कन्नड अभिनेत्री रान्या रावला बंगळुरूमधील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली. तिच्याकडे सुमारे सुमारे १२ कोटी रुपये किमतीचे तब्बल १४.८ किलो सोने सापडले. या प्रकरणामुळे भारतातील सोने तस्करीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोने तस्करीत बदल झाला आहे. निरनिराळ्या क्लृप्त्या करून सोने भारतात आणले जात आहे. सोने तस्करीचे बदललेले स्वरूप कसे आहे, तस्कर भारतात सोने कसे आणतात याविषयी जाणून घेऊ या…
भारतात सोने तस्करीचे प्रमाण किती?
भारतात सोन्याला प्रचंड मागणी असून गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) २०२३-२४ मध्ये एक हजार ३१९ किलो सोने जप्त केले. म्यानमारमधून २०२३ पासून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत तस्करीतील ३७ टक्के सोने म्यानमारमार्गे भारतात आले होते. मात्र भारतात होणाऱ्या सोने तस्करीचे केंद्र दुबई आहे. वर्षानुवर्षे भारतात दुबईतूनच सोन्याची तस्करी होत आहे. पण आता तस्करीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात येत आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यामध्ये भारतासह विविध देशांतील टोळ्यांचा सहभाग आहे. दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियातून सोने दुबईला आयात केले जाते. हे सोने छुप्या पद्धतीने विविध देशांतून भारतात पाठवले जाते. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील टोळ्यांनी दुबईतील आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग बनून कोट्यावधींचा नफा कमावला. महसूल गुप्तचर संचालनालयाने २०२१-२२ मध्ये जप्त केलेले ३७ टक्के सोने म्यानमारमधून, तर २० टक्के आखाती देशांतून, सात टक्के बांगलादेशातून, तर ३६ टक्के इतर देशांतून भारतात तस्करीद्वारे आणण्यात आले होते.
सोन्याची तस्करी का केली जाते?
भारतात सोन्याला अधिक मागणी आहे. मागणीची पूर्तता करण्यासाठी सोने आयात करण्याचेही पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी सरकारने दिलेल्या परवान्याची आवश्यकता असते. आयात केलेल्या सोन्यावर सीमाशुल्क आणि इतर शुल्कासह सुमारे २५ टक्के रक्कम भरावी लागते. तसेच आयात करण्यासाठी काळ्या पैशांचा वापर केल्यास अटक होऊ शकते. पण तस्करी करून सोने भारतात आणले, तर एका किलोमागे लाखो रुपयांचा फायदा होता. तसेच काळ्या पैशांचा वापर तस्करीत करून तो चलनात आणता येऊ शकतो. त्यामुळे आयातीचा पर्याय उपलब्ध असतानाही सोन्याची तस्करी केली जाते.
सोन्याची तस्करी कशी रोखण्यात येते?
विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांचे प्रोफाइलिंग, बॅगांची काटेकोरपण तपासणी, श्वान पथके, गुप्त माहिती, तसेच आखाती देश व इतर संवेदनशील ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांच्या विशेष तपासणीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सीमाशुल्क विभाग व डीआरआय या यंत्रणा सोन्याची तस्करी रोखण्यासाठी सक्रिय आहेत. याशिवाय विमानतळावर केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना तस्करी रोखण्यासाठी बॅगा तपासणीचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.
म्यानमारमधून तस्करी का वाढली?
म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरमधील तमू-मोरेह-इंफाळमार्गे आणि मिझोराममधील जोखटवारमार्गे देशात सर्वाधिक सोन्याची तस्करी होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे म्यानमारहून भारतात सोन्याची तस्करी करणे तुलनेने सोपे आहे. भारतातून म्यानमारमध्ये पाच किलोमीटर आत जाण्यासाठी कोणतेही बंधन नाही. फक्त ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ते दाखवून कोणालाही म्यानमारमध्ये जाता येते. तिथून विविध वस्तूंची खरेदी करून नागरिक परत येतात. सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या टोळ्या याचा फायदा घेतात. एक तर म्यानमारमधील तस्कर भारतात सोने पुरवतात किंवा इथल्या टोळ्या म्यानमारमधून सोने आणतात. विमानतळ व बंदरांच्या तुलनेत म्यानमार सीमेवर कमी तपासणी होते. तस्कर त्याचाच फायदा घेत होते. पण गेल्या काही वर्षांपासून म्यानमारमध्येही मोठ्या प्रमाणात कारवाई होऊ लागल्यामुळे तस्करांनी आता नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करी कशी?
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणांची नजर आहे. त्यामुळे तस्कर आंतरराष्ट्रीय विमानतळाऐवजी देशांतर्गत (डोमॅस्टिक) विमानतळावरून सोने बाहेर काढत आहेत. त्यातूनच भिंतीवरून सोन्याची पाकिटे फेकणे, काचेच्या दोन पार्टिशनमध्ये सोन्याच्या भुकटीची पाकीटे फेकण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या वर्षी अशा कार्यपद्धतीचा अवलंब करून तस्करी करणाऱ्या किमान १० हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनाही याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळावरही गस्ती वाढवण्यात आली आहे.
सोने तस्करीचे व्यवहार कसे होतात?
तस्करीचे सोने भारतात विकण्यासाठी हवाला व्यवसायाप्रमाणे एक ते १० रुपयांच्या चलनी नोटांचा वापर केला जात होता. या नोटांचा टोकन म्हणून वापर केला जात होता. डीआरआयने १४७३ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी रईस अहमद अक्केरी याला अटक केली. त्याच्या चौकशीत ही बाब उघड झाली. विश्वासू सराफाबरोबर दूरध्वनीवरून व्यवहार निश्चित करण्यात येतो. त्यावेळी एक ते दहा रुपयांच्या नोटांचा क्रमांक संबंधित सराफाला देण्यात येतो. विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला हा टोकन क्रमांक सांगितल्यानंतर त्याला सोने देण्यात येते. अन्यथा व्यवहार होत नाही.
सोने तस्करीसाठी कोणत्या क्लृप्त्या?
सोने तस्करीसाठी तस्कर विविध क्लृप्त्या लढवत आहेत. चॉकलेटचा थर चढवलेले सोने वेष्टनात दडवून, गृहोपयोगी वस्तू, लॅपटॉप, हेअर ड्रायरसारख्या वस्तूंमध्ये सोने लपवून त्याची तस्करी केली जाते. सध्या शरीरात, अंतर्वस्त्रांमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली जाते. सोन्याची भुकटी कॅप्सूलमध्ये भरून ती गिळून तस्करी केली जाते. अशा तस्करांना केळी वा पाणी दिले जाते. याशिवाय सोन्याची भुकटी करून मेणामध्येही लपवून त्याची तस्करी केली जाते.