Adhik Maas 2023:चातुर्मासाला सुरुवात झाली आहे. चातुर्मासाचा कालखंड शुभ मानला जातो. या काळात अनेक व्रतवैकल्य केली जातात. या चार महिन्यातील प्रत्येक महिन्याचे स्वतःचे असे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. या वर्षी चातुर्मासाचा कालावधी लांबला आहे. हे वर्ष अधिक मासाचे आहे. या वर्षी अधिक मास तब्बल १९ वर्षांनी श्रावण महिन्यात आल्याने या मासाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अधिक मास कधी? येतो हे जाणून घेणे उपयुक्त ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काळ म्हणजे काय?

मास, दिवस, वर्ष ही कालदर्शक एकके आहेत. काळ हा प्रवाही आहे. तो सजीव सृष्टीच्या चलित चक्राचे प्रतिनिधित्त्व करतो. काळ थांबला म्हणजे सृष्टी थांबली असे मत तत्त्ववेत्ते मांडतात. म्हणूनच कदाचित काळाच्या अस्तित्त्वाची चर्चा तत्त्वज्ञापासून ते विज्ञानापर्यंत सर्वच क्षेत्रात सविस्तरपणे झाल्याचे लक्षात येते.

काळाची अनेक वर्णने आहेत. काळ हा डोळ्यांनी दिसत नाही, तो चराचरात असतो. तो भूतही आहे, तो भविष्यही आहे. तो भविष्याकडून वाहत येतो, क्षणभर वर्तमानात नांदतो आणि भूताला (भूतकाळाला) जावून मिळतो. म्हणजेच तो गेलेल्या क्षणातही आहे आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणात तो असणार आहे. असे असले तरी भूत, वर्तमान, भविष्य अशा मर्यादा काळाला नाहीत. कारण काळ ही संकल्पना अंतर्विरोधी आहे. तत्ववेत्त्यांनी काळाचे वर्णन ‘आभास’ असेही केले आहे. डोळ्यांनी घड्याळातील काटे दिसतात, खुणा दिसतात, काट्यांची गती दिसते, कॅलेंडर मधील दिवस दिसतात. म्हणजेच काळ दिसत नसला तरी त्याचे अनुमान घड्याळ, कॅलेंडरच्या माध्यमातून प्रकट होते. म्हणूनच घड्याळ, कॅलेंडर किंवा पंचांग रोजच्या कालमापनासाठी अविभाज्य घटक ठरले आहेत. याच काळाच्या गणिताची सांगड दिवस, मास, वर्ष यांच्यात करताना पंचांगात ‘अधिक मास’ प्रकट होतो.

अधिक वाचा: विश्लेषण : भारतात टोमॅटो आला कुठून ? केव्हा ? 

कालमापन कसे ठरते ?

प्रादेशिक तसेच सांस्कृतिक फरकानुसार जगाच्या इतिहासात कालमापनाच्या अनेक पद्धती आढळतात. मुख्यत्त्वे प्राचीन संस्कृतींमध्ये चंद्र व सूर्य यांना प्रधान ठेवून कालगणना व कालनिर्देश करण्यात आल्याचे लक्षात येते. उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यात मानवाने वेळ, दिवस ठरविण्यासाठी निसर्गाला प्राधान्य दिले. सूर्य आणि चंद्र हे स्पष्ट रूपात डोळ्यांनी दिसणारे आहेत. इतकेच नाही तर सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्य मुळे दिवस आणि रात्र या घटनांची अनुभूती होते. चंद्राच्या कला, पौर्णिमा आणि अमावस्या यामुळे महिन्याची मांडणी करता येते. यामुळेच भारतातचं नव्हे तर प्राचीन अनेक संस्कृतींमध्ये चंद्र आणि सूर्य यांनाच प्रत्यक्षप्रमाण मानून कालगणना आणि कालनिर्देशन करण्यात आले. पृथ्वीचे अक्षभ्रमण (स्वतःभोवती फिरणे), चंद्राचे पृथ्वीभोवती कक्षाभ्रमण आणि पृथ्वीचे सूर्याभोवती कक्षाभ्रमण या तीन गोष्टींवरून अनुक्रमे दिवस, महिना व वर्ष यांचे सामान्यतः कालमापन होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी याबाबत नमूद केले आहे की, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही काळाची पाच अंगे असून; सूर्य, पृथ्वी व चंद्र यांच्या गतीमुळे ही अंगे तयार होतात. पंचांगात या पाच अंगाचे दिवसागणिक स्पष्टीकरण दिलेले असते. म्हणजे एकूणच रोजचा येणारा दिवस, महिना आणि वर्ष हे सूर्य, पृथ्वी, चंद्र यांच्या हालचालींवर अवलंबून असते.

अधिक मास म्हणजे काय?

जगातील वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये काही ठिकाणी सूर्यप्रधान दिनदर्शिका पारंपरिकरित्या वापरली जाते, तर काही ठिकाणी चंद्रप्रधान दिनदर्शिका वापरण्यात येते. भारतात मात्र चंद्र, सूर्य, चांद्रसौर (चंद्र-सूर्य एकत्रित) अशा तीनही पद्धतींचा वापर प्राचीन काळापासून कालगणनेसाठी करण्यात आलेला आहे. भारतातील पंजाब, बंगाल, केरळ, ओडिशा, तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये सूर्य वर्ष अनुसरले जाते. तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यांमध्ये चांद्र वर्ष अनुसरले जाते. चांद्र व सौर वर्ष यांच्यात दिवसांची तफावत आढळते. त्यामुळेच भारतात चांद्र-सौर हे एकत्र (हिंदू) पंचांग (संपूर्ण भारतासाठी) वापरले जाते. चांद्र-सौर या एकत्र हिंदू पंचांगानुसार सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यात सामंजस्य निर्माण करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी अधिक मास समाविष्ट केला जातो. याच अधिक महिन्याला धोंड्याचा मास, पुरुषोत्तम मास, मल मास अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. यावर्षी अधिक मास हा श्रावण महिन्यात आला असून श्रावण महिना ५९ दिवसांचा असणार आहे. १८ जुलै ते १६ ऑगस्ट असा अधिक मासाचा कालावधी असणार आहे. आपल्या रोजच्या वापरातील ग्रेगरिअन कॅलेंडर हे सौरवर्ष प्रधान आहे. सूर्य आणि चंद्र यांच्या वर्षातील दिवसांमधील तफावत लक्षात घेणारे आणि अधिक मासाची योजना करणारे हिंदू पंचांग हे एकमेव आहे.

अधिक वाचा: हिंदू, जैन व बौद्ध : चातुर्मासाची अस्सल भारतीय परंपरा !

अधिक मास कसा मोजला जातो?

पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते त्याला एक वर्ष लागते, ते वर्ष सौर वर्ष म्हणून ओळखले जाते. तर चांद्रमासाची गणना चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कालावधीने केली जाते. शालिवाहन शकाच्या कालगणनेप्रमाणे चैत्र, वैशाख हे महिने चंद्राच्या गतीप्रमाणे आणि नक्षत्रांवरून मोजले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार सौर वर्ष हे ३६५ दिवस, ६ तास आणि ११ सेकंदाचे असते, तर चांद्रवर्ष हे ३५४ दिवस आणि ९ तासांचे असते. पृथ्वीला सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे ३६५ दिवस लागतात. या कालखंडात चंद्र सूर्याभोवती १२ प्रदक्षिणा पूर्ण करतो. म्हणजेच १२ चांद्रमास होतात. या १२ चांद्रमासाच्या कालावधीस एक चांद्रवर्ष म्हणतात. एक चांद्रमास सरासरी २९.५ दिवसांचा असतो, म्हणजे एक चांद्रवर्ष हे ३५४ दिवसांचे होते. म्हणजेच या दोन्ही वर्षांमध्ये साडेअकरा दिवसांचा फरक पडतो. या परिस्थितीत हे वाढीव दिवस दर तीन वर्षांनी अधिक मासाच्या रूपात भरून काढले जातात. म्हणजेच दोन अधिक मासांमध्ये साधारण ३२ महिने १६ दिवसांचा फरक असतो. त्यामुळेच अधिक मासाच्या वर्षी चांद्रवर्ष हे १३ महिन्यांचे असते.

१९ वर्षांनी अधिक मास श्रावण महिन्यात कसा?

चांद्र आणि सौर वर्षांमध्ये दरवर्षी आढळणारी तफावत ही दर तीन वर्षांनी अधिक मासाच्या स्वरूपात भरून काढली जाते. हा अधिक मास चैत्र ते अश्विन या सात महिन्यांच्या कालखंडात येतो. म्हणजेच एकूण सात अधिक मास असतात. हे चक्र १९ वर्षांनी पूर्ण होते.

अधिक मास कोणत्या महिन्यात येणार हे कसे ठरविले जाते?

अधिक मास कोणत्या महिन्यात येणार यासाठी काही गणिती समीकरणं वापरली जातात. त्यापैकी विक्रम संवत वर्ष प्रमाण मानून मिळालेलं उत्तर अधिक विश्वासार्ह मानले जाते. या समीकरणानुसार सध्या सुरू असलेल्या विक्रम संवत्सरात अधिक चोवीस करून आलेल्या उत्तराला १६० ने भागले जाते. त्यातून जी बाकी उरते, त्यानुसार अधिक मास कोणत्या महिन्यात येणार हे ठरविले जाते. बाकी जर ३०, ४९, ६८, ८७, १०६ किंवा १२५ असेल तर अधिक मास चैत्र वर्षात येईल. त्याचप्रमाणे ११, ७६, ९५, ११४, १३३ किंवा १५२ असेल तर वैशाख; ०, ८, १०, २७, ३८, ४६, ५७, ६५, ८४, १०३, १२२, १४१, १४९ असेल तर ज्येष्ठ; १६, ३५, ५४, ७३, ९२, १११, १३०, १५७ असेल तर आषाढ; ५, २४, ४६, ६२, ७०, ८१, ८२, ८९, १००, १०८, ११९, १२७, १३८, १४६ असेल तर श्रावण; १३, ३२, ५१ असेल तर भाद्रपद २, २१, ४०, ५९, ७८, ९७, १३५, १४३, १४५ किंवा १६६ असेल तर अश्विन्यात अधिक मास येतो. याशिवाय सुरू असलेले शालिवाहन शक संवत १२ ने गुणिले असता आलेले उत्तर १९ ने भागले असता जर बाकी ९ पेक्षा कमी आल्यास त्या वर्षी अधिक मास असतो.

अधिक वाचा: चातुर्मास: सूर्याच्या उपासनेचा भारतीय उपखंडातील इतिहास!

अधिक मास आणि क्षयमास

हिंदू पंचांगानुसार चांद्रमासाच्या प्रत्येक महिन्यात सूर्य संक्रांत येते. म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. १२ राशी आहेत, १२ महिने असतात. चैत्रात मेषसंक्रांत, वैशाखात वृषभसंक्रांत असते, तोच नियम अनुक्रमे इतर राशी व महिन्यांसाठी असतो. ज्या वर्षी ज्या महिन्यात ही संक्रांत येत नाही तो महिना म्हणजे अधिक मासाचा असतो. दर वर्षी सौरवर्ष व चांद्रवर्ष यांच्यातील तफावतीचे वाढीव दिवस एकत्रित तीन वर्षांनी अधिक मास म्हणून मोजले जातात. म्हणजेच या अधिक मासात सूर्य संक्रांत होत नाही. कारण ते वाढीव दिवस असतात. अधिक मासाला पुढे येणाऱ्या मासाचे नाव असते. असा अधिक महिना कमीत कमी २७ तर जास्तीत जास्त ३५ महिन्यांनी हा येतो. म्हणूनच या वर्षी अधिक मास आषाढ आणि श्रावण यांच्या दरम्यान आल्याने यास श्रावणाचा अधिकमास म्हणून संबोधले जाते आहे. त्याच कारणामुळे श्रावणात येणारी व्रत वैकल्ये ही अधिक मासात साजरी करण्यात येणार नाहीत, तर ती पवित्र म्हणजेच मूळ श्रावण महिन्यात साजकी करण्यात येणार आहेत.

चांद्र व सौर कालगणनेत मेळ घालण्यासाठी अधिक मास आणि क्षयमास यांची योजना केलेली आहे. ज्या चांद्रमासात दोन संक्रांती येतात तो क्षयमास असतो. क्षयमास हा कार्तिक, मार्गशीर्ष व पौष या महिन्यातच येतो. या कालावधीत सूर्याची गती जलद असते. या काळात वृश्‍चिक, धनू व मकर या राशी आक्रमण्यास सूर्याला २९ १/२ दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. अशा वेळी एकाच चांद्रमासात दोन संक्रांती येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ : जर सूर्य एका चांद्रमासात मेष आणि वृषभ राशीत प्रवेश करत असेल, तर त्याला चैत्र-वैशाख क्षय-मास म्हणतात. चैत्र आणि वैशाख असे वेगळे महिने गृहीत धरले जात नाही. ज्या वर्षी क्षयमास येतो त्याच्या आधी व नंतर ३-४ महिन्यांच्या अवधीत अधिक मास असतोच. क्षय-मास फार क्वचितच आढळतो. आतापर्यंत १९ किंवा १४१ वर्षांनी आल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे.

अधिक मासाचे धार्मिक महत्त्व

अधिकमास ही खगोलीय घटना असली तरी या महिन्याचे धार्मिक महत्त्व अनन्य आहे. या मासाच्या उत्पत्ती विषयक अनेक पौराणिक कथा आहे. या काळात केलेल्या दानाचे महत्त्व अधिक आहे. या काळात पुरुषोत्तमाची म्हणजे विष्णूची भक्ती केली जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adhik mas in hindu panchang svs
Show comments