ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आदिपुरूष’ या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान या दिग्गज अभिनेत्यांची मुख्य भूमिका आहे. प्रभू राम, सिता मातेचे अपहरण यावर हा चित्रपट आधारित आहे. याच कारणामुळे संपूर्ण देशभरातील प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण त्यातील दृश्य, संवादावर आक्षेप घेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रिकरणात अनेक गंभीर चुका आहेत, असे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा आक्षेप का घेतला जात आहे. चित्रपटाचे चित्रिकरण करताना, आभासी जग उभे करताना कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला? हे जाणून घेऊ या…
आदिपुरुष पठाण चित्रपटाला मागे टाकणार?
आदिपुरुष हा चित्रपट १६ जून रोजी संपूर्ण देशभरात तसेच इतर देशांतही प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे बजेट तब्बल ५०० कोटी आहे. दरम्यान,या चित्रपटातील अनेक दृष्य, वेशभूषा, संवाद प्रेक्षकांना खटकले आहेत. या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले होते, तेव्हादेखील अनेकांनी त्यावर आक्षेप व्यक्त केला होता. असे असले तरी या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल १२ कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडणार असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटासंदर्भात नकारात्मक मत नोंदवल्यामुळे आदिपुरुष पठाण चित्रपटाला मागे टाकणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा >> नेहरूंचे १६ वर्षे वास्तव्य असलेल्या वास्तूचे नाव मोदी सरकारने बदलले, जाणून घ्या ‘तीन मूर्ती भवना’चा इतिहास!
मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी काय आहे?
या चित्रपटात वापरण्यात आलेले ग्राफिक्स सुमार दर्जाचे असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक तसेच तंत्रज्ञांनी मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर जनरेटेड इमेज (सीजीआय) या तंत्रज्ञानाचा योग्य आणि पूर्ण क्षमतेने वापर केलेला नाही, असे सांगितले जात आहे. मोशन कॅप्चर तंत्रज्ञानात एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तुची संपूर्ण हालचाल शुक्ष्मपणे रेकॉर्ड केली जाते. मोशन कॅप्चर तंत्रज्ञानानाच्या मदतीने रेकॉर्ड केलेला हा डेटा पुढे कॉम्प्युटरमध्ये पाठवला जातो. त्यानंतर या डेटावर तांत्रिक प्रक्रिया करू त्यातून सीजीआय पात्र उभे केले जाते. मोशन कॅप्चर तंत्रज्ञानात एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव, शरीराची हालचाल या सर्व बाबींची जशीच्या तशी नोंद केली जाते. या नोंदींची मदत घेऊन कॉम्प्यूटरच्या साहाय्याने पडद्यावर थ्रीडी पात्र उभे करता येते.
मोशन कॅप्चर या तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो?
स्टुडिओबाईंडर या संस्थेने मोशन कॅप्चर या तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती दिली आहे. मोशन कॅप्चर तंत्रज्ञानात डिजिटल पात्र उभे करायचे असल्यास मोशन कॅप सूट (विशिष्ट सूट), हेड माऊंटेड कॅमेरा (डोक्यावर कॅमेरा) आणि सॉफ्टवेअर यांची मदत लागते. मोशन कॅप सूटच्या मदतीने शरीराच्या हालचालीची नोंद करण्यात येते, त हेड माऊंटेड कॅमेऱ्याच्या मदतीने चेहऱ्यावरील हावभाव रेकॉर्ड केले जातात. एकदा चेहऱ्याचे हावभाव आणि शरीराची हालचाल रेकॉर्ड केली की तो सर्व डेटा कॉम्प्यूटरमधील सॉफ्टवेअरमध्ये पाठवला जातो. सॉफ्टवेअरमध्ये प्रक्रिया करून एक डिजिटल पात्र उभे केले जाते. विशेष म्हणजे पडद्यावर चित्रपट पाहताना आपल्याला ते पात्र अगदी खरे आणि अस्तित्वात असल्यासारखे भासते.
कोणकोणत्या चित्रपटांत या तंत्रज्ञानाचा वापर?
मोशन कॅप्चर तंत्रज्ञान आतापर्यंत अनेक चित्रपटांत वापरण्यात आलेले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज : द टू टॉवर्स’ या चित्रपटात करण्यात आला होता. या चित्रपटात ॲण्डी सेरकिस यांनी गोल्लम हे पात्र साकारण्यासाठी मोशन कॅप्चर सूट परिधान केला होता. त्यावेळी सेरकिस यांचे हावभाव टिपण्यासाठी एका विशिष्ट कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली होती. मात्र जेम्स कॅमेरॉन यांच्या ‘अवतार’ या चित्रपटानंतर मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाला जगभरात प्रसिद्धी मिळाली.
ॲव्हेंजर्स चित्रपट मालिकेतील थॅनोस (जॉस बोरलीन), द हॉबिट चित्रपटातील स्मॉग (बेनेडिक्ट कंबरबॅच), राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द ऐप्स चित्रपटातील स्माऊग आणि सिझर (ॲण्डी सेरिक्स) या पात्रांची मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच निर्मिती करण्यात आलेली आहे. फंटॅस्टिक फोर, गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी, अ क्वाईट प्लेस, द लायन किंग, घोस्टबश्टर : आफ्टरलाईफ आदी चित्रपटांतही मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला होता. विशेष म्हणजे भारतात कोचडियान या चित्रपटात पहिल्यांदा या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.
हेही वाचा >> कर्नाटकमधील धर्मांतरविरोधी कायदा रद्द होणार! भाजपाला धक्का; काँग्रेसची नेमकी भूमिका काय? जाणून घ्या सविस्तर…
कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी (सीजीआय) म्हणजे काय?
चित्रपटांमध्ये पात्रांची तसेच दृश्यांची निर्मिती करताना कॉम्प्युटर जनरेडेट इमेजरीचा (सीजीआय) वापर केला जातो. आणखी विस्तृत सांगायचे झाल्यास चित्रपट किंवा व्हिडीओनिर्मितीसाठी प्रत्यक्षात नसलेल्या प्रतिमा, दृश्यांची निर्मिती करणे म्हणजेच सीजीआय होय. या प्रतिमा, दृश्ये हे स्थिर किंवा हालचाल करणारे असू शकतात. टूडी आणि थ्रीडी चित्रपटांत याचा उपयोग होतो. सध्या हे तंत्रज्ञान तुलनेने स्वस्त झाले आहे. त्यामुळे त्याचा उपयोग वेगवेगळ्या दृश्यांची निर्मिती करण्यासाठी केला जातो. आजघडाली सीजीआय तंत्रज्ञान ऐतिहासिक, विज्ञान-तंत्रज्ञान हे मुख्य विषय असलेल्या चित्रपटांत एखादी वस्तू, घटना, पात्र यांच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरले जाते. एस एस राजामैली यांच्या इगा, बाहुबली, एस शंकर यांच्या जीन्स, इंथिरॅन, २.०, अनुभव सिन्हा यांच्या रावण अशा भारतीय चित्रपटांत या तंत्राचा खुबीने वापर केलाला आहे. याच कारणामुळे या चित्रपटांची चांगलीच वाहवा झाली होती.