भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थमध्ये झालेल्या वादावर सिद्धार्थने माफी मागितल्यानंतर पडदा पडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून एकमेकांवर आणि एकमेकांच्या समर्थकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्याइतकं या दोघांमध्ये नक्की काय घडलं होतं हे अनेकांना माहिती नाहीय. त्यातही हा वाद पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा ५ जानेवारी रोजी रोखण्यात आला आणि त्यानंतर पंजाबमधील फिरोझपूरमधून त्यांना परतावं लागल्याच्या घटनेवर दिलेल्या प्रतिक्रियेमधील दोन शब्दांवरुन झालेला हे सुद्धा अनेकांना ठाऊक नाहीय. नक्की काय घडलं आणि हा वाद काय होता यावरच टाकलेली नजर…
…अन् माफी मागितली
दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने अखेर मंगळवारी भारताची बॅडमिंटनपूट सायना नेहवालची माफी मागितल. सिद्धार्थने सायना नेहलावर टीका करताना कथित आक्षेपार्ह शब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच्या या टीकेवरुन सोशल मीडियावरुन नेटिझन्सनी संताप व्यक्त केला होता. राष्ट्रीय महिला आयागानेही याची दखल घेत सिद्धार्थला नोटीस पाठवली होती. सिद्धार्थने माफी मागावी अशी मागणी सायना नेहवालच्या कुटुंबीयांकडून केली जात होती. त्यामुळे आपल्या त्या टीकेसंबंधी स्षष्टीकरण देत बाजू मांडल्यानंतर आता सिद्धार्थने ट्विटरवरच जाहीर माफी मागितली आहे.
माफीनाम्यात काय म्हटलंय?
सिद्धार्थने ट्विटरवर एक पत्र पोस्ट केलं असून त्यात त्याने घडलेल्या प्रकरणासंदर्भात माफी मागितलीय. “प्रिय सायना, काही दिवसांपूर्वी तुझ्या एका ट्विटला उत्तर देताना लिहिलेल्या त्या कठोर विनोदासाठी मी माफी मागत आहे. मी अनेक मुद्द्यांवर तुझ्याशी असहमत असू शकतो पण तुझं ट्विट वाचल्यानंतरची नाराजी किंवा राग व्यक्त करण्यासाठी वापरण्यात आलेली भाषा आणि स्वर याचं स्पष्टीकरण असू शकत नाही. मी नक्कीच यापेक्षा जास्त चांगला व्यक्ती आहे याची मला जाणीव आहे. त्या विनोदाबद्दल स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास तो खूप चांगला विनोद नव्हता. तो योग्यप्रकारे मांडता आला नाही याबद्दल माफी,” असं सिद्धार्थने म्हटलंय.
“मी आग्रहाने सांगू इच्छितो की माझ्या शब्दाचा खेळ आणि विनोदाचा कोणताही दुर्भावनापूर्ण हेतू नव्हता. मी एक स्त्रीवादाचा समर्थक आहे आणि मी खात्री देतो की माझ्या ट्विटमध्ये लिंगभेद नव्हता तसंच एक स्त्री म्हणून तुझ्यावर हल्ला करण्याचा नक्कीच कोणताही हेतू नव्हता. तू हे सर्व मागे सोडून माझं हे पत्र स्वीकारशील अशी आशा आहे. तू नेहमीच एक चॅम्पियन राहशील. प्रामाणिकपणे, सिद्धार्थ,” असंही त्याने या पत्रात म्हटलं आहे.
माफीवर सायना काय म्हणाली?
अभिनेता सिद्धार्थने त्याच्या ट्वीटबद्दल काल (११ जानेवारी २०२२ रोजी) संध्याकाळी सायनाची माफी मागितली. त्यानंतर सायना नेहवालने याविषयीचं आपलं मत व्यक्त केलं. आपण ट्विटरवर ट्रेंडिंगला असल्याचं कळल्यावर आपल्याला आश्चर्य वाटलं होतं,असंही सायना म्हणाली आहे. एएनआयशी याविषयी बोलताना सायनाने, “तो माझ्याबद्दल काहीतरी बोलला, नंतर त्यानेच माफी मागितली. मला तर हेही कळलं नाही की हे सगळं इतकं व्हायरल का झालं? मी ट्विटरला ट्रेंडिंगला आहे हे पाहून मला खरंतर आश्चर्य वाटलं. मला आनंद आहे की सिद्धार्थने माऱी मागितली. तुम्ही अशा प्रकारे एखाद्या महिलेला लक्ष्य करू शकत नाही. असो, मला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. मी माझ्या जागी, जिथे आहे तिथे खूश आहे. देव त्याचं भलं करो”, असं म्हटलंय.
पण नक्की घडलं काय होतं?
बॉलिवूड आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता सिद्धार्थने स्टार सायना नेहवालवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने हा वाद सुरु झाला होता. झालं असं होतं की, पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींसंबंधी ट्वीट करताना भाजपा सदस्य असणाऱ्या सायना नेहवालने “कोणतेही राष्ट्र स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करत असेल तर ते सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. मी अराजकवाद्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते,” असं म्हटलं होतं.
सायना नेहवालच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थने दुहेरी अर्थाचा शब्द वापरला होता. “S**e ck जागतिक विजेती नशिब आपल्याकडे भारताचे संरक्षण करणारे आहेत. #Rihanna तुला लाज वाटली पाहिजे.” असे अभिनेता सिद्धार्थने म्हटलं होतं. त्याच्या या ट्वीटवरुन वाद सुरु झाला होता.
महिला आयोगानेही घेतली दखल
प्रकरण इतकं वाढलं की राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राच्या डीजीपीला पत्र लिहिलं असून सिद्धार्थविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. सायनाच्या वडिलांनी महिला आयोगाने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं होतं. “महिला आयोगाने दखल घेतल्याचा आम्हाला आनंद आहे. सिद्धार्थने माफी मागितली पाहिजे. मी त्याला ओळखतही नाही, पहिल्यांदाच त्याच्याबद्दल ऐकलं आहे,” असं सायनाच्या वडिलांनी म्हटलं होतं.
सिद्धार्थचं स्पष्टीकरण
वाद वाढल्यानंतर सिद्धार्थनेही स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांचं म्हणणं चुकीच्या पद्धतीने घेतलं जात आहे, कोणाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असं सिद्धार्थने म्हटलं होतं.
सायनाने यावर काय म्हटलं होतं
याप्रकरणी सायनानेही प्रतिक्रिया देताना, “त्याला (सिद्धार्थ) काय म्हणायचे होते ते मला माहित नाही. एक अभिनेता म्हणून मी त्याच्यावर प्रेम केले पण हे (ट्विट) चांगले नव्हते. तो स्वत:ला चांगल्या शब्दात व्यक्त करू शकतो पण पण मला वाटते की हे ट्विटर आहे आणि अशा शब्दांनी आणि टिप्पण्यांद्वारे तुमची दखल घेतली जाईल,” असं म्हटलं होतं.
सायनाचा पती काय म्हणाला?
बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपनेही पत्नी सायनाच्या ट्विटवर सिद्धार्थने केलेल्या टिप्पणीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी एका ट्विटमध्ये सिद्धार्थला टॅग करताना पारुपल्ली कश्यपने,”तुझे मत व्यक्त करणे आमच्यासाठी अस्वस्थ करणारे आहे, पण चांगले शब्द निवडा यार. मला वाटते की तुला असे बोलून छान वाटले,” असे म्हटले होते.
सायनाच्या वडिलांचा संताप
सायना नेहवालचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनीदेखील संताप व्यक्त केला होता. “माझ्या मुलीने देशासाठी मेडल जिंकले आहेत, त्याचं देशासाठी काय योगदान आहे?,” अशी विचारणा त्यांनी केली होती. “माझ्या मुलीसाठी अशा प्रकारचे शब्द वापरल्याने मला खूप वाईट वाटलं. त्याने देशासाठी काय केलं आहे? तिने देशासाठी पदकं जिंकली आहेत, देशाला गौरव मिळवून दिला आहे,” असं ते म्हणाले होते. “भारत एक महान समाज आहे असं मी नेहमीच मानत आलो आहे. सायनाला पत्रकार आणि क्रीडा बंधूंचा पाठिंबा आहे कारण एका खेळाडूला किती संघर्ष करावा लागतो हे त्यांना माहित आहे.” असं यावेळी त्यांनी सांगितलं होतं.
आता सिद्धार्थने माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडलाय.