ASI excavation in Ratnagiri: ओडिशाचा बौद्ध धर्माशी असलेला संबंध मौर्य सम्राट अशोकाने प्राचीन कलिंग साम्राज्यावर केलेल्या आक्रमणापासून सुरू होतो. परंतु, रत्नागिरीत (ओडिशा) भारतीय पुरातत्त्व खात्याने सुरु केलेल्या उत्खननामुळे नालंदाला टक्कर देणाऱ्या बौद्ध शिक्षणकेंद्रावर पुन्हा लक्ष केंद्रित झाले आहे. डिसेंबर महिन्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक पुरातत्त्वज्ञ डी. बी. गारनायक आणि त्यांच्या टीमने ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील तब्बल २००० वर्षे प्राचीन असलेल्या बौद्ध स्थळावर ६० वर्षांनंतर पुन्हा एकदा उत्खनन सुरू केले. बौद्ध संकुलाच्या अधिक भागाचा शोध घेणे आणि ओडिशाचा आग्नेय आशियाशी असलेला सांस्कृतिक संबंध सिद्ध करणारे भौतिक पुरावे मिळवणे, हा त्यांचा मुख्य हेतू आहे. आत्तापर्यंत हे मिशन अंशतः यशस्वी ठरले आहे. त्यांनी उत्खननातून एक प्रचंड मोठ्या आकाराचे बुद्धमस्तक, भव्य तळहाताची प्रतिकृती, प्राचीन भिंतींचे अवशेष शोधून काढले आहेत. हे अवशेष अंदाजे इ.स. ८ व्या आणि ९ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. बुद्धमस्तक साधारण ३-४ फूट उंच आणि तळहात ५ फूट आहे, असे उत्खनन पथकातील सदस्य आणि ओडिशा इन्स्टिट्यूट ऑफ मॅरिटाइम अँड साउथ ईस्ट एशियन स्टडीजचे सचिव तसेच बौद्ध इतिहासाचे अभ्यासक सुनील पटनायक यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. ते पुढे असेही म्हणाले की, “या अवशेषांच्या माध्यमातून या प्रदेशाचा समृद्ध इतिहास समजू शकतो.” या अवशेषांना विशेष महत्त्व आहे. ओडिशाचा बौद्ध धर्माशी ऐतिहासिक संबंध आहे. हा संबंध मौर्य सम्राट (इ.स.पू. ३०४-२३२) अशोकापासून सुरू होतो. अशोक हा बौद्ध धर्माचा एक महान संरक्षक मानला जातो. त्याने कलिंग साम्राज्यावर आक्रमण केल्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

या स्थळाची नोंद कधी करण्यात आली?

भुवनेश्वरपासून १०० किमी ईशान्येला उदयगिरी आणि ललितगिरीबरोबर ओडिशाच्या प्रसिद्ध डायमंड ट्रायँगलचा भाग असलेले रत्नागिरी (अर्थ: रत्नांची टेकडी) आहे. या स्थळाची नोंद प्रथम १९०५ साली करण्यात आली. हे स्थळ बिरुपा आणि ब्राह्मणी नद्यांच्या मध्ये टेकडीवर आहे. या स्थळावर शेवटचे उत्खनन १९५६ ते १९६१ दरम्यान झाले. या उत्खननाचे नेतृत्त्व पुरातत्त्वज्ञ देबाला मित्रा यांनी केले होते. त्या नंतर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या महासंचालक होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागात अनेक अवशेष सापडले. या अवशेषांमध्ये विटांचे स्तूप, तीन विहार संकुले आणि शेकडो स्मारक व अनेक छोटेखानी स्तूप यांचा समावेश आहे.

रत्नागिरी, ओडिशा मधील उत्खनन | एक्सप्रेस फोटो

या उत्खननामागील हेतू

गारनायक यांनी सांगितले की, अलीकडच्या उत्खननात अर्धवट दिसणाऱ्या रचना व काही शिल्प समोर आली आहेत. तसेच, शेजारच्या (उदयगिरी आणि ललितगिरी) स्थळांवर आढळलेले प्रार्थना सभागृह/चैत्य संकुल (पवित्र बौद्ध सभा किंवा प्रार्थना हॉल) येथेही आहे का, हे शोधणे आणि या स्थळावरील मृद्भांड संग्रहाविषयी(पुरातत्त्वीय स्थळांवर आढळणारी भांडी) जाणून घेणे. त्यावर याआधीच्या उत्खननात काम झालेले आहे की नाही, हे तपासणे आहे. “या प्रयत्नाचा उद्देश आग्नेय आशियातील किंवा त्यापलीकडील भौतिक संस्कृतीबाबत (भौतिक वस्तू आणि वास्तुकलेद्वारे अभ्यासली जाणारी संस्कृती) पुरावे शोधणे आहे. ज्याचा आत्तापर्यंत अभ्यास झालेला नाही. तसेच, या स्थळावरून सापडलेल्या प्रचंड बुद्धमस्तकाच्या सांस्कृतिक चौकटीचा शोध घेणे हेही आहे,” असे गारनायक यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

रत्नागिरी, ओडिशा मधील उत्खनन | एक्सप्रेस फोटो

ओडिशा, आग्नेय आशिया आणि बौद्ध धर्म

ओडिशाचा आग्नेय आशियातील देशांबरोबर प्राचीन काळापासून सागरी आणि व्यापारी संबंध होता. मिरी, दालचिनी, वेलदोडा, रेशीम, कापूर, सोने आणि दागिने हे कलिंग साम्राज्य आणि आग्नेय आशियामधील लोकप्रिय व्यापाराचे पदार्थ होते.

आजही राज्यात दरवर्षी बालीयात्रा (बालीसाठी प्रवास) या उत्सवाचे आयोजन केले जाते. हा उत्सव सात दिवस चालतो. यामुळे २,००० वर्षे जुन्या कलिंग आणि बाली तसेच जावा, सुमात्रा, बोर्निओ, बर्मा (म्यानमार) आणि सिलोन (श्रीलंका) यांसारख्या आग्नेय आशियातील प्रदेशांमधील सागरी आणि सांस्कृतिक संबंधांचे स्मरण होते. भगवान बुद्धांनी त्यांच्या आयुष्यात ओडिशाला भेट दिल्याचा कोणताही पुरावा नसला तरी कलिंगाने बौद्ध धर्म प्रसारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आग्नेय आशियाशी असलेल्या व्यापारीसंबंधांमुळे तपस्व आणि भल्लिक हे दोन व्यापारी बंधू भगवान बुद्धांचे पहिले शिष्य झाले अशी कथा सापडते. हे दोन्ही बंधू उत्कल (ओडिशाचे प्राचीन नाव) येथील होते. मौर्य सम्राट अशोकाने इ.स.पू. २६१ मध्ये कलिंगावर आक्रमण केले असे मानले जाते. परंतु, युद्धातील रक्तपातामुळे अशोक फारच व्यथित झाला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी बौद्ध धर्म फक्त आपल्या साम्राज्यातच नव्हे तर श्रीलंका, मध्य आशिया आणि आग्नेय आशियामध्येही प्रसारित करण्यासाठी मोठे योगदान दिले. ओडिशामध्ये बौद्ध धर्म विशेषतः ८वे ते १०वे शतकादरम्यान राज्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या भौमकारा राजवटीच्या काळात भरभराटीला आला असे म्हटले जाते.

रत्नागिरी; प्राचीन बौद्ध शिक्षणाचे केंद्र

रत्नागिरीचा इतिहास ५वे ते १३वे शतक या कालखंडादरम्यानचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मूर्तीविज्ञान शास्त्रातील तज्ज्ञ आणि ओडिशाच्या कला तसेच बौद्ध स्थळांचे अभ्यासक थॉमस डोनाल्डसन हे पूर्वी क्लीव्हलँड विद्यापीठाचे प्राध्यापक होते. यांच्या मते रत्नागिरी हे शिक्षण केंद्र म्हणून नालंदाला स्पर्धा देणारे होते. काही तिबेटी ग्रंथांमध्ये उल्लेख सापडतो की, महायान आणि तंत्रयान या बौद्ध पंथांची उत्पत्ती येथे झाली होती. मात्र, भारतीय पुरातत्त्व खात्याने ललितगिरीसारख्या स्थळांकडे लक्ष केंद्रित केल्यानंतर राज्यातील सर्वात प्राचीन बौद्ध विहार सापडले. त्यामुळे रत्नागिरीचे उत्खनन काही काळासाठी मागे पडले. गारनायक यांनी या स्थळाकडे पुन्हा लक्ष वेधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मते, “या स्थळावरील अनेक रचना अंशतः दिसत होत्या आणि त्यांचे उत्खनन होणे गरजेचे होते.”

ओडिशामध्ये १०० पेक्षा अधिक प्राचीन बौद्ध स्थळं आहेत. ओडिशा हे एकेकाळी बौद्ध शिक्षणाचे मोठे केंद्र होते. या शोधांवरून असे सूचित होते की, हे ठिकाण (रत्नागिरी) प्राचीन काळी बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते. काही संशोधनावरून असे दिसते की, प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्षू आणि प्रवासी ह्युएन त्सांग यांनी इ.स. ६३८-६३९ मध्ये ओडिशाला भेट दिली होती. त्यांनी कदाचित रत्नागिरीला देखील भेट दिली असेल असे काही अभ्यासक सुचवतात. या नवीन उत्खननामुळे विविध कालखंडातील जीवनशैली, संस्कृती, धर्म, कला आणि वास्तुकलेबाबत अधिक प्रकाश पडेल आणि या स्थळावर ५ व्या शतकापूर्वीचे प्राचीन अवशेष होते का, हेही स्पष्ट होईल. रत्नागिरी येथील उत्खनन अजून एक-दीड महिना सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जर भारतीय पुरातत्त्व खात्याला या ठिकाणी उत्खननाची गरज आहे असे वाटले तर त्यानुसार पुढील पावले उचलली जातील,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A colossal buddha head a giant palm unearthed amid asi excavation in ratnagiri svs