भूभाग पूर्वी पाण्याच्या वर असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
हा खंड शोधायला इतका वेळ का?
भूशास्त्रीय दृष्टिकोनातून ‘खंड’ म्हणण्यासाठी संबंधित भूभागाला स्वतःचे स्वतंत्र भूशास्त्रीय अस्तित्व हवे, तो सर्व बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला असावा. पुरेशा मोठ्या क्षेत्रफळाचा हवा. या निकषांची ‘झीलँडिया’ पूर्तता करतो. मात्र, या खंडाचा फार मोठा भाग महासागराखाली बुडाल्याने झीलँडियाचा पारंपरिक खंडांप्रमाणे व्यवस्थित अभ्यास करण्यात आला नाही. परिणामी त्याचे नेमके स्वरूप आणि संरचना शोधण्यात सातत्य राहिले नाही. माहितीत विसंगती राहिली होती. ९४ टक्के भूभाग पाण्याखाली असलेल्या या खंडाची न्यूझीलंडसारखी काही मूठभर बेटे त्याच्या महासागरात टिकवून आहेत. पृथ्वीच्या कवचातील वेगवेगळ्या भागांच्या हालचालींमुळे झीलँडिया अंटार्क्टिकापासून सुमारे दहा कोटी वर्षांपूर्वी आणि सुमारे आठ कोटी वर्षांपूर्वी गोंडवनापासून वेगळा झाला. त्यानंतर सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वी हा सर्व भाग पाण्याखाली गेला. काही काळानंतर त्यातील न्यूझीलंडसारखा प्रदेश पुन्हा पाण्याबाहेर आल्याचे अभ्यासक सांगतात.
हेही वाचा : हमासचा लष्करप्रमुख मोहम्मद देईफ कोण आहे? इस्रायलने त्याला अनेकदा मारण्याचा प्रयत्न का केला?
नवा अभ्यास काय सांगतो?
या खंडाच्या निर्मितीविषयी संशोधकांनी सांगितले, की आठ कोटी तीन लाख वर्षांपूर्वी भूगर्भीय घडामोडींतून तत्कालीन महाखंड गोंडवन विभाजित झाला. त्यामुळे आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या खंडांसह झीलँडियाची निर्मितीही झाली. ‘टेक्टॉनिक्स जर्नल’ या विज्ञानपत्रिकेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात मंगळवारी झीलँडियाचा तपशीलवार नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. संशोधन पथकाने सागराच्या तळातून आणलेल्या खडक आणि गाळाच्या नमुन्यांच्या संकलनाचाही अभ्यास केला. भूगर्भशास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञांच्या पथकाने या अहवालात नमूद केले, की निम्नपृष्ठ, गाळाचे खोरे आणि ज्वालामुखी खडकांचे महासागराच्या सीमेपर्यंत मानचित्रण केले गेलेला झीलँडिया हा पृथ्वीवरील पहिला खंड आहे. झीलँडिया हा खंड भारतीय उपखंडापेक्षाही मोठा आहे. त्याचे क्षेत्रफळ भारताच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत सुमारे दीडपट आहे. लघुखंडातच त्याचे वर्गीकरण करायचे झाल्यास त्याला जगातील सर्वांत मोठा लघुखंड म्हणता येईल.