महिनाभर लांबल्यानंतर अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला खरा. मात्र, मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या काही मंत्र्यांवर आक्षेप घेतला जाऊ लागला आहे. यामध्ये एक नाव पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी ठाकरे सरकारमधून राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांचं आहे. त्यांच्यासोबतच शिंदे गटातील दुसरे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे तो जवळपास वर्षभरापूर्वी उघड झालेला TET अर्थात Teachers Elegibility Test घोटाळा! आता अब्दुल सत्तार यांचं या घोटाळ्याशी नेमकं काय कनेक्शन जोडलं जात आहे? त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर आक्षेप का घेतला जातोय? जाणून घेऊयात!
सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द
अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या काही तास आधी या घोटाळ्याची चर्चा सुरू झाली. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात सत्तार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं ते त्यांच्या दोन मुलींमुळे. औरंगाबादचे आमदार असलेले अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची प्रमाणपत्र घोटाळ्यात नाव आल्यामुळे रद्द करण्यात आली आणि सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येऊ नये, अशी देखील मागणी करण्यात आली.
अब्दुल सत्तार यांनी फेटाळले आरोप
दरम्यान, खुद्द अब्दुल सत्तार यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. “माझा मुलगा अजून टीईटी परीक्षेला बसला नाही. त्यामुळे त्याचे नाव त्या यादीत कसे गेले. तरीदेखील काही हितचिंतक त्याचे नाव यादीत टाकत असतील तर हरकत नाही. यातील खरा गुन्हेगार चौकशी झाल्यानंतरच समजेल. या प्रकरणाचा तपास ईडी करतेय. हा घोटाळा फक्त राज्य सरकारपुरता मर्यादित नाहीये. माझी मुलं अपात्र असून पात्र दाखवले जात असतील तसेच त्यांनी कुठे पगार मागितला असेल, नोकरी मागतील असेल तर ते दोषी आहेत. महाराष्ट्राचा शिक्षण विभाग खूप मोठा आहे. चौकशी होईल,” असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
TET म्हणजे नेमकं काय?
टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षक होण्यासाठी आवश्यक अशी परीक्षा आहे. शिक्षण अधिकार अर्थात RTE नुसार शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. २०१३मध्ये हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात आला. त्याच वर्षीपासून टीईटी देखील लागू करण्यात आली. पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी शिक्षण होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे.
विश्लेषण: नाराजीचे ग्रहण, जुन्यांनाच संधी; मंत्रिमंडळ विस्ताराची वैशिष्ट्ये कोणती?
नियमानुसार, पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांसाठी शिक्षक म्हणून रुजू होऊ इच्छिणाऱ्यांना टीईटीच्या पहिल्या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे. तर सहावी ते आठवीसाठी पेपर दोन उत्तीर्ण होण्याची अट आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये ६० टक्के मिळवणं आवश्यक आहे. या परीक्षेची काठिण्य पातळी जास्त असून उत्तीर्ण होणाऱ्यांचं सरासरी प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे उमेदवारांच्या ज्ञानाचा कस लावणारी ही परीक्षा ठरते.
TET घोटाळा काय आहे?
ऑक्टोबर २०२१मथ्ये पुणे पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासामध्ये हा घोटाळा उघड झाला होता. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क श्रेणीतील पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर नोव्हेंबर २०२१पर्यंत सरकारी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर येऊ लागलं. पुणे सायबर पोलिसांनी याचा सखोल तपास सुरू केला. यामध्ये अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही नावं समोर येऊ लागली.
विश्लेषण : ‘बार्टी’च्या मूळ उद्देशाला तडा! चांगल्या उपक्रमाची का होतेय दैना?
दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करताना अनेक गैरप्रकार समोर आले. पेपर फुटल्याचा प्रकार यामध्ये घडला नसला, तरी पेपर तपासणी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून गुण वाढवणे किंवा बनावट प्रमाणपत्र देणे असे प्रकार यात घडल्याचं दिसून आलं.
महाराष्ट्रात घोटाळ्याची व्याप्ती आणि प्रकार
पुणे पोलिसांनी तपासाअंती एकूण ७ हजार ८८० उमेदवारांची यादी तयार केली. या उमेदवारांनी गैरप्रकार करून टीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा संशय पोलिसांना होता. ही यादी त्यांनी MSCE कडे अधिक तपासासाठी सोपवली. गेल्या आठवड्यात या यादीवर MSCE नं तब्बल ४८० पानी अहवाल सादर केला. यामध्ये उमेदवारांच्या नावांसह त्यांचे परीक्षा क्रमांक देखील नमूद करण्यात आले होते.
या यादीच्या सविस्तर तपासानंतर लक्षात आलं की ७ हजार ८८० उमेदवारांपैकी ७ हजार ५०० उमेदवारांनी चुकीच्या मार्गांचा वापर करून त्यांच्या गुणांमध्ये फेरफार केला होता. तर २९३ उमेदवारांनी त्यांचे गुण बदलले नाहीत, तर चक्क बनावट गुणपत्रिकाच मिळवली होती! याशिवाय इतर ८१ उमेदवारांनी चुकीच्या मार्गांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र मिळवलं होतं.
अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुली अर्थात हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहिद अब्दुल सत्तार शेख यांच्या नावाचा समावेश बनावट गुणपत्रिका मिळवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत करण्यात आला आहे. अशा प्रकारे गुणपत्रिका मिळवणाऱ्या या उमेदवारांना कुठे नोकरी मिळाली असेल, तर त्यांची नियुक्ती तातडीने रद्द होऊ शकते.