राज्य सरकारने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण येथे देशातील सर्वांत मोठे आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बंदरापर्यंतची मालवाहतूक अतिजलद आणि सुरक्षित व्हावी यासाठी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडण्याची निर्णय घेतला आहे. हे दोन प्रकल्प एकमेकांशी कसे जोडले जाणार आणि त्याचा फायदा कसा होणार, वाढवणची ‘समृद्धी’ कशी होणार याचा हा आढावा….
समृद्धी महामार्ग प्रकल्प नेमका कसा?
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरमधील अंतर कमी करण्यासाठी तसेच प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई ते नागपूर असा ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून समृद्धीची बांधणी केली जात आहे. या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामास २०१९ पासून सुरुवात झाली असून ७०१ किमीपैकी आतापर्यंत ६२५ किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आता लवकरच सप्टेंबर अखेरपर्यंत ७६ किमीचा शेवटचा इगतपुरी ते आमणे (ठाणे) टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते आमणे, भिवंडी असा प्रवास केवळ आठ तासांत पार करणे शक्य होणार आहे. समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाची भाग्यरेषा मानली जाते. या प्रकल्पामुळे राज्याचा आर्थिक, औद्योगिक विकास साधला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाशी राज्यातील उर्वरित जिल्हेही जोडले जावेत यासाठी नांदेड-जालना, गडचिरोली-भंडारा, नागपूर-गोंदीया आणि नागपूर-चंद्रपूर असा विस्तार केला जाणार आहे. असे असताना आता कोकणालाही समृद्धीशी जोडण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. याअंतर्गतच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे.
हेही वाचा >>>ऑलिम्पिक पदकांची खरी किंमत किती? २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक पदकांमध्ये काय वेगळेपण होते?
वाढवण बंदर प्रकल्पाची आखणी का?
महाराष्ट्रात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे बंदर म्हणजेच जेएनपीटी आणि मुंबई अशी दोन मोठी बंदरे आहेत. त्या बंदरांवर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होते. दोन्ही बंदरांची क्षमता आता संपत चालली आहे. अशा वेळी नवीन बंदराची बांधणी करणे गरजेचे आहे. मुंबई बंदराच्या विकासासाठी पुरेशी जागाच नाही. जेएनपीटी बंदराचीही तशीच अवस्था आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण येथे नवीन बंदर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदर बांधले जाणार आहे. ते कार्यान्वित झाल्यावर जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वांत मोठे बंदर ठरेल. अंदाजे ७६ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे, या प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. अशा वेळी आता वाढवण बंदराला राज्यातील अधिकाधिक जिल्ह्यांशी जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाचा विस्तार वाढवणपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘समृद्धी’ला वाढवणशी कसे जोडणार?
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारा समृद्धी महामार्ग आता कोकणातील पालघर जिल्ह्याशी जोडला जाणार आहे. राज्यातील सर्वात मोठे वाढवण बंदर उभारताना या बंदरापर्यंत राज्यभरातील मालवाहतूक अतिजलद वेगाने होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गातील महत्त्वाचा आंतरबदल असलेल्या इगतपुरीहून समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराशी जोडला जाणार आहे. त्यासाठी इगतपुरी ते वाढवण असा द्रुतगती महामार्ग समृद्धी महामार्ग विस्तारीकरणाअंतर्गत बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
इगतपुरी ते वाढवण द्रुतगती महामार्ग?
वाढवण बंदर समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी इगतपुरी ते वाढवण बंदर असा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग एकूण १२५ किमीचा असणार आहे. या महामार्गाची बांधणी एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. १२५ किमीपैकी इगतपुरी ते चारोटी (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) अशा ९० किमीच्या महामार्गाचे काम एमएसआरडीसी करणार आहे. चारोटी ते वाढवण अशा ३५ किमीची बांधणी एनएचएआय करणार आहे. त्यानुसार ९० किमीच्या महामार्गाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. येत्या काही दिवसांतच प्रस्ताव तयार होणार आहे. त्यानंतर तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
वाढवण द्रुतगती महामार्गाचा फायदा कसा?
इगतपुरी ते वाढवण बंदर महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा थेट कोकणशी जोडले जाणार आहे. नागपूर ते वाढवण, पालघर असा थेट प्रवास अवघ्या काही तासांत शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बंदर कार्यान्वित झाल्यास राज्यातील मालवाहतूक बंदरापर्यंत अतिजलद होणे शक्य होईल. सध्या इगतपुरी ते वाढवण प्रवासासाठी किमान चार तास लागतात. हा द्रुतगती महामार्ग झाल्यास इगतपुरी ते वाढवण अंतर दीड ते दोन तासात पार होणार आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. याची अंमलबजावणी होऊन महामार्ग कार्यान्वित होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. वाढवण बंदर बांधण्यास काही वेळ लागणार आहे. त्यामुळे नागपूर ते वाढवण थेट प्रवास अतिजलद होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.