भक्ती बिसुरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मानवी बुद्धिमत्ता आणि विज्ञान-तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणातून लावण्यात येत असलेले कित्येक शोध आश्चर्यचकीत करणारे आहेत. अशाच शोधांमध्ये समावेश होईल, असा अगदी अलीकडे लागलेला एक शोध म्हणजे अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांच्या गटाने शुक्राणू आणि स्त्रीबीजांच्या वापराशिवाय केलेल्या कृत्रिम मानवी भ्रूणनिर्मितीचा शोध. अनेक वैज्ञानिक नियतकालिकांनी या शोधाची दखल घेतली आहे.
संशोधन नेमके काय?
स्त्रीबीजे आणि पुरुषांमधील शुक्राणू यांच्या संयोगातून स्त्रीच्या शरीरात गर्भधारणा होते, हे आपण जाणतोच. गेल्या काही वर्षांमध्ये वंध्यत्वासारख्या वैद्यकीय समस्येवर उपाय आणि दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीसाठी ‘आयव्हीएफ’सारख्या उपचार तंत्रांचा वापर होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. ‘आयव्हीएफ’सारखे तंत्रज्ञानही स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचा प्रयोगशाळेत संकर घडवून मानवी भ्रूणनिर्मिती करतो. मात्र, आता याच्या एक पाऊल पुढे जाऊन, स्त्रीबीज आणि शुक्राणूच्या मदतीशिवायच केवळ स्टेम सेलच्या वापरातून कृत्रिम मानवी भ्रूणनिर्मिती केल्याचा दावा अमेरिका आणि ब्रिटनमधील शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. संशोधनातून निर्माण झालेली मानवी भ्रूणरचना अत्यंत प्राथमिक टप्प्यात आहे. म्हणजे मानवी देहातील अत्यंत महत्त्वाचे अवयव – धडधडणारे हृदय, शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू- यात नाहीत. मात्र, एक संशोधन म्हणून ही निर्मिती महत्त्वाची ठरते. हे संशोधन एका प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकाकडून स्वीकारले गेले आहे. मात्र प्रकाशित केले गेले नाही.
संशोधनाचे महत्त्व काय?
या संशोधनाचा उद्देश नवीन जीव जन्माला घालणे हा नसून, जन्माला येणारे जीव अधिकाधिक निरोगी असणे, त्यांमध्ये जनुकीय दोष न राहणे, तसेच गर्भपात टाळता येणे हा आहे. कृत्रिम मानवी भ्रूणनिर्मितीद्वारे या उद्देशांवर काम करण्याचा प्रयत्न असल्याचे ते सांगतात. तसेच, संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांच्या मते, कृत्रिम मानवी भ्रूणनिर्मिती अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. ‘आयव्हीएफ’मधून जन्माला येणारे मानवी भ्रूण कायदेशीर, तसेच नैतिक चौकटीत आहे. मात्र, या संशोधनाबाबत किंवा भविष्यात अशाप्रकारे भ्रूणनिर्मिती करण्याबाबत अनेक नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यताही आहे. मात्र, हे संशोधन मानवी शरीरातील आनुवंशिक रोग, तसेच गर्भवती महिलांमध्ये होणारा गर्भपात यांची कारणे शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा दावा संशोधकांकडून करण्यात येत आहे.
बाळ जन्माला घालणे शक्य?
या नव्या संशोधनातून बाळाला जन्म देणे अद्याप शक्य होणार नाही. कारण प्रयोगशाळेत तयार झालेले मानवी भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि नैतिक पाठबळ या संशोधनाला नाही. ‘आयव्हीएफ’सारख्या अत्याधुनिक उपचार प्रणालींमध्ये तयार होणारे भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात वाढवून बाळाला जन्म दिला जातो. या संशोधनाच्या बाबत तशी कायदेशीर तरतूद नसल्याने अद्याप ते शक्य होणार नाही.
तातडीने नियमावलीची गरज?
‘आयव्हीएफ’मधून जन्माला येणारे मानवी भ्रूण कायदेशीर आणि नैतिक ठरवणारे नियम आणि कायदे आहेत. तशाच प्रकारचे कायदे यापुढे लवकरात लवकर स्टेम सेल वापरातून निर्माण केल्या गेलेल्या कृत्रिम मानवी भ्रूणासाठी असावेत, अशा मागणीचा सूर जगभरामध्ये उमटत आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या वापराला कायदेशीर, नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल, अशी संशोधकांची अपेक्षा आहे.
भविष्य काय?
हे संशोधन अद्याप अत्यंत प्राथमिक टप्प्यावर आहे. तसेच वैद्यकीय तंत्रज्ञान म्हणून त्याच्या वापराला कायदेशीर किंवा नैतिक मान्यता नाही. त्यामुळे स्वाभाविकच भविष्यात अशा भ्रूणाचे मानवी शरीरात रोपण करून त्याद्वारे मूल जन्माला घालणे हे अशक्य, तसेच बेकायदा ठरणार आहे. त्यामुळे किमान सद्य:स्थितीत तरी या संशोधनाचे महत्त्व वैद्यकीय, तसेच आरोग्य क्षेत्रातील काही आव्हानांवर उत्तरे शोधण्यापुरतेच मर्यादित राहील, अशी शक्यता दिसते.