ज्ञानेश भुरे
वयाच्या १७ व्या वर्षी साताऱ्याच्या शेरेवाडी गावातील आदिती स्वामीने तिरंदाजी क्रीडा प्रकारात जागतिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. नागपूरमध्ये प्राथमिक धडे गिरविल्यावर पुढील शिक्षणासाठी ओजस देवताळे देखील साताऱ्यात सरावाला आला. या दोघांनीही कठोर मेहनतीने देशाचे नाव उंचावले आहे. ग्रामीण भागातील क्रीडा गुणवत्ता हेरण्याचे आणि तिला योग्य दिशा देण्याचे महत्त्वही यातून अधोरेखित होते. आदिती, ओजसच्या यशाच्या निमित्ताने…
आदिती आणि ओजसचे यश किती महत्त्वाचे?
तिरंदाजी अर्थात धनुर्विद्या कलेला पुराणकाळापासूनचा इतिहास असला, तरी या कलेला खेळाचा दर्जा मिळाला तेव्हापासून भारत खूपच मागे होता. रिकर्व्ह आणि कम्पाऊंड असे या खेळातील दोन प्रकार. भारतीय तिरंदाज अभावानेच या खेळात चमकत होते. पुढे मग लिंबा राम, डोला बॅनर्जी नंतर दीपिका कुमारी, अतानु दास असे तिरंदाज नावारूपाला आले. पण, तरीही भारत अपेक्षित प्रगती करू शकला नाही. रिकर्व्ह प्रकारात कोरिया, तर कम्पाऊंड प्रकारात अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया असे देश वर्चस्व राखून होते. मात्र, यंदाच्या हंगामापासून किमान कम्पाऊंड प्रकारात भारताने तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभे केले. जागतिक विजेतेपदापर्यंत भारतीय पोचले. आदिती स्वामी आणि ओजस देवताळे यांच्या जागतिक यशानंतर आता अधिकाअधिक भारतीय युवक, युवती या खेळाकडे वळतील, अशी अपेक्षा आहे.
ग्रामीण भागात क्रीडा गुणवत्ता दडली आहे का?
शेतात कामाची सवय आणि त्यामुळे काटक झालेली शरीरयष्टी यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू मैदानावर उभा राहतो, तेव्हा तो तुलनेत शहरातील अन्य खेळाडूंपेक्षा अधिक तंदुरुस्त दिसून येतो. पण, खेळण्यासाठी नुसती तंदुरुस्ती असून चालत नाही तर ती शिकण्याची आवड आणि चिकाटीदेखील असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आयुष्य जगत असल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या मुलांमध्ये या गोष्टी सहजपणे आढळतात. गरज आहे ती फक्त त्यांच्यातील गुणवता शोधून त्यांना पैलू पाडण्याची. आदिती ग्रामीण भागातच लहानाची मोठी झाली. ओजस नागपूरमध्ये घडला. पण, अधिक चांगल्या प्रशिक्षणासाठी ओजसनेही साताऱ्याची वाट धरली.
विश्लेषण : सीबीएसई शाळांमध्ये बहुभाषिक शिक्षण मिळेल?
ग्रामीण भागात आवश्यक सुविधांची कमतरता जाणवते का?
ग्रामीण भागात क्रीडा गुणवत्ता भरभरून असली, तरी त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची कमतरता तेवढीच प्रकर्षाने जाणवत आहे. सरावासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित सुविधांचा आधार घेतच येथील खेळाडू आपली कारकिर्द घडवताना दिसून येतात. याला आदितीदेखील अपवाद नाही. प्रवीण सावंत यांनी साताऱ्यातील एका उसाच्या शेतात सुरू केलेल्या अकादमीत आदिती नावारूपाला आली. आजही आदिती मार्गदर्शन घेत असलेल्या दृष्टी तिरंदाजी अकादमीत सुविधांची वानवाच आहे. प्रवीण सावंत यांनी जिल्हा परिषदेला वारंवार मागण्या करूनही आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीतूनही सावंत यांनी दोन जगज्जेते तिरंदाज घडवले.
भारतीय तिरंदाजीतील यशात महाराष्ट्राचा वाटा किती महत्त्वाचा?
तिरंदाजीतील रिकर्व्ह आणि कम्पाऊंड या दोन प्रकारांपैकी आतापर्यंत केवळ ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या रिकर्व्ह प्रकाराला महत्त्व दिले जात होते. डोला बॅनर्जीपासून दीपिका कुमारी, अतानु दास असे एकापेक्षा एक सरस भारतीय तिरंदाज याच ऑलिम्पिक प्रकारात उदयास आले. झारखंड येथील टाटा अकादमीतूनच भारताचे आतापर्यंतचे तिरंदाज नावारूपाला आले. पण, जागतिक स्पर्घेत सुवर्णपदकापर्यंत कुणीच पोचू शकले नाहीत. आता आदिती आणि ओजसच्या यशाने सातारा हे भारतीय तिरंदाजीतील नवे केंद्र म्हणून नावारुपाला येईल. जागतिक स्तरावर एकाचवेळी तीन सुवर्णपदके भारताला मिळाली आणि तीदेखील महाराष्ट्राच्या खेळाडूंमुळे.
गुणवत्ता जोपासण्यासाठी किंवा प्रसारासाठी काय उपाय आवश्यक?
आज भारतात खेळ प्राधिकरण (साई) ही संस्था आहे. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून दुसरे केंद्र निर्माण झाले आहे. मात्र, यांच्या शाखा महाराष्ट्रात नाहीत. तिरंदाजीत केवळ अमरावती येथे साईचे केंद्र आहे. खेलो इंडियाची अकादमीदेखील महाराष्ट्रात नाही. रिकर्व्हसाठी पुण