डासांमुळे साथीच्या रोगांचा फैलाव वेगात होतो. उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. डासांच्या निर्मूलनासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, फिलिपिन्सची राजधानी मनीला येथील एका गावात एक अनोखी मोहीम राबवली जात आहे. हे गाव आपल्या नागरिकांना मृत किंवा जिवंत डास पकडण्यासाठी पैसे आणि बक्षीस देत आहे, त्यामुळे या आशियाई देशाची जगभरात चर्चा होत आहे. डेंग्यूच्या उद्रेकामुळे ही मोहीम राबविण्यात येत आहे. नेमका हा प्रकार काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

डासांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनोखी मोहीम

हा अनोखा उपक्रम मध्य मनीलाच्या मांडलुयोंग शहरातील बरंगे ॲडिशन हिल्स या शहरी गावाने सुरू केला आहे. या गावातील एक लाखांहून अधिक रहिवासी गर्दीच्या परिसरात आणि निवासी कॉन्डोमिनियम टॉवरमध्ये राहतात. गावचे प्रमुख कार्लिटो सेर्नल यांनी प्रत्येक पाच डास किंवा डासांच्या अळ्यांसाठी एक फिलिपिन्स पेसो (दोन अमेरिकी सेंटपेक्षा कमी) बक्षीस जाहीर केले. ‘बीबीसी’च्या म्हणण्यानुसार, मोहीम सुरू होताच २१ जणांनी एकूण ७०० डास गावाच्या कार्यालयात आणले. मिग्युएल लबाग या ६४ वर्षीय सफाई कामगाराने ४५ डासांच्या अळ्यांचा एक जग दिला आणि त्याला नऊ पेसे (१५ सेंट)चे बक्षीस मिळाले. “ही खूप मोठी मदत आहे,” असे ते म्हणाले. ही मोहीम किमान महिनाभर चालणार आहे.

हा अनोखा उपक्रम मध्य मनीलाच्या मांडलुयोंग शहरातील बरंगे ॲडिशन हिल्स या शहरी गावाने सुरू केला आहे. (छायाचित्र-एपी)

डेंग्यूचे वाढते रुग्ण

फिलिपिन्समध्ये डेंग्यू संसर्गाची झपाट्याने वाढ होत असल्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ॲडिशन हिल्सच्या जवळच्या शहराने शनिवारी स्पष्ट केले की, या वर्षी लागण झालेल्या १,७६९ रहिवाशांपैकी १० लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, ज्यात सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. आणखी आठ क्षेत्रांमध्ये संभाव्य प्राणघातक विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. फिलिपिन्समध्ये या वर्षी १ फेब्रुवारीपर्यंत किमान २८,२३४ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. गावचे नेते सेर्नल हे नव्या मोहिमेबद्दल बोलताना ‘असोसिएटेड प्रेस’ला म्हणाले, “ही संकटाची घंटा आहे, त्यामुळे आम्ही हा मार्ग शोधला आहे.”

याबरोबरच ॲडिशन हिल्सने डेंग्यूचा सामना करण्यासाठी स्वच्छता, कालवे साफ करणे आणि स्वच्छता मोहिमांचीदेखील सुरुवात केली आहे. समीक्षकांनी असा इशारा दिला की, जर लोकांनी बक्षीसासाठी डासांची पैदास करण्यास सुरुवात केली तर हे तंत्र उलट होईल. सर्नल यांच्या म्हणण्यानुसार, हे शक्य नाही, कारण प्रकरणांमध्ये वाढ कमी होताच मोहीम थांबवली जाणार आहे. क्वेझॉन शहरातील दुसऱ्या गावातील अधिकारी डासांना खाण्यासाठी बेडकांना सोडण्याचा विचार करत होते.

फिलिपिन्सच्या आरोग्य विभागाने (DOH) बीबीसीला सांगितले, “डेंग्यूशी लढण्यासाठी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांच्या चांगल्या हेतूचे कौतुक आहे.” अधिकाऱ्यांनी लोकांना लांब बाह्यांचे शर्ट आणि पँट घालण्याचा सल्ला दिला आहे, कीटकनाशक वापरावे, त्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि पाणी साचू न देण्याचा सल्लाही दिला आहे. आरोग्य सचिव टीओडोरो हर्बोसा यांच्या म्हणण्यानुसार, डासांच्या उत्पत्तीची जागा स्वच्छ करणे आवश्यक आहे आणि ज्यांना संसर्गाची लक्षणे दिसून आली, त्यांनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

फिलिपिन्समध्ये डेंग्यू संसर्गाची झपाट्याने वाढ होत असल्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. (छायाचित्र-एपी)

डेंग्यूच्या संसर्गात वाढ होऊनही फिलिपिन्सने कमी मृत्यू दर राखण्यात यश मिळवले आहे असे ते म्हणाले. जूनमध्ये सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या आधी डेंग्यूची प्रकरणे अनपेक्षितपणे वाढली, कदाचित अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे डेंग्यूला कारणीभूत असलेल्या डासांची पैदास होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हवामानातील बदल कदाचित अवकाळी मुसळधार पावसास कारणीभूत ठरत आहे. डेंग्यू व्यतिरिक्त फिलिपिन्सच्या आरोग्य विभागाने अहवाल दिला की, पावसामुळे इन्फ्लूएंझा आणि लेप्टोस्पायरोसिसच्या संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हा आजार उंदरांमुळे आणि जेव्हा लोक पुराच्या पाण्यात जातात तेव्हा होतो.

डेंग्यू कसा पसरतो?

डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. हा रोग रक्त शोषणार्‍या डासांद्वारे पसरतो. प्रामुख्याने डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती हा रोग पसरवण्यास कारणीभूत असते. संसर्गाने ग्रस्त बहुतेक लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ आणि उलट्या, डोळ्यांमध्ये वेदना आणि शरीरावर पुरळ उठणे ही प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये संसर्गामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो आणि वेळेत उपाय न केल्यास मृत्यूदेखील होऊ शकतो. ‘द लॅन्सेट’च्या संपादकीयमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये दहापट वाढ झाली असल्याची माहिती आहे. “डेंग्यू हा एकमात्र संसर्गजन्य रोग आहे, ज्यामुळे वार्षिक मृत्यू वाढत आहेत,” असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

डब्ल्यूएचओच्या जागतिक डेंग्यूच्या आकडेवारीनुसार, या वर्षी ऑगस्टपर्यंत जगभरात १२ दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत आणि ६,९९१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात नोंदवलेल्या ५.२७ दशलक्ष प्रकरणांपेक्षा हा आकडा दुप्पट आहे. मागील वर्षापूर्वी गेल्या दशकभरात डेंग्यूची सुमारे दोन ते तीन लाख वार्षिक प्रकरणे नोंदवली गेली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, २०२४ मध्ये नोंदवण्यात आलेला ही विक्रमी संख्यादेखील जास्त असण्याची शक्यता आहे.

Story img Loader