Ranya Rao Gold Smuggling Case : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रान्या राव हिला बुधवारी (दिनांक 5 मार्च) बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली. रान्या राव दुबईहून परतत असताना महसूल गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी तिची झाडाझडती घेतली. यावेळी तिच्याकडे तब्बल 14.8 किलो सोनं आढळून आलं. या सोन्याची किंमत जवळपास 12 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही जप्ती अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक असल्याचा दावा महसूल गुप्तचर विभागाने केला आहे. दरम्यान, रान्या राव कोण आहे, तिच्याकडे एवढ्या प्रमाणात सोनं कसं आढळून आलं, पोलिसांनी तिच्यावर काय कारवाई केली, याबाबत जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रान्या राव कोण आहे?

33 वर्षीय रान्या राव ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड आणि तामिळ भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदुस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, रान्या रावचे सावत्र वडील के रामचंद्र राव हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते कर्नाटक राज्य पोलिस दलात महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. रान्या रावचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलूर या गावात झाला. तिने आपलं प्राथामिक आणि माध्यमिक शिक्षण बेंगळुरूमधून पूर्ण केलं. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी रान्याने दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं.

२०१४ मध्ये सिनेसृष्टीत पाऊल

२०१४ मध्ये रान्या रावने ‘मानिक्य’ या प्रसिद्ध कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने अभिनेता सुदीपबरोबर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला, ज्यामुळे अत्यंत कमी वेळात तिला मोठी लोकप्रियता मिळाली. मिंटच्या मते, रान्या रावच्या आईने आणि तिच्या समर्थकांनी कास्टिंग कोऑर्डिनेटरसोबत तिचा पोर्टफोलिओ शेअर केला होता. यानंतरच रान्या रावला चित्रपटात अभिनेत्रीच्या भूमिकेत घेण्यात आलं.

आणखी वाचा : Who is DJ Daniels : 13 वर्षीय मुलगा झाला अमेरिकेचा गुप्तचर एजंट; कोण आहे डीजे डॅनियल्स?

त्यानंतर दोन वर्षांनी, रान्या रावने ‘वागह’ या तामिळ चित्रपटात अभिनय केला. त्यात विक्रम प्रभू या अभिनेत्याबरोबर तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं. 2017 मध्ये रान्या रावने ‘पटकी’ या कन्नड चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते गणेशबरोबर मुख्य भूमिका रंगवली होती. स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, वर्षांपासून रान्या राव ही सिनेसृष्टीपासून दूर होती. गेल्या काही दोन वर्षात तिने एकाही चित्रपटात भूमिका साकारली नाही.

रान्या रावला अटक का करण्यात आली?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या राव वारंवार दुबईला जात होती. ज्यामुळे ती महसूल गुप्तचर यंत्रणेच्या रडावर आली. अधिकाऱ्यांनी तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं होतं. बुधवारी (5 मार्च) अभिनेत्री दुबईहून बेंगळुरू विमानतळावर आली. तेव्हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी एका पोलिस अधिकाऱ्याची मुलगी आहे, तुमच्याकडे माझी चौकशी करण्याची परवानगी आहे का, असं म्हणत रान्या रावने हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

प्राथमिक तपासानुसार, अभिनेत्रीने तिच्या संपर्काचा वापर करून महसूल गुप्तचर विभागाच्या तपासणीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी रान्या रावला चौकशीसाठी थांबवल्यानंतर तिने आपले वडील कर्नाटकचे पोलिस महासंचालक आहेत, असं सांगून दमदाटीही केली. इतकंच नाही तर, अभिनेत्रीने तिला घरी घेऊन जाण्यासाठी स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. विमानातील इतर प्रवाशांना इमिग्रेशन प्रक्रियेतून जावं लागतं. मात्र, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, रान्या रावने विना तपासणी विमानतळाबाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांकडून अभिनेत्रीची झाडझडती

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, प्रोटोकॉल कॉन्स्टेबल किंवा अधिकाऱ्यांवर आरोप करणं चुकीचं ठरेल. परंतु, रान्या रावने केलेलं गैरवर्तन चुकीचं होतं. दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीची झाडझडती घेतली. तेव्हा तिच्याकडे तब्बल १४.२ किलोग्रॅम वजनाचे सोन्याचे बार सापडले. रान्या रावने अतिशय शिताफीने हे सोन्याचे बार कपड्यांमध्ये लपवून आणल्याचा आरोप तपासकर्त्यांनी केला.

टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने अंगाला बांधलेल्या बेस्टमध्ये हे बार लपवले होते. जेव्हा पोलिसांनी तिला बेल्ट काढण्यास सांगितले, तेव्हा अभिनेत्री सुरुवातीला टाळाटाळ केली. कारवाईचा धाक दाखवल्यानंतर तिने आपला बेल्ट महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. जेव्हा अधिकाऱ्यांनी बेस्टची तपासणी केली, तेव्हा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे बार आढळून आले. “सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार १२.५६ कोटी रुपये किमतीचे हे अवैध सोनं आम्ही जप्त केलं असून अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे”, असे डीआरआयने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा : Shahzadi Khan Case : यूएईमध्ये भारतीय महिलेला फाशी का देण्यात आली? शहजादी खान कोण होती?

अभिनेत्रीच्या निवासस्थानातही सापडलं सोनं

डीआरआयच्या निवेदनानुसार, रान्या रावच्या बेंगळुरूतील लावेल रोड येथील निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली. तिथेही आणखी काही सोन्याचे दागिने सापडले आहेत. पोलिसांनी अभिनेत्रीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, रान्या राव सोन्याची तस्करी करण्यासाठी कितीवेळा दुबईला गेली, याचा तपास करण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तिच्याबरोबर या कामात आणखी कोणकोणते व्यक्ती होते, याचीही चौकशी केली जात आहे.

लोकप्रिय अभिनेत्रीला अटक झाल्याने खळबळ

अशी चर्चा आहे की, अभिनेत्रीने चार महिन्यांपूर्वी जतीन हुक्केरीशी विवाह केला होता. तिचा पती एक आर्किटेक्ट असून त्याने पब आणि मायक्रोब्रुअरीजच्या डिझाइन तयार केल्या आहेत. रान्या रावला अटक केल्यानंतर तिच्या वडिलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितलं की, त्यांचा रान्या राव आणि तिच्या कामाशी अजिबात संबंध नाही. अभिनेत्रीने लग्न कधी आणि कुठे केले याबाबतही त्यांना माहिती नाही. दरम्यान, एका लोकप्रिय अभिनेत्रीला सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडल्याने सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस रान्या रावची कसून चौकशी करत असून त्यामध्ये काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.