Marathi Sahitya Sammelan 2025: २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणारे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी संमेलनाच्या तयारीचा अलीकडेच आढावा घेतला. यावेळी संमेलनाचे संयोजक आणि सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नाहर, समन्वयक डॉ. शैलेश पगारिया आणि त्यांची टीम उपस्थित होती.nआयोजन स्थळावरील सर्व प्रवेशद्वारं महापुरुषांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे नाव देण्यात आले आहे. तसेच, बाजीराव पेशवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्याही नावांचा समावेश करण्यात आलेला आहे. आयोजनस्थळी सुमारे ४,००० जणांची आसनव्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय नाहर यांनी दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे देशाच्या राजधानीत होणार असल्याने ही आनंदाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तालकटोरा या स्थळाचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी असलेला संबंध सर्वश्रुत आहे. याच ऐतिहासिक संबंधाचा घेतलेला हा आढावा.

पहिला बाजीराव

‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतातील ओळी आपण ऐकून असतो. किंबहुना राजकारणाच्या घडामोडींच्या अनुषंगाने अनेकदा या वाक्याचा उद्घोष केला जातो. याच ऐतिहासिक क्षणाची प्रचिती देणारी घटना पहिल्या बाजीरावामुळे अनुभवास आली होती आणि या घटनेचा थेट संबंध तालकटोराशी आहे. पहिला बाजीराव हा मराठा साम्राज्यातील एक उत्कृष्ट योद्धा, घोडदळ सेनानी आणि राज्यकारभारातील दूरदृष्टी असलेला कर्तबगार मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध होता. बाजीरावाचा जन्म १८ ऑगस्ट १७०० रोजी सिन्नर (नाशिक) येथे बाळाजी विश्वनाथ भट आणि राधाबाई यांच्या पोटी झाला. त्याचे नाव ‘विसाजी’ असे ठेवले गेले. त्याचे वडील बाळाजी विश्वनाथ हे छत्रपती शाहू महाराजांचे पहिले पेशवे होते. बाजीराव बालपणीच बाळाजी विश्वनाथ यांच्याबरोबर पुण्याजवळील सासवड येथे वास्तव्यास आला. तेथेच आपला भाऊ चिमाजी अप्पासह, बाजीराव याने मुत्सद्देगिरी आणि युद्धकौशल्य यांचे प्रशिक्षण घेतले. तो अनेकदा आपल्या वडिलांबरोबर युद्ध मोहिमांवर जात असे. सन १७२० साली अवघ्या १९ व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर छत्रपती शाहू महाराजांनी अन्य सरदारांचा विरोध असतानाही त्यास पेशवेपद दिले.

पेशवे पदाबरोबर आलेल्या जबाबदाऱ्या

बाजीराव पेशवा झाला त्या वेळी मराठी राज्याला चोहोबाजूंनी शत्रूंनी वेढले होते. दख्खनचा सुभेदार निजामुल्मुल्क १७२० मध्ये दिल्ली सोडून दक्षिणेस कायमचे ठाण मांडून बसला होता. त्याचा बंदोबस्त करणे, त्याच्याकडून दख्खनच्या चौथ-सरदेशमुखीस संमती मिळविणे, हे पेशव्याचे पहिले काम होते. त्याशिवाय मिरज, अहमदनगरसारखी ठाणी मोगलांच्या ताब्यात होती. तसेच पश्चिमेकडील प्रदेश सिद्दी आणि पोर्तुगीज यांनी बळकावला होता. तो मुक्त करणे आवश्यक होते. माळव्यात १७०० पासून मराठी फौजा फिरू लागल्या होत्या. त्याचा फायदा घेऊन दिल्ली दरबारात वर्चस्व स्थापन करण्याचीही गरज होती.

मुत्सद्दी धोरण

बाजीरावांनी शाहू महाराजांना पटवून दिले की, मुघल साम्राज्य उध्वस्त होत आहे आणि या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी त्यांना संधी द्यावी. त्यांनी मुघल साम्राज्याच्या मुळावर घाव घालण्याची आणि उत्तरेत विस्तार करण्याची परवानगी मागितली. सुप्रसिद्ध लेखक अनीश गोखले यांच्या ‘Battles of the Maratha Empire’ या पुस्तकात बाजीरावाच्या उत्तरेकडील मोहिमेवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. ते लिहितात, बाजीरावांनी आता थेट दिल्लीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. सादत खानच्या पत्रांमुळे आत्मविश्वास वाढलेल्या मुघल बादशाहाने थोडीशी निष्काळजी दाखवली होती. बाजीराव ग्वाल्हेरहून निघाले आणि आग्र्याच्या पूर्वेला १४-१५ दिवस राहून त्यांनी अधिक वेगाने दिल्लीकडे कूच केले. २८ मार्च १७३७ रोजी त्यांनी न्यूटिया, बारापुला आणि कालिका मंदिर (आजचे दिल्लीतील कालकाजी मंदिर) पार करून कुशकबंदी येथे छावणी टाकली. कुशकबंदी हे आजच्या नवी दिल्ली परिसरात होते. ते राष्ट्रपती भवनाच्या दक्षिणेला आहे.

दिल्लीचेही तख्त राखतो..

१ एप्रिल रोजी सादत खान आणि इतर मुघल सरदारांना बाजीरावांच्या दिल्लीकडे कूच करण्याची खबर मिळाली. मग हे तिन्ही मुघल सरदार आग्र्याहून मथुरामार्गे दिल्लीकडे निघाले. आता लाल किल्ला बाजीरावांच्या नजरेच्या टप्प्यात आला होता. त्यांचा आरंभीचा विचार संपूर्ण सैन्यासह दिल्लीवर हल्ला करून शहर लुटण्याचा, विध्वंस करण्याचा आणि ते आगीत जाळण्याचा होता. मात्र नंतर त्यांनी असा हल्ला न करण्याचा निर्णय घेतला. त्यामागची काही कारणही महत्त्वाची होती. दिल्ली ही सभोवतालच्या प्रदेशातील जमीनदार आणि सरदारांसह अनेक लोकांच्या भावनांशी जोडलेली होती. अचानक राजकारणाचा धागा तोडल्यास गंभीर राजकीय अडचणी निर्माण होऊ शकत होत्या. त्याशिवाय, मुघल बादशाह मोहम्मद शाह आणि खान दौऱान यांना एकमेकांविरुद्ध उभे करून मराठ्यांना अधिक फायदा मिळू शकत होता. शेवटी, मुघलांना सिंहासनावरून खाली उतरवणे शाहूंना मान्य नव्हते. तसेच, मुघल सैन्य संख्येने अधिक होते आणि हा लढा सोपा नव्हता. या कारणांमुळे बाजीरावांनी दिल्ली जाळण्याचा आपला मूळ विचार सोडून दिला आणि त्याऐवजी मुघल बादशाहाला अडचणीत टाकण्याचा आणि दिल्लीच्या आसपासचा प्रदेश जिंकून मराठ्यांचा प्रभाव वाढवण्याचा निर्णय घेतला.

मराठा व मुघल भिडले

२९ मार्च रोजी, मराठ्यांनी दिल्लीच्या उपनगरांमध्ये लूटमार केली. त्यामुळे मुघल बादशाहाला लाल किल्ल्याबाहेर काही हजार सैनिक तैनात करणे भाग पाडले. बाजीरावांनी मुघल सैन्याचा सामना करण्यासाठी मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, तुकोजी पवार आणि यशवंतराव पवार यांना पाठवले. सुमारे ८,००० सैनिक असलेल्या मराठा आणि मुघल सैन्यांची टक्कर रकाबगंज (आजच्या संसद भवनाच्या परिसरात) येथे झाली.

भारताच्या राजकारणावर दबदबा

रकाबगंज येथील युद्धात ४०० हून अधिक मुघल सैनिक ठार झाले आणि तितकेच जखमी झाले, तसेच अनेक मुघल सरदार मारले गेले. मराठ्यांनी मुघल तुकडीला जलद माघार घेऊन लाल किल्ल्याच्या भिंतींच्या आड लपण्यास भाग पाडले. यानंतर पेशवा बाजीरावांनी आपली छावणी तालकटोराजवळील मलचा या गावात हलवली (आज येथे इनडोअर स्टेडियम आहे). मुघल बादशाहाने कमरुद्दीन खानच्या नेतृत्वाखाली एक तुकडी पाठवली, त्याने पत्शाहपूरहून हल्ला केला होता. या लढाईत मराठ्यांनी अनेक घोडे, तोफा आणि एक हत्ती जिंकला. पेशवा बाजीराव यांच्या व्यापक मोहिमांमुळे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी संपूर्ण भारताच्या राजकारणावर दबदबा निर्माण केला. बाजीरावांच्या काळात मराठा साम्राज्य तुंगभद्रेच्या दक्षिणेला असलेल्या प्रदेशापासून ते यमुनेपर्यंत पसरले होते. गुजरातपासून छत्तीसगडपर्यंत मराठ्यांची सत्ता होती.

साहित्य, इतिहास आणि संस्कृतीचा संगम

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केवळ साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे आणि ऐतिहासिक संदर्भांनी नटलेल्या दिल्लीतील तालकटोरा येथे भरवले जाणार असल्याने त्याला एक वेगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी मिळणार आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या दिल्ली मोहिमेचा तालकटोराशी असलेला संबंध आणि मराठ्यांच्या शौर्याचा ठसा येथे उमटलेला होता. अशा ऐतिहासिक स्थळी मराठी साहित्य संमेलन होणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. साहित्य, इतिहास आणि संस्कृतीचा संगम घडवणाऱ्या या संमेलनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Story img Loader