Did a Hindu Poet Write Pakistan’s First National Anthem?: अलीकडेच दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या न्यूज १८ रायझिंग भारत समिटमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भूविज्ञान विभागाचे केंद्रीय राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी फारशा चर्चेत नसलेल्या एका ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले, १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पाकिस्तानला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी जे राष्ट्रगीत गायलं गेलं ते एका हिंदू कवीने म्हणजेच जगन्नाथ आझाद यांनी लिहिलं होतं. सिंह यांनी स्पष्ट केलं की, पाकिस्तान या वेगळ्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी कारण ठरलेल्या ‘मोहम्मद अली जिना’ यांनी देशाचं प्रारंभीचं राष्ट्रगीत लिहिण्यासाठी कवींच्या एका समितीची स्थापना केली होती. त्या यादीत आझाद यांचं नाव पाहून जिना म्हणाले, “पाहा, आपण हे ठेऊया. यामुळे एक संदेश जाऊ शकतो.” आझाद यांच्या गीताची सुरुवात ‘सर जमीन-ए-पाकिस्तान’ अशा ओळीने झाली होती. डॉ. सिंह पुढे म्हणाले, “अर्थातच नंतर हे गीत बदलण्यात आलं. त्यानंतर हफीज जालंधरी यांनी ‘जो आज कल है’ हे गीत लिहिलं.” १९१८ साली ईसाखेल, पंजाब येथे जन्मलेले जगन्नाथ आझाद हे उर्दू कवी आणि अल्लामा इकबाल यांच्या साहित्याचे अभ्यासक होते. १९४७ साली ऑगस्ट महिन्यात जिना यांनी त्यांना राष्ट्रगीत लिहिण्याचं निमंत्रण दिलं होतं.
डॉ. सिंह पुढे म्हणाले, आझाद यांनी पाच दिवसांत गीत लिहून पूर्ण केलं आणि ते तत्काळ मंजूर करून रेडिओवर प्रसारित करण्यात आलं. मात्र काही इतिहासकार या कथनाबाबतीत शंका व्यक्त करतात. २०११ साली ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात या कथेमागे ठोस पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं. स्वातंत्र्य समारंभादरम्यान राष्ट्रगीत प्रसारित झाल्याच्या कोणत्याही अधिकृत नोंदी उपलब्ध नाहीत. पाकिस्तानी लेखक अकील अब्बास जाफरी यांच्या ‘पाकिस्तान का कौमी तराना: क्या है हकीकत, क्या है फसाना’ या पुस्तकासह अनेक संशोधकांनी यासंदर्भात साशंक असल्याचे नमूद केले आहे. असं असल तरी सिंह यांनी आझाद यांचे विभाजनकाळातील वैयक्तिक अनुभवही सांगितले. “ते सांगायचे की, जेव्हा माझं राष्ट्रगीत तयार केलं जात होतं, तेव्हाच मी तिथून पळून जात होतो. काही मुस्लिम शेजारी आले आणि म्हणाले, ‘सर, तुमचं राष्ट्रगीत वाजतंय ही खूप मोठी गोष्ट आहे. पण, आम्हाला भीती आहे की, इथे सुरू असलेल्या दंगलींमध्ये तुम्हाला काही होऊ शकतं आणि आम्ही कदाचित तुमचं रक्षण करू शकणार नाही.’ अल्लामा इक्बाल यांचे जाणकार असलेले आझाद विभाजनानंतरही लेखन, प्रवास आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत राहिले. त्याच पार्श्वभूमीवर याविषयी नेमका वाद काय आहे? याचाच घेतलेला हा आढावा.
जगन्नाथ आझाद कोण होते?
