-अन्वय सावंत

अधिक कालावधीपासून तालिबानी राजवटीखाली असलेल्या अफगाणिस्तानला विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या देशात कायमच युद्धजन्य परिस्थिती असते. या सर्व आव्हानांनंतरही अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आलेख मात्र सातत्याने उंचावत असल्याचे पाहायला मिळते आहे. सध्या संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने उत्कृष्ट खेळ केला आहे. त्यांनी श्रीलंका आणि बांगलादेश या संघांना पराभूत करत ‘अव्वल चार’ (सुपर फोर) फेरीमध्ये प्रवेश मिळवला. त्यांच्या या स्पर्धेतील कामगिरीचा, तसेच त्यांनी गेल्या काही वर्षांत कोणत्या आव्हानांचा सामना केला, त्याचा घेतलेला आढावा.

अफगाणिस्तानने आशिया चषकात स्वत:ला कशा प्रकारे सिद्ध केले आहे?

अफगाणिस्तानच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. या संघाने गेल्या काही वर्षांत धक्कादायक निकालांची नोंद केली असून कोणत्याही संघाला पराभूत करण्याची आपल्या क्षमता असल्याचे अफगाणिस्तानने आशिया चषकातही दाखवून दिले आहे. त्यांनी पहिल्या साखळी सामन्यात श्रीलंकेला आठ गडी आणि तब्बल ५९ चेंडू राखून धूळ चारली. या सामन्यात गोलंदाजांनी श्रीलंकेला केवळ १०५ धावांत गारद केल्यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान १०.१ षटकांतच पूर्ण केले. मग दुसऱ्या सामन्यात त्यांनी बांगलादेशवर सात गडी राखून मात केली. या सामन्यात १२८ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला अखेरच्या पाच षटकांत ५२ धावांची आवश्यकता होती. मात्र, इब्राहिम झादरान (४१ चेंडूंत नाबाद ४२) आणि नजीबुल्ला झादरान (१७ चेंडूंत नाबाद ४३) यांच्या फटकेबाजीमुळे अफगाणिस्तानने नऊ चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवला. आता ‘अव्वल चार’ फेरीत ६ सप्टेंबरला होणाऱ्या लढतीत भारतीय संघालाही अफगाणिस्तानपासून सावध राहावे लागेल. 

अफगाणिस्तानने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील कशी कामगिरी केली आहे?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) अफगाणिस्तानला कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा दर्जा मिळाला असला, तरी त्यांना आतापर्यंत केवळ सहा कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यापैकी तीन सामने (बांगलादेश, आयर्लंड, झिम्बाब्वेविरुद्ध) त्यांनी जिंकले असून तीन सामने (भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वेविरुद्ध) गमावले आहेत. अफगाणिस्तानचा संघ एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १००हून अधिक सामने खेळला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३८ पैकी ६९ सामने, तर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १०१ पैकी ६८ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, त्यांना भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड यांसारख्या जागतिक क्रिकेटमध्ये बलाढ्य मानल्या जाणाऱ्या संघांविरुद्ध सातत्याने सामने खेळायला मिळत नाही. अन्यथा, त्यांच्या प्रगतीचा वेग अधिक वाढू शकेल. 

गेल्या काही काळात कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे? 

गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून तालिबानी राजवटीखाली असलेल्या अफगाणिस्तानला राजकीय, सामाजिक आणि अन्य सर्वच स्तरांवर विविध आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट जवळपास पूर्णपणे थांबले आहे. परंतु पुरुषांच्या क्रिकेट संघाला तालिबानी राजवटीकडून फारसा विरोध पत्करावा लागलेला नाही. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने आपल्या खेळाडूंसाठी अमिरातीचा निवासी व्हिसा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा अमिरातीमध्ये सामने खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी, तालिबानी राजवटीखाली असल्याने अफगाणिस्तान क्रिकेटला महसुलाची समस्या जाणवत आहे. संयोजक माघार घेत आहेत. आंतरराष्ट्रीय संघांनी अफगाणिस्तानमध्ये सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण झाले आहेत. मात्र, क्रिकेट अजूनही सुरू असणे, हीच अफगाणिस्तानसाठी समाधानकारक बाब आहे.

कोणत्या खेळाडूंचे अफगाणिस्तानच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान?

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने १९व्या शतकाच्या मध्यापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. परंतु त्यांना सातत्याने यश मिळवण्यासाठी २१व्या शतकापर्यंत वाट पाहावी लागली. मोहम्मद नबी आणि रशीद खान ही फिरकी जोडगोळी, असगर अफगाण आणि रहमत शाह हे फलंदाज, यष्टीरक्षक मोहम्मद शेहजाद यांसारख्या खेळाडूंनी अफगाणिस्तानच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. विशेषत: नबी आणि रशीद यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट व विविध ट्वेन्टी-२० लीगमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या अन्य खेळाडूंनाही विविध स्पर्धांमध्ये संधी मिळण्यास सुरुवात झाली आहे. फिरकीपटू मुजीब ऊर रहमान (वय २१ वर्षे), डावखुरा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी (२१ वर्षे) आणि यष्टीरक्षक रहमनुल्ला गुरबाझ (वय २० वर्षे) यांसारखे युवा खेळाडू पुढे येऊन आता अफगाणिस्तानला सामने जिंकून देत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाचे भविष्य उज्ज्वल आहे.

Story img Loader