गेल्या काही दिवसांमध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारसभा आणि भाषणांची जोरदार चर्चा राष्ट्रीय राजकारणात झाल्याचं पाहायला मिळालं. गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षानं ९० जागा जिंकण्याचा दावा केला होता. ‘आप’ला इतक्या जागा मिळणार नाहीत, असं जरी राजकीय विश्लेषकांचं म्हणणं असलं, तरी नेमक्या किती जागा मिळतील आणि त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा यापैकी नेमक्या कोणत्या पक्षाचं नुकसान होईल? याची उत्सुकता लागली होती. अखेर निवडणुकांचे निकाल हाती आले असून आपनं ५ जागांवर विजय मिळवला आहे तर १३ टक्क्यांहून जास्त मतं मिळवली आहेत!
आम आदमी पक्षासाठी गुजरातमध्ये हा चंचुप्रवेशच म्हणता येईल. मात्र, भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षानं खातं उघडल्यामुळे राज्यातील पुढील राजकीय समीकरणं नक्कीच बदलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील एकूण मतांच्या १३ टक्के मतं मिळवून आम आदमी पक्षानं लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना कडवी टक्कर देण्याचं बिगुल वाजवल्याचंही बोललं जात आहे. मात्र, एकीकडे घोषणा केल्या तेवढ्या जागा जरी आपला मिळाल्या नसल्या, तरी या चंचुप्रवेशामुळे राष्ट्रीय पातळीवर आपचा एक प्रकारे ‘मोठा विजय’च झाल्याचं मानलं जात आहे. कारण या निवडणुकीतील कामगिरीमुळे आपला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विश्लेषण: गुजरातमध्ये भाजपच्या विक्रमी विजयाचे रहस्य काय? ‘गुजरात मॉडेल’ आता लोकसभा निवडणुकीतही?
देशात कोणते पक्ष आहेत ‘राष्ट्रीय’?
नावाप्रमाणेच राष्ट्रीय पक्ष हा खऱ्या अर्थाने ‘राष्ट्रीय’ असायला हवा. अर्थात, देशातील बहुतेक राज्यांमध्ये पक्षाचं अस्तित्व असायला हवं. प्रादेशिक पक्ष हे संबंधित राज्यापुरतेच मर्यादित असतात. काँग्रेस किंवा भाजपा यासारखे मोठे पक्ष हे राष्ट्रीय पक्ष आहेत. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कम्युनिस्ट पक्षासारखे काही छोटे पक्षही राष्ट्रीय पक्ष ठरले आहेत. हे पक्ष टराष्ट्रीय पक्षा’साठी आवश्यक असलेल्या काही निकषांची पूर्तता करतात. पण याचा अर्थ त्यांचा राष्ट्रीय स्तरावर प्रभाव असतो, असा मात्र नाही. शिवाय, काही पक्षांचा राष्ट्रीय स्तरावर प्रभाव असूनही, ते प्रादेशिक पक्षच राहिले आहेत. यामध्ये डीएमके, बीजेडी, वायएसआरसीपी, आरजेडी, टीआरएस अशा काही पक्षांचा समावेश आहे.
एखादा पक्ष ‘राष्ट्रीय’ केव्हा ठरतो?
कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने निकष ठरवून दिले आहेत. या निकषांची पूर्तता करणाऱ्या पक्षाला जसा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो, तसाच पूर्तता करण्यात अपयशी ठरणाऱ्या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढूनही घेतला जाऊ शकतो.
काय आहेत निकष?
चार किंवा अधिक राज्यांमध्ये पक्षाला मान्यता असणे..
किंवा
लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा जास्त राज्यांमध्ये ६ टक्क्यांहून जास्त मते मिळणे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत किमान चार खासदार निवडून आलेले असणे…
किंवा
लोकसभा निवडणुकीत तीन राज्यांमधून लोकसभेच्या किमान दोन टक्के जागा जिंकल्या असणे…
प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यतेसाठी काय आहेत निकष?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळवणे
किंवा
संबंधित राज्यातून लोकसभा निवडणुकीत ६ टक्के मते मिळवणे आणि त्या राज्यातून किमान एक खासदार असणे
किंवा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण जागांच्या ३ टक्के किंवा तीन जागा यापैकी ज्या जास्त असतील, त्या जिंकलेल्या असणे
किंवा
नुकत्याच झालेल्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये त्या राज्यातील पात्र मतदानाच्या ८ टक्के मते मिळवणे
‘आप’ यापैकी कोणत्या निकषांची पूर्तता करतो?
गुजरातमधील कामगिरीमुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यासाठी दिल्ली आणि पंजाबमधील बहुमत, गोवा आणि गुजरातमधील ६ टक्क्यांहून जास्त मतदानाचा हिस्सा या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये आम आदमी पक्षाकडे स्पष्ट बहुमत आहे. शिवाय मतदानाचा मोठा हिस्सा आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ६.७७ टक्के मतं मिळवली आहेत. त्यामुळे आम आदमी पक्ष एक प्रादेशिक पक्ष ठरला आहे.
दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाला १ टक्के मतं मिळाली आहेत. पण गुजरातमध्ये मात्र आपला तब्बल १३ टक्क्यांहून जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे या निकषाची पूर्तता केल्यामुळे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. कारण आता दिल्ली आणि हरियाणासह गोवा आणि गुजरात अशा एकूण चार राज्यांमध्ये आम आदमी पक्षाला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.