जगन्नाथ आझाद हे तिलोकचंद मेहरूम यांचे पुत्र होते. पिता-पुत्र दोघंही कवी होते. आझाद हे मूलतः एक प्रगल्भ लेखक होते. त्यांच्या ‘आँखे तरस्तियाँ हैँ’ या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यात भेटलेल्या अनेक थोर व्यक्तींबद्दलच्या आठवणी लिहिल्या आहेत. हे पुस्तक १९८१ साली प्रकाशित झालं होत. या पुस्तकात त्यांनी सलाहुद्दीन अहमद या विलक्षण व्यक्तीबद्दल अनुभव लिहिला आहे. ते लिहितात, सलाहुद्दीन अहमद यांना बहुतेक लोक ‘मौलाना’ म्हणून संबोधायचे. सलाहुद्दीन अहमद हे उर्दूतील अग्रगण्य पत्रकार होते आणि त्यांचं मासिक ‘अदबी दुनिया’ १९३०-४० च्या दशकात सर्वाधिक सन्माननीय साहित्यिक मासिक मानलं जात होतं. या लेखात आझाद यांनी दिनांक १६ सप्टेंबर १९६६ रोजी लाहोरमधील आपल्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, स्वातंत्र्याचा दिवस जवळ येत होता. १४ ऑगस्ट १९४७ रोजी ते हिंदुबहूल रामनगर (लाहोर) या भागात राहणारे शेवटचे हिंदू होते. एके दिवशी मला कळलं की, मूळ साठ हजार लोकसंख्येपैकी आता फक्त मी एकटाच हिंदू शिल्लक राहिलो होतो. सगळे निघून गेले होते. अशा परिस्थितीत, १४ ऑगस्टच्या रात्री, मी लाहोर रेडिओवरून माझंच गाणं ऐकलं.” यानंतर त्यांनी संपूर्ण काव्य दिलं आहे. या काव्यात पाच कडवी होती. आझाद यांनी कधीच पाकिस्तानचं पहिलं ‘कौमी तराना’ किंवा ‘राष्ट्रीय गीत’ लिहिलं, असा दावा केला नव्हता. किंवा मोहम्मद अली जिना यांनी त्यांना गीत लिहिण्यास सांगितलं असंही त्यांनी कधी म्हटलं नव्हतं.
मग ही कथा कशी आणि का तयार झाली?
१९ जून २००५ रोजी ‘द हिंदू’ मध्ये लव पुरी यांच्या ‘A Hindu wrote Pakistan’s first national anthem’ या लेखात त्यांनी आझाद यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी म्हणजे २४ जुलै २००४ रोजी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी आझाद यांच्या मित्राचा दाखला दिला आहे. त्यांच्या मित्राने जिना यांनी आझाद यांना बोलावल्याचे सांगितले. पुरी यांनी हे गीत कराचीहून प्रसारित झालं असं म्हटलं, तर आझाद यांनी १९६६ मध्ये स्पष्टपणे लाहोर रेडिओचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या मुलाखतीनंतर खरा गोंधळ निर्माण झाल्याचे अनेकजण मानतात. २०१२ साली ‘जंग’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात डॉ. सफदर महमूद यांनी लिहिलं की, रेडिओ पाकिस्तानच्या कुठल्याही अभिलेखांमध्ये आझाद किंवा त्यांच्या गीताचा उल्लेख सापडत नाही. मात्र, अहमद नदीम कासिमी आणि झफर अली खान यांच्या कविता त्यांना सापडल्या. महमूद यांनी जिना यांचे सहाय्यक अत्ता रब्बानी यांचाही संदर्भ दिला आहे. अत्ता रब्बानी म्हणतात, जगन्नाथ आझाद नावाच्या व्यक्तीची कायदे-आझमशी कधीच भेट झाली नाही, ना कायदे-आझम यांच्या तोंडून मी कधी हे नाव ऐकलं. महमूद हेही ठामपणे नमूद करतात की, आझाद १९५० च्या दशकात अनेकदा पाकिस्तानला भेटी देऊन गेले, पण त्यांनी कधीही असा कोणताही दावा केला नाही.
जगन्नाथ आझाद यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या वेळी ऐ सरज़मीन-ए-पाक हे गीत लिहिल्याचा दावा केला गेला आहे. त्यांच्या मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितले की, मोहम्मद अली जिना यांच्या विनंतीवरून त्यांनी हे गीत लिहिले होते आणि हे गीत १४ ऑगस्ट १९४७ रोजी रेडिओ पाकिस्तानवर प्रसारित झाले होते. परंतु, या दाव्याबाबत काही इतिहासकारांनी शंका व्यक्त केली आहे. रेडिओ पाकिस्तानच्या अभिलेखांमध्ये या गीताचा उल्लेख नाही, आणि आझाद यांनी त्यांच्या लेखनातही या गीताचा अधिकृत राष्ट्रगीत म्हणून उल्लेख केला नाही. अकील अब्बास जाफरी यांच्या संशोधनानुसार, आझाद यांनी हे गीत लिहिले असले तरी ते पाकिस्तानचे अधिकृत राष्ट्रगीत नव्हते. या प्रकरणात स्पष्ट पुरावे नसल्यामुळे आझाद यांनी लिहिलेले ‘ऐ सरज़मीन-ए-पाक. हे गीत पाकिस्तानच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण परंतु वादग्रस्त भाग राहिले आहे.