भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा भटके कुत्रे आणि त्यांच्यापासून होणाऱ्या त्रासाची चर्चा सुरू झाली आहे. कुत्रा हा इमानी प्राणी, असे असले तरी कुत्रा आणि माणसाच्या या नात्याला हरताळ फासणाऱ्या अनेक घटना घडताना दिसतात, कधी त्याला माणूस कारणीभूत असतो, तर कधी कुत्रा! अगदी स्वातंत्र्यपूर्व इंग्रजांच्या काळातही अशीच एक घटना घडली होती, कुत्रा हा विश्वासू प्राणीच एका दंगलीला कारणीभूत ठरला होता, त्या प्रसंगाने मुंबईच्या आणि इंग्रजांच्या इतिहासाला एक कलाटणी दिली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्या घटनेचा आणि एकूणच माणूस व कुत्रा यांच्या संबंधांचा वेध घेणारे हे विश्लेषण.
सर्वाधिक प्राचीन नाते
मानवी उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यामध्ये मानवाने अनेक प्राणी माणसाळवले. या प्राण्यांनी तितक्याच तत्परतेने माणसाला साथ दिली. या प्रक्रियेत मानवाने जो प्राणी सर्वात प्रथम आपलासा केला तो म्हणजे ‘कुत्रा’, हे सत्य सांगणारे अनेक पुरातत्त्वीय पुरावे आज उपलब्ध आहेत. म्हणूनच माणसाचे आणि कुत्र्याचे नाते हे खास ठरते. माणूस आणि कुत्रा यांच्यातील ऋणानुबंध कालातीत आहे. कुत्र्याने नेहमीच आपले इमान राखले आहे. कुत्र्याने आपल्या मालकांसाठी प्राण अर्पण केल्याचेही अनेक दाखले इतिहासात उपलब्ध आहेत.
अधिक वाचा: भटक्या कुत्र्यांचे रक्षण करण्यास कायदे अपुरे? कपिलदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात का दाखल केली याचिका?
इंग्रजांचा भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय
अठराव्या शतकात ब्रिटिशांच्या बालेकिल्ल्याला या इमानी कुत्र्यांनी हादरवून सोडले होते. त्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर कुत्र्यांनी जागोजागी उच्छाद मांडला होता. इंग्रज या उपद्रवाने प्रचंड त्रस्त झाले होते. (आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही.) म्हणूनच इंग्रजांनी या त्रासातून मुक्ती मिळावी यासाठी एक वटहुकूम काढला. इंग्रजांच्या या हुकुमानुसार वर्षातून, ‘तीन ते चार महिने कुत्रे मारावेत, जो कुत्रे मारील त्यास सरकारकडून आठ आणे इनाम मिळेल’. दरवषी इंग्रज सरकार या हुकुमाची जाहिरात छापून नाक्यानाक्यावर लावत असे किंवा शहरात थाळी पिटून घोषणा देत असे. यामुळे कुत्रे मारणारे लोक, सरकारी शिपाई रस्त्यांवरील कुत्र्यांना सरकारी नियमानुसार मारत आणि बक्षिस मिळवीत. हा प्रकार अनेक वर्ष यशस्वीरीत्या पार पडत होता.
वटहुकूम कशासाठी?
इंग्रज सरकारच्या या कुत्र्यांना मारण्याच्या हुकुमामागील इतिहास गो. ना. माडगांवकरांच्या ‘ मुंबईचे वर्णन ‘ या पुस्तकात सापडतो. माडगांवकरांनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘एक सधन इंग्रज अधिकारी कुत्रा चावून निवर्तला, त्याने त्याच्या मृत्यूच्या अंतिम समयी इंग्रज सरकारकडे पुष्कळ द्रव्य देऊन अर्ज केला होता, या अर्जानुसार मुंबईत जागोजागी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असून हे कुत्रे येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या अंगावर धावून येतात, त्यामुळे दरवर्षी आपल्या अनामत ठेवलेल्या द्रव्याचे जे व्याज येईल ते खर्च करून भटक्या कुत्र्यांना मारून टाकावे. त्यानंतरच बहुदा इंग्रज सरकारने हा कायदा अमलात आणला असावा, असे माडगांवकर नमूद करतात.
अधिक वाचा: विश्लेषण: प्राणी का ठरतात मानवी वासनेचे बळी? काय आहे झूफिलिया आणि बेस्टीयालीटी?
या कायद्याची अंमलबजावणी कशी होत होती?
त्या कायद्याअंतर्गत कुत्र्यांना मारणारे लोक कुत्रा मारून पोलिसांकडे जमा करत होते. त्या बदल्यात त्यांना अर्धा रुपया बक्षिस म्हणून मिळत असे. दरवर्षी बरेच कुत्रे मारले जात, काही कुत्री मारून रस्त्यावर टाकली जात होती, यानंतर सरकारी कचऱ्याची गाडी मेलेली कुत्री गोळा करून त्यांना पुरत असे असा क्रम बरीच वर्षे चालू होता. नंतरच्या काळात ब्रिटिश सरकारने या कायद्यात परिवर्तन केले, नवीन बदलानुसार मेलेली कुत्री पोलीस चौकीत जमा करण्याऐवजी त्यांची शेपटी जमा करून बक्षीस घेऊन जावे, असा नियम करण्यात आला. उद्देश इतकाच की, कुत्राही मरेल, आणि मारणाऱ्याला बक्षीस ही मिळेल तसेच पोलीस चौकीत घाणही होणार नाही. परंतु परिणाम उलटाच झाला मुंबईतील उपद्रवी लोकांनी जिवंत कुत्रांच्या शेपट्या कापण्यास सुरवात केली आणि बक्षीस मिळविण्याचा घाट घातला. नाईलाजाने इंग्रज सरकारने जुनाच कायदा परत लागू केला. इंगज सरकारचा उद्देश काहीही असो, हे प्रकरण त्यांना भारी पडले हे मात्र नक्की.
पाळीव कुत्र्यांची पळवापळवी
१८३० सालच्या सुमारास सर जमशेटजी जीजीभाई , शेट मोती चंद खेमचंद , शेट देविदास मनमोहन दास इत्यादी नामांकीत पारशी मंडळींनी ‘कुत्र्यांना न मारता लांबवर कुठेतरी सोडून द्यावे’ अशी सरकारला विनंती केली. पारशी धर्मात कुत्रा हा पवित्र मानला जातो आणि उत्तर कार्यात त्याची गरज लागते. ज्या प्रमाणे हिंदू धर्मात कावळ्याचे महत्व आहे त्याच प्रमाणे पारशी धर्मात कुत्र्याचे महत्त्व आहे. म्हणूनच इंग्रज सरकारनेही ही विनंती मान्य करून कुत्र्यांना न मारता त्यांना पकडण्याचा हुकूम काढला आणि पकडलेल्या कुत्र्यांना शहराबाहेर वखारीत ठेवून, नंतर जहाजाने त्यांना शहराबाहेर सोडत. असा प्रकार काही काळ चालला. परंतु दुष्परिणाम असा झाला की रस्त्यावरचे कुत्रे संपले आणि बक्षिसाच्या हव्यासाने कुत्रे पकडणारे लोकांच्या दारातून, वाड्यातून कुत्रे पळवू लागले. कुत्रे पाळणाऱ्यांमध्ये पारशी लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
आणि कुत्र्यांवरून दंगल झाली!
दारातील कुत्रे पळवणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी पारशी समाजाने ७ जून १८३२ रोजी हरताळ पाळून, दंगा केला अशी ब्रिटिश कागपत्रांमध्ये नोंद आहे. या दिवशी त्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्या काळात इंग्रजांना लागणाऱ्या बहुतांशी अन्नपदार्थांचा पुरवठा याच पारशी दुकानांमधून होत होता, हे हेरूनच हरताळ योजला गेला होता. जेणे करून इंग्रजांनी हा कायदा रद्द करावा तसेच कुलाब्यातील इंग्रज वसाहतीकडे जाणारा इतर मालही मारहाणकडून रोखला गेला. अनेक इंग्रजांच्या गाड्या थांबवल्या गेल्या, त्यांची कार्यालये उघडू दिली नाहीत. यामुळे दंगलीला चांगलेच यश आले होते.
अधिक वाचा: ७ महिन्यांत ३.५ लाख लोकांना श्वानदंश; राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत
इंग्रजांची कार्यवाही
या दंगलीमुळे इंग्रज सरकार चांगलेच पेचात पडले होते. शेवटी हतबल होऊन शहरात शांतता नांदावी या साठी पारशी जमावावर फलटण पाठवली आणि दंगल क्षमविली, बऱ्याच जणांना अटक केली, कैदेत टाकले, शिक्षा झाली. पारशी लोकांनी केलेल्या या दंगलीत उच्चभ्रू पारशी समाजाचा समावेश नव्हता. या उलट ७ जून १८३२ साली झालेल्या दंगलीला क्षमविण्यासाठी या उच्चभ्रू पारशी समाजाने स्वतःहून पुढाकार घेतल्याची नोंद सापडते. त्यानंतर सरकारने कुत्रे पकडण्यासाठी बैलगाड्यांवर पिंजऱ्याची सोय केली …सरकारी खात्यातील नेमणूक केलेले शिपाईच कुत्रे पकडतील आणि या लोखंडी पिंजऱ्यात टाकतील असा नियम केला.
असे हे मुंबईच्या इतिहासातील भटक्या कुत्र्यांनी गाजवलेले पर्व ! जे पर्व इंग्रजांना एक दिवसीय उपवास घडविण्यास कारणीभूत ठरले!