आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे. युनिक आयडी क्रमांक असलेले आधार कार्ड देशातील सर्व नागरिकांना यूआयडीएआयद्वारे जारी केले जाते. यात बायोमेट्रिकसह तुमच्याशी संबंधित अनेक माहिती असते. यूआयडीएआय ही देशातील सर्व रहिवाशांना आधारकार्ड जारी करण्यासाठी २०१६ मध्ये स्थापन केलेलं प्राधिकरण आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत १३१.६८ कोटी आधार क्रमांक जारी केले आहेत. आधार कार्डाशिवाय सरकारी योजना आणि बँकिंग सुविधांचा लाभ घेता येत नाही. यासोबतच आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. आता गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधार डेटाबेसचा महत्त्वाचा ठरेल, असं मत दिल्ली पोलिसांनी व्यक्त करत कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत गुन्ह्याची उकल करण्यासाठी संशयिताचा फोटो आणि फिंगर प्रिंट्स आधार डेटाबेसशी जुळवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. यूआयडीएआयनं दिल्ली पोलिसांच्या एका याचिकेला विरोध केला आहे. कायद्यानुसार आधार डेटा पोलीस तपासात वापरणं प्रतिबंधित आहे. गुन्ह्यांचा शोध लावण्यात आधार डेटा वापरणं चुकीचं असल्याचं यूआयडीएआयने सांगितलं आहे. यूआयडीएआयने उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, आधार कायद्यांतर्गत प्राधिकरणाने गोळा केलेली बायोमेट्रिक माहिती कोणत्याही कारणास्तव कोणाशीही शेअर केली जाणार नाही. यूआयडीएआयने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आधार कायद्याच्या कलम २ (जे) मध्ये मूलभूत बायोमेट्रिक माहिती नमूद करण्यात आली आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीची बोटांचे ठसे, स्कॅन किंवा इतर माहिती कोणत्याही कारणास्तव सामायिक करणे किंवा वापरण्यावर कायद्यानुसार स्पष्ट प्रतिबंधित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा