भारतासह बहुतेक देशांमध्ये पारपत्र (पासपोर्ट) हा महत्त्वाचा दस्तावेज म्हणून वापरला जातो. कोणत्या देशाचे पारपत्र अधिक प्रभावी आणि कोणत्या देशाचे पारपत्र कमकुवत आहे हे ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’द्वारे (हेन्ली पारपत्र निर्देशांक) समजू शकते. लंडनस्थित या संस्थेने तयार केलेल्या या यादीत सिंगापूर या देशाचा पासपोर्ट सर्वाधिक प्रभावी ठरला आहे. गेल्या वर्षीच्या यादीच्या तुलनेत भारत ८०व्या स्थानावरून ८२व्या स्थानी घसरला आहे. ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ म्हणजे काय? भारताची या यादीत घसरण का झाली? याचा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हेन्ली पारपत्र निर्देशांक’ म्हणजे काय?

‘हेन्ली अँड पार्टनर्स’ ही लंडनमधील संस्था दरवर्षी राष्ट्रनिहाय पारपत्राचे महत्त्व अधोरेखित करते. कोणत्या देशाच्या पारपत्राद्वारे व्हिसामुक्त प्रवास करता येतो, कोणत्या देशाचे पारपत्र अधिक देशांमध्ये चालत नाही याची यादी तयार केली जाते. हा निर्देशांक ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’कडून (आयएटीए) गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर तयार केला जातो. देशांच्या व्हिसा धोरणातील बदलांनुसार हेन्ली पारपत्र निर्देशांक दर तीन महिन्यांनी तयार केला जातो. यात २२७ गंतव्य स्थाने आणि १९९ देशांच्या पारपत्रांचा समावेश असतो. हेन्ली पासपोर्ट निर्देशांक १९९ विविध पारपत्रांच्या व्हिसामुक्त प्रवेशाची तुलना २२७ प्रवासाच्या स्थळांशी करते. व्हिसा आवश्यक नसल्यास त्या पारपत्रासाठी एक गुण दिला जातो. हेन्ली पासपोर्ट निर्देशांक हा जागतिक नागरिक आणि सार्वभौम राज्यांसाठी मानक संदर्भ साधन मानले जाते. जागतिक गतिशीलतेवर पासपोर्टचे स्थान काय आहे याचे मूल्यांकन या निर्देशांकाद्वारे केले जाते.

आणखी वाचा-विश्लेषण : कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाची किती संधी? लिंगभेद, वर्णद्वेशी टीकेमुळे नुकसान होणार?

भारताचे पारपत्र किती प्रभावी?

हेन्ली पासपोर्ट निर्देशांकानुसार, जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनही भारताची स्थिती तुलनेने फार चांगली नाही. भारत या यादीमध्ये ८२व्या स्थानी आहे. जुलै २०२२ मध्ये भारत ८७व्या स्थानावर होता, तर गेल्या वर्षी जुलैमध्ये भारत ८५व्या स्थानावर होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारताने पाच अंकांनी प्रगती करून ८०वे स्थान मिळवले होते. मात्र आता भारताने दोन अंक गमावून ८५वे स्थान मिळविले. भारताचे पारपत्रधारक जगभरातील फक्त ५८ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करू शकतात. गेल्या वर्षी ५९ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करण्यास मुभा होती. भारतासह सेनेगल आणि ताजिकिस्तान हे देशही ५८व्या क्रमांकावर आहे. भारताचे महत्त्व आंतरराष्ट्रीय राजकारणात, अर्थकारणात गेल्या काही वर्षांमध्ये वाढू लागल्याचे बोलले जात असले, तरी २०१८ पासून हेन्ली पारपत्र निर्देशांक क्रमांक ८० ते ८७ मध्ये स्थिरावलेला दिसून येतो. व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकणाऱ्या देशांची संख्याही ५५ ते ६०च्या पलीकडे जाऊ शकलेली नाही. त्या तुलनेत अनेक लहान देश, अविकसित राष्ट्रांनीही भारतापेक्षा वरचे स्थान मिळवले आहे.

आणखी वाचा-स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र

भारतीय धनवान परदेशात का जातात?

फक्त ५८ गंतव्यस्थानांवर व्हिसामुक्त प्रवेश मिळण्याची वास्तविकता हे भारतीय धनवान कुटुंबांमध्ये जागतिक गुंतवणूक स्थलांतराच्या संधींबद्दल जागरूकता आणि मागणीत लक्षणीय वाढ होण्याचे एक कारण आहे. परदेशी जाण्याची आकस्मिक योजना तयार करणे आणि त्यांचा व्हिसामुक्त प्रवास वाढवणे याशिवाय भारतीय कुटुंबे पर्यायी नागरिकत्व स्वीकारतात. त्यामुळे मुलांना उत्कृष्ट उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश करणे सोपे होते. भारतातील श्रीमंत लोक केवळ त्यांच्या संपत्तीचे रक्षण करू पाहत नाहीत – ते अशा देशांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करत आहेत, जे मजबूत शैक्षणिक पायाभूत सुविधा देतात. या कारणास्तव ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि अमेरिकेद्वारे प्रस्तावित केलेले कार्यक्रम लक्ष वेधून घेतात आणि भारतीयांचा तिकडे ओढा वाढतो, असे हेन्ली अँड पार्टनर्सचे भारतातील प्रमुख रोहित भारद्वाज यांनी सांगितले. व्हिसामुक्त अनेक गंतव्यस्थानांवर प्रवास करण्याची क्षमता आता केवळ एक सोय नाही तर हे एक शक्तिशाली आर्थिक साधन आहे, जे वाढीस चालना देऊ शकते, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवू शकते आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करू शकते, असे हेन्ली अँड पार्टनर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुर्ग स्टीफन यांनी सांगितले. चीननंतर जगभरात सर्वाधिक भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन या देशांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय विद्यार्थी अधिक आहेत. अमेरिका भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा देश आहे, त्याचप्रमाणे भारतीय गुंतवणूकदारांमध्येही अमेरिका ही एक लोकप्रिय निवड आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत अमेरिकेने जारी केलेल्या व्हिसाच्या संख्येनुसार भारत हा चीन व व्हिएतनामनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिक्षण, नोकरी, आर्थिक गुंतवणूक, पर्यटन यांमुळे भारतीयांचा परदेशात ओघ वाढत आहे.

आणखी वाचा-पॅरिस ऑलिम्पिक हे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पर्यावरणपूरक आयोजन का असणार आहे?

‘हेन्ली पारपत्र निर्देशांक’ कसा ठरतो?

‘फोर्ब्स इंडिया’नुसार, पारपत्राची क्रमवारी अनेक घटकांवर आधारित आहे. १९९ पारपत्रे आणि २२७ गंतव्यस्थाने, पारपत्रधारक व्हिसाशिवाय प्रवेश करू शकणाऱ्या देशांची संख्या, इतर देशांशी असलेले राजनैतिक संबंध आणि त्याचे आंतरराष्ट्रीय करार वापरून मोजले जातात. हेन्ली अँड पार्टनर्सच्या मते, दरडोई उच्च जीडीपी असलेले देश अधिक व्हिसा-मुक्त गंतव्यस्थानांचा आनंद घेतात कारण श्रीमंत देश अधिक व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक आकर्षित करतात, ज्यामुळे सीमा अधिक खुल्या होतात. याव्यतिरिक्त, सुरक्षेत संवेदनशील असलेले देश प्रवासाच्या सुलभतेवर नकारात्मक परिणाम करतात. सुरक्षा संवेदनशीलतेमध्ये हिंसा (बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, वांशिक संघर्ष, संघटित गुन्हेगारी), राज्य वैधता आणि अंतर्गत विस्थापित लोकसंख्या यांचा समावेश होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लोकशाहीसंबंधी घटकांचा पारपत्राच्या ताकदीशी फारसा संबंध नाही. कठोर कायदे असणाऱ्या यूएईला १८५ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश आहे, तर सेनेगल आणि ट्युनिशिया यांसारख्या उच्च लोकशाही देशांना मर्यादित व्हिसामुक्त प्रवेश आहे.

कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

हेन्ली पारपत्र निर्देशांकात गेली तीन वर्षे जपान अव्वल स्थानी होता. मात्र यंदा सिंगापूरने अव्वल स्थान पटकाविले आहे. सिंगापूरला १९८ गंतव्यस्थानी व्हिसामुक्त प्रवेश आहे. १९२ गंतव्यस्थानी व्हिसामुक्त प्रवेश असणारे फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, स्पेन हे देश दुसऱ्या स्थानी आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तान १०० व्या स्थानी आहे, ज्याने पारपत्रधारकांना ३३ देशांमध्ये प्रवेश प्रदान केला आहे. पारपत्र निर्देशांकाच्या यादीत अफगाणिस्तान तळाशी आहे. या देशाच्या पारपत्रधारकांना २६ गंतव्यस्थानावर सहज प्रवेश आहे.

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to the henley passport index the credit of the indian passport has deteriorated print exp mrj print exp mrj
Show comments