देशातील प्रसिद्ध आयटी कंपनीत कामाला असलेली २३ वर्षीय तरुणी अचानक गायब झाली आणि १२ दिवसांनी झुडूपांमध्ये तिचा मृतदेह सापडला. मात्र कुठलीही ठोस माहिती हाती नसताना पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने, पूर्वी हमाल म्हणून काम करणाऱ्या चंद्रभान सानपला अटक केली. या प्रकरणामुळे २०१४ मध्ये खळबळ उडाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अपहरण, बलात्कार व हत्येच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या चंद्रभान सानपची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हे प्रकरण नेमके काय होते ते जाणून घेऊ या.

पीडित तरुणी मुंबई कशासाठी आली?

आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम् येथील रहिवासी असलेली २३ वर्षीय पीडित मुलगी मुंबईतील प्रसिद्ध आयटी कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक पदावर कार्यरत होती. मुंबईतील अंधेरी परिसरात एका हॉस्टेलमध्ये ती वास्तव्यास होती. डिसेंबरमध्ये नाताळनिमित्त सुट्टी घेऊन ती गावी गेली. सुट्टी संपवून महिनाभराने ती विशाखापट्टणम् एक्स्प्रेसने मुंबईला यायला निघाली. विशाखापट्टणम् एक्स्प्रेस ५ जानेवारी रोजी पहाटे कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये येणार होती. त्यावेळी तिच्याकडे कपड्याची एक ट्रॉली बॅग आणि लॅपटॉपची सॅक होती. आदल्या रात्री नऊ वाजता विशाखापट्टणम् एक्स्प्रेस सोलापूरजवळ आली असता पीडित तरुणीला वडिलांनी दूरध्वनीही केला. प्रवास व्यवस्थित सुरू आहे, काळजी करू नका, असे तिने त्यावेळी त्यांना सांगितले. विशाखापट्टणम् एक्स्प्रेस ५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे ४.५० च्या सुमारास कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये पोहोचली. मुलगी रेल्वे स्थानकात उतरली असेल असा अंदाज बांधून वडिलांनी तिला फोन केला. पण तिने फोन उचलला नाही. ते वारंवार फोन करीत होते. पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ती तरुणी बेपत्ताच झाली.

तरुणी आरोपीसोबत कशी दिसून आली?

आरोपी चंद्रभान सानप ५ जानेवारी रोजी पहाटे कुर्ला टर्मिनसवर आला होता. पीडित तरुणी एकटी बसली असल्याचे त्याने हेरले. ‘मी वाहनचालक आहे, कुठे जायचे आहे’, असे त्याने तिला विचारले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. मात्र नंतर तिने अंधेरीला जायचे आहे असे त्याला सांगितले. मलाही अंधेरीतच जायचे आहे. अंधेरीत जाण्यासाठी ८०० रुपये होतात, पण ३०० रुपयांत सोडतो, असे त्याने तिला सांगितले. माझ्याकडे पेट्रोलचे पैसे नसल्याने मलाही मदत होईल, असे सांगून त्याने तिची सहानुभूती संपादन करण्याचा प्रयत्न केला. शॉर्टकटने दहा – पंधरा मिनिटांत अंधेरीत सोडतो, असेही त्याने सांगितले. तिचा होकार मिळण्याच्या आतच त्याने तिची ट्रॉली बॅग घेतली आणि तो चालू लागला, असे तपासात नमूद आहे.

पोलिसांनी कोणती माहिती दिली?

पीडित तरुणी आरोपीसोबत चालू लागली, पण सावधगिरी म्हणून तिने घरच्यांना फोन केला. पण दुर्दैवाने तिच्या मोबाइलमधील टॉकटाइम संपला होता. त्यामुळे तिने फक्त घरच्यांशी फोनवर बोलत असल्याचे भासवले. ती वेळ होती सकाळची ५.११ ची. नेमके हेच दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यावेळी ती केवळ फोनवर बोलत असल्याचे भासवत होती. रेल्वे स्थानकावरून साधारण तीनशे मीटर बाहेर चालत वाहनतळावर आल्यानंतर सानपकडे टॅक्सी नसून मोटारसायकल असल्याचे तिला कळले. त्यामुळे तिने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. पण सानपने तिला आश्वस्त केले. ‘मॅडम, माझा मोबाइल क्रमांक घ्या, माझ्या दुचाकीचा क्रमांक घ्या आणि कुणालाही द्या, मी गरीब आहे, मला पैशांची गरज आहे, मला पेट्रोलला पैसे मिळतील, तुमचेही काम होईल’, अशी विनवणी तो करीत होता. अखेर पीडित तरुणीने होकार दिला आणि ती त्याच्या दुचाकीवर बसली. चेंबूर येथून सहकार सिनेमाकडून ते पूर्व द्रुतगती मार्गावर आले. त्यानंतर मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्याचे भासवून सानप तिवरांच्या झुडपांजवळ थांबला. पीडित मुलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि ती गयावया करू लागली. आरोपीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. ती आरडाओरडा करीत होती. पण तेथे कोणीच नव्हते. पीडित मुलगी जिवंत राहिली, तर आपण या प्रकरणात अडकू या भीतीने आरोपीने तिचे डोके आपटले. त्यानंतर स्कार्फने तिचा गळा आवळला. तरुणीचा मृतदेह तेथेच सोडून आरोपी तिच्या दोन्ही बॅगा घेऊन तेथून पळून गेला, असे पोलिसांचे म्हणणे होते.

पीडित तरुणीचा मृतदेह जळाला कसा?

पीडित तरुणीला आरोपीने खोटा मोबाइल क्रमांक दिला होता. पण तिने मोबाइलमध्ये आपले छायाचित्र घेतले असेल तर आपण या प्रकरणात अडकू या भीतीने आरोपीने एका मित्राला उठवले. त्याला सोबत घेऊन तो पुन्हा घटनास्थळी आला. त्याने पीडित तरुणीच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळला. पोलिसांना घटनास्थळी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर आरोपी मुलुंड चेकनाक्यावर पोहोचला. त्यानंतर तेथूनच तो नाशिकला जाणाऱ्या एका टँकरमध्ये बसला आणि त्याने नाशिक गाठले. या प्रकारामुळे घाबरलेला त्याचा मित्रही झारखंडला निघून गेला. सानपने सोबत लॅपटॉपची बॅग आणि ट्रॉली बॅग घेतली होती. त्यात त्याला पाच हजार रुपये सापडले, अशी माहिती पोलिसांनी त्यावेळी दिली होती.

आरोपीला कसे पकडले?

मुंबई पोलिसांच्या हाती एक महत्त्वपूर्ण धागा लागला. कुर्ला रेल्वे पोलिसांना ३० जानेवारी रोजी फलाट क्रमांक ३ आणि ४ वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण मिळाले. एका कॅमेऱ्यातील चित्रणात पीडित तरुणी बॅग घेऊन जाताना, तर दुसऱ्यात ती फलाट क्रमांक ५ वरून बाहेर येत असल्याचे दिसत होते. त्यावेळी ती मोबाइलवर बोलत होती. तिच्यासोबत एक व्यक्ती होती. तो तिची ट्रॉली बॅग ओढत होता. त्याचा चेहरा चित्रणात स्पष्ट दिसत होता. त्याने टी – शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. अन्य एका चित्रीकरणामध्ये ही व्यक्ती ट्रेन येण्यापूर्वी हातात शीतपेयाची बाटली घेऊन फिरतानाही दिसत होती. त्या व्यक्तीवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर चंद्रभान सानपला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांच्या हाती कोणते पुरावे लागले?

पीडित तरुणी व आरोपीला एकत्र मोटरसायकलवरून जाताना दोन साक्षीदार सापडले होते. तसेच कांजूर येथील सानपच्या बहिणीच्या घरातून मृत तरुणीचा टी-शर्ट, जीन्स आणि गॉगल पोलिसांना सापडला होता. याशिवाय सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळाले होते. त्यात दोघेही एकत्र जाताना दिसत होते.

सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता का?

चंद्रभान सानपला २०१५ मध्ये कनिष्ठ न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने खून, बलात्कार आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी आहेत, पुरावे सबळ नाहीत, सीसीटीव्ही चित्रीकरण पुरेसे नाही अशी कारणे देत सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करताना सानपला निर्दोष ठरवले. सरकारी पक्षाने हे प्रकरण ‘संशयातीत’ (बियाँड रिझनेबल डाउट) पातळीपर्यंत तपासले नाही, असा शेरा सर्वोच्च न्यायालयाने मारला. 

Story img Loader