अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामधील बटलर येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत माथेफिरूंकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष आणि पक्षाच्या अध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांना लक्ष्य करून राजकीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अब्राहम लिंकन यांच्यासह चार अध्यक्षांची हत्या, तर तीन अध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आले. १७७६ मध्ये देशाच्या स्थापनेपासून आतापर्यंत घडलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांविषयी…

अब्राहम लिंकन यांची हत्या…

अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराला बळी ठरलेले पहिले राष्ट्राध्यक्ष होते अब्राहम लिंकन. जगाला लोकशाहीची व्याख्या समजावणाऱ्या आणि कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी आजीवन लढा देणाऱ्या या महान नेत्याची १८६५ मध्ये हत्या करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे पहिले राष्ट्राध्यक्ष असलेले लिंकन हे अमेरिकी गृहयुद्धाच्या काळात पदावर होते. लिंकन यांनी गुलामगिरी पद्धतील तीव्र विरोध केला होता. गुलामगिरीवर लढल्या गेलेल्या गृहयुद्धादरम्यान लिंकन यांनी कॉन्फेडरेशनमध्ये गुलामांना स्वातंत्र्य देणारा ‘मुक्ती जाहीरनामा’ जारी केला. १४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड्स नाट्यगृहात ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे विनोदी नाटक पाहण्यास लिंकन पत्नीसह गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूने जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्याने प्रवेश केला. त्याच्या खिशात डेरिंजर नावाचे पिस्तूल होते. बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. लिंकन यांना वैद्यकीय उपचारासाठी नाट्यगृहापासून रस्त्याच्या पलीकडील एका घरात नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर बूथ पळून जाण्यास यशस्वी ठरला. त्यानंतर १२ दिवसांनी व्हर्जिनियातील बॉलिंग ग्रीनजवळील एका गोठ्यात लपून बसलेल्या बुथचा पोलिसांनी माग काढला आणि त्याला ठार केले.

Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
electing Donald Trump as the President of the United States for the second time
दुसरे ट्रम्पपर्व आणि भारत
Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?
Donald Trump won the US presidential election
अमेरिकेत पुन्हा ट्रम्प! अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड; कमला हॅरिस यांचा धक्कादायक पराभव
Ramdas Athawale On US Election Results 2024 :
Ramdas Athawale : ‘डोनाल्ड ट्रम्प आणि मी ‘रिपब्लिकन’ पक्षाचेच’, रामदास आठवलेंची मिश्किल टिप्पणी!
Donald Trump
विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक समुदायाला धास्ती का वाटते? शांतता, पर्यावरण, आर्थिक मदतीचे मुद्दे बासनात?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

हेही वाचा…Donald Trump Rally Firing : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न… हल्ल्यामागे कोण?

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या हत्या व प्रयत्न

अमेरिकेचे २० वे अध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचीही हत्या करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांतच गारफील्ड यांना ठार मारण्यात आले. २ जुलै १८८१ मध्ये न्यू इंग्लंडला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी ते वॉशिंग्टनमधील रेल्वे स्थानकातून जात असताना चार्ल्स गुइटो नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अलेक्झांडर ग्रॅहम बेल या दूरध्वनी शोधकाने राष्ट्राध्यक्षांसाठी खास डिझाइन केलेल्या उपकरणाचा वापर करून गारफिल्डच्या छातीत अडकलेली गोळी शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेले गारफिल्ड कित्येक दिवस व्हाइट हाऊसमध्ये अंथरुणावर पडून होते. अखेर अडीच महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोषी आढळलेल्या गुइटोला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. विल्यम मॅककिन्ली यांचीही १९०१ मध्ये हत्या करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये बफेलो येथे भाषण केल्यानंतर जमलेल्या नागरिकांशी हात मिळवत असताना एका व्यक्तीने त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या. डॉक्टरांनी मॅककिन्ली बरे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र गोळ्या जखमांमुळे गँगरीन झाल्याने मॅककिन्ली यांचा मृत्यू झाला. लिओन क्झोल्गोझ नावाच्या बेरोजगार तरुणाने हत्येची कबुली दिली. या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानंतर क्झोल्गोझला विजेच्या खुर्चीत ठार मारण्यात आले. जॉन एफ. केनेडी या तरुण राष्ट्राध्यक्षांची १९६३ मध्ये डॅलस शहरात हत्या करण्यात आली. खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ली हार्वे ओस्वाल्ड या व्यक्तीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला. मात्र खटल्याची सुनावणी होण्यापूर्वीच जॅक रूबी नावाच्या हल्लेखोराने गोळ्या झाडून ओस्वाल्डची हत्या केली. १९६८ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचीही हत्या करण्यात आली. पाच वर्षांपूर्वी हत्या करण्यात आलेले राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे बंधू होते.

राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न

१९७४ ते १९७७ या काळात अध्यक्षपदी असणाऱ्या जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड यांच्या हत्येचे दोन वेळा प्रयत्न करण्यात आले. मात्र दोन्ही घटनांमध्ये फोर्ड यांना इजाही झाली नाही. सॅक्रामेंटो येथे कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरच्या बैठकीला जात असताना क्रूरकर्मा चार्ल्स मॅन्सनचे शिष्य असलेल्या लिनेट ‘स्क्विकी’ फ्रॉम याने रस्त्यावर गर्दीत धक्कबुकी करत पिस्तूल बाहेर काढले आणि फोर्ड यांच्याकडे बोट दाखवून इशारा केला. गोळीबार झाला नसला तरी या प्रकरणात फ्रॉमला तुरुंगवासाची शिक्षा झाली. या घटनेनंतर १७ दिवसांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील एका हॉटेलबाहेर सारा जेन मूर नावाची एक महिला फोर्डशी भिडली. तिने त्यांच्या दिशेने एक गोळी झाडली. मात्र ती चुकली. दुसरी गोळी झाडण्याआधीच तिला ताब्यात घेण्यात आले आणि तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. अमेरिकेचे ४० वे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावरही हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. वॉशिंग्टन डी. सी. येथे आपले भाषण संपल्यानंतर ताफ्याकडे जात असताना गर्दीत असलेल्या जॉन हिंकले कनिष्ठ या व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात रेगन बचावले. हिंकलेला दोषी ठरवण्यात आले, मात्र मनोरुग्ण असल्याने त्याला मानसिक रुग्णालयात ठेवण्यात आले. जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यावरही २००५ मध्ये हल्ला करण्यात आला होता. जॉर्जियाचे अध्यक्ष मिखाइल साकाशविली यांच्यासमवेत तिबिलिसी येथे एका सभेत बुश सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर हातबॉम्ब फेकण्यात आला. कापडात गुंडाळलेल्या हातबॉम्ब सुमारे १०० फूट अंतरावर कोसळला, त्यावेळी दोनही नेते बुलेटप्रूफ बॅरिअरच्या मागे होते. हातबॉम्बचा स्फोट झाला नसल्याने कोणीही जखमी झाले नाही.

हेही वाचा…डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अवघ्या २० वर्षीय तरुणाकडून गोळीबार, FBI ने पटवली ओळख!…

इतर आजी-माजी देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या हत्या

केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगातील अन्य देशांतही पदावर असताना राष्ट्रप्रमुखांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी हत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेले त्यांचे पुत्र राजीव गांधी यांना १९९१ मध्ये बॉम्बस्फोटात ठार मारण्यात आले. बांगलादेशचे संस्थापक आणि पुढे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान झालेले शेख मुजीबूर रहमान यांची १९७५ मध्ये ढाका येथे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह हत्या करण्यात आली. बांगलादेशमध्ये लष्करी उठाव होऊन सत्तांतर घडून आल्यानंतर हे हत्याकांड घडवण्यात आले. १९८१ मध्ये बांगलादेशचे तत्कालिन अध्यक्ष झियाउर रहमान यांचीही चितगावमध्ये हत्या करण्यात आली. पाकिस्तानमध्ये पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची १९५१ मध्ये तर लोकप्रिय पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची २००७ मध्ये आत्मघातकी हल्ल्यात हत्या करण्यात आली. श्रीलंकेमध्ये रणसिंघे प्रेमदासा यांची १९९३ मध्ये अध्यक्षपदी असताना हत्या करण्यात आली. २००३ मध्ये सर्बियाचे पंतप्रधान झोरान जिंदजिक यांची बेलग्रेडमध्ये हत्या करण्यात आली, तर जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांची २०२२ मध्ये निवडणूक प्रचारसभेत गोळ्या झाडून ठार करण्यात आले. इस्रायलचे माजी पंतप्रधान यित्झाक राबिन आणि स्वीडनचे माजी पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांचीही हत्या झाली.

sandeep.nalawade@expressindia.com