भारतीय क्रिकेट संघाचा साहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरची गच्छंती करण्याचा मोठा निर्णय ‘बीसीसीआय’कडून घेण्यात आला आहे. मायदेशात न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. या अपयशामागे फलंदाजांची निराशाजनक कामगिरी हे प्रमुख कारण होते. फलंदाज कामगिरी उंचावण्यात कमी पडले यासाठी एकट्या नायरला जबाबदार धरण्यात आल्याचे चित्र आहे. माजी अष्टपैलू नायर हा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा चांगला मित्र मानला जातो. तसेच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचाही त्याच्यावर खूप विश्वास असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे नायरला साहाय्यक प्रशिक्षकपदावरून हटविण्याचा निर्णय हा आश्चर्यचकित करणार असाच ठरतो आहे.
गंभीरच्या शिफारशीनंतर नियुक्ती…
गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर माजी सलामीवीर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गंभीरने ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाचा प्रेरक अर्थात ‘मेंटॉर’ म्हणून काम केले होते. कोलकाताने ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावल्यानंतर याचे श्रेय मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यापेक्षा अधिक गंभीरलाच देण्यात आले. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीरला पसंती दिली. कोलकाता संघाबरोबर असताना गंभीरने नायर याच्यासह काम केले होते. नायर या संघाचा साहाय्यक प्रशिक्षक होता. या संघातील वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांसारख्या प्रमुख खेळाडूंनी नायरचे कौतुक केले होते. तसेच अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनेही अनेकदा नायरची स्तुती केली असून त्याच्या मार्गदर्शनामुळे आपल्या कारकीर्दीला नवसंजीवनी मिळाल्याचे कार्तिक म्हणाला आहे. मार्गदर्शक म्हणून नायरच्या क्षमतेवर गंभीरलाही प्रचंड विश्वास होता. त्यामुळे गंभीरने भारतीय संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नायरच्या नावाची शिफारस केली आणि ‘बीसीसीआय’ने ती मान्यही केली.
कसोटीत फलंदाजांचे अपयश…
गंभीरसह साहाय्यक प्रशिक्षक म्हणून नायर आणि रायन टेन डोएशाते तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्कल हे नवे चेहरे भारतीय संघाशी जोडले गेले. नायरने भारतीय संघातील काही खेळाडूंसह आधीही काम केले होते. त्यामुळे त्याच्याकडे खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या नव्या चमूतील दुवा म्हणून पाहिले जात होते. विशेषज्ज्ञ फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. मात्र, नायरकडे प्रामुख्याने ही जबाबदारी असल्याचे मानले जात होते. गेल्या वर्षीच्या अखेरीस मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघावर ०-३ अशी सपशेल नामुष्की ओढवली. या मालिकेत भारतीय फलंदाज फिरकीविरुद्ध सातत्याने अडचणीत सापडताना दिसले. त्यावेळी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नायरवर टीका केली. ‘‘नायरची नक्की भूमिका काय? तो फलंदाजी प्रशिक्षक आहे की साहाय्यक प्रशिक्षक? फलंदाजांवर त्याचा काहीही सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे दिसत नाही,’’ असे गावस्कर म्हणाले. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला १-३ अशी हार पत्करावी लागली. येथेही भारतीय फलंदाजांनी निराशा केली. विशेषत: फलंदाजांमध्ये संयमाचा अभाव दिसून आला.
अपयशाचे खापर एकट्या नायरवर?
सलग दोन कसोटी मालिकांतील अपयशानंतर ‘बीसीसीआय’कडून साहाय्यक प्रशिक्षकांच्या कामगिरीचे पुनरावलोकन करण्यात आले. या बैठकीत प्रामुख्याने नायरविरोधात नाराजीचा सूर होता. ‘‘नायरला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. उलट ड्रेसिंग रूममधील त्याच्या उपस्थितीचा संघावर विपरीत परिणाम होत आहे,’’ असे एका अन्य साहाय्यकाने या बैठकीनंतर सांगितले होते. ‘बीसीसीआय’नेही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजांना आलेल्या अपयशासाठी नायरला जबाबदार धरले आहे. त्याच वेळी काही प्रमुख खेळाडू आणि साहाय्यकांमधील मतभेदात नायरचा बळी गेल्याचीही ‘बीसीसीआय’मधील पदाधिकाऱ्यांची भावना असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे फलंदाजांच्या अपयशासाठी एकट्या नायरला जबाबदार धरणे कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच नायरला हटविण्यापूर्वी ‘बीसीसीआय’ने रोहित आणि गंभीर यांच्याशी चर्चा केली का, हेसुद्धा स्पष्ट करण्यात आलेले नाही.
यापूर्वी साहाय्यकांची गच्छंती कधी?
यापूर्वी ‘बीसीसीआय’ने एखाद्या साहाय्यक प्रशिक्षकाची गच्छंती केल्याचा प्रकार २०१४ मध्ये घडला होता. त्यावेळी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यावरील कसोटी मालिका भारताने १-३ अशी गमावली. ही मालिका सुरू असतानाच ‘बीसीसीआय’ने तत्कालीन गोलंदाजी प्रशिक्षक जो डॉव्स आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांना पुन्हा मायदेशी बोलावले होते. त्यानंतर रवी शास्त्री यांनी संघ-संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली, तर गोलंदाजी प्रशिक्षकपदी भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षकपदी संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी आर. श्रीधर यांना नियुक्त करण्यात आले.
इतर दोघांनाही मुदतवाढ का नाही?
नायरची गच्छंती करतानाच ‘बीसीसीआय’ने साहाय्यकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, तसेच स्ट्रेंग्थ-कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांना करारवाढ देणे ‘बीसीसीआय’ने टाळले आहे. दिलीप २०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अखेरीस भारतीय संघाशी जोडले गेले. द्रविड यांच्या साहाय्यकांच्या चमूचा ते भाग होते. द्रविडचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपुष्टात आला. मात्र, दिलीप यांना मार्च २०२५ पर्यंत करारवाढ देण्यात आली आणि त्यांनी गंभीरबरोबरही काम केले. मात्र, आता रायन टेन डोएशाते ही जबाबदारी सांभाळण्यासाठी सक्षम असल्याची ‘बीसीसीआय’ची धारणा असल्याने दिलीपना पुन्हा करारवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘बीसीसीआय’ इतक्यात कोणत्याही नव्या साहाय्यकांची निवड करणार नसल्याचे समजते आहे.