चुकीच्या पद्धतीने विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांना आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महापालिकेने स्थानक परिसरातील शिवाजी महाराज पथावर टायर किलर बसविले आहे. या टायर किलरमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचे चाक पंक्चर होते. टायर किलरचा प्रयोग यापूर्वी २०१८ मध्ये पुण्यात झाला होता. परवानगीविना हे टायर किलर बसविण्यात आले होते.
याची दखल घेऊन तेथील पोलिसांनी हे टायर किलर काढून टाकले होते. पुण्यानंतर ठाण्यात प्रयोग होत असताना आता काही टायर किलरचा चांगला परिणाम होत असल्याचे म्हणत आहेत. तर काही त्यास विरोध करत आहेत. त्यामुळे टायर किलरचा प्रयोग ठाण्यात यशस्वी होणार का, की पुण्याप्रमाणे हा प्रयोग ‘पंक्चर’ होणार हादेखील प्रश्न आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टायर किलर काय असते? 

परवानगी नसूनही अनेकदा वाहन चालक विरुद्ध दिशेने (राँग-साइड) वाहतूक करतात. त्यामुळे या वाहनांना अटकाव करण्यासाठी काही वर्षांपूर्वी टायर किलर हे तंत्रज्ञान आले आहे. गतिरोधकाप्रमाणे हे टायर किलर असतात. त्यामध्ये लहान आकारांच्या लोखंडी टोकदार यंत्र असते. हे यंत्र अगदी लहान आकाराच्या सुळ्याप्रमाणे असते. योग्य दिशेने वाहतूक करणारा चालक या टायर सुळ्यांवरून गेल्यास हे सुळे वाहनाच्या वजनाने खाली जातात. परंतु विरुद्ध दिशेने वाहतूक करणारा चालक त्याठिकाणी आला, तर हे सुळे चाकामध्ये शिरून वाहनाचे नुकसान करतात. 

टायर किलर ठाण्यात का?

ठाणे शहरात मागील १५ ते २० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले. असे असले तरी रस्ते अत्यंत अरुंद आहेत. एखाद्या ठिकाणी कोंडी झाल्यास वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. त्यामुळे शहरात कोंडीची समस्या निर्माण होते. सप्टेंबर २०२४ मध्ये ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि इतर प्राधिकरणांची कोंडीच्या समस्येबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये शहरात विरुद्ध दिशेने वाहतूक होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या ठिकाणी टायर किलर बसविण्याचे महापालिकेने निश्चित केले होते. त्यानुसार ठाण्यात टायर किलरचा पहिला प्रयोग शिवाजी महाराज पथावर करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर मार्गावरही टायर किलरचा प्रयोग होण्याची शक्यता आहे. 

टायर किलरला विरोध का? 

ठाण्यात टायर किलर बसविल्यानंतर आता पादचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे. टायर किलर बसविल्यानंतर अनेक पादचारी चालताना जखमी झाल्याचे कळते आहे. त्यानंतर धर्मराज्य पक्षासह काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर काही नागरिकांनी हा प्रयोग योग्य असल्याचे म्हणतात. विरुद्ध दिशेने रिक्षा चालक वाहतूक करतात. त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेवर बसत असतो. पादचाऱ्यांना पदपथ असूनही ते रस्त्यावरून चालतात. टायर किलरकडे दुर्लक्ष्य झाल्यास नागरिक जखमी होण्याचे प्रकार घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

टायर किलरचा प्रयोग अयशस्वी का?

भारतात अनेक ठिकाणी टायर प्रयोग झाले होते. पुण्यामध्ये एका ठिकाणी अशा प्रकारे टायर किलरचा प्रयोग झाला होता. अवघ्या आठवड्यातच वाहतूक पोलिसांनी हा प्रयोग धोकादायक असल्याचे म्हणत हे टायर किलर काढले होते. शहरात अनेक पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरुन पायी ये-जा करतात. टायर किलरमुळे एखादी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे प्रयोग अयशस्वी ठरण्याची शक्यता अधिक आहे. 

टायर किलरला पर्याय काय? 

ठाणे शहरात महापालिका आणि वाहतूक पोलिसांना टायर किलर बसविण्याची आवश्यकता का भासली हा प्रश्नदेखील येथे उपस्थित होतो. ठाणे शहरात काही मुजोर वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतूक करतात. या वाहन चालकांवर आता वचक राहिलेला नाही. दुसरीकडे वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळही तुरळक आहे. विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु ही अमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे या टायर किलरच्या प्रयोगामुळे सिद्ध झाले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात ई-चलान यंत्राद्वारे कारवाई होत असते. ई-चलानचा दंड तात्काळ भरण्याची सक्ती नाही. त्यामुळे बेशिस्त वाहन चालक दंड भरणे टाळत राहतात आणि नियमांचे उल्लंघन सुरूच राहते. जर वाहन चालकांनी शिस्तीने वाहने चालविली आणि वाहतूक पोलीस महत्त्वाच्या चौकात उभे राहून कारवाई करू शकले तर या टायर किलरची कोणतीही आवश्यकता राहणार नाही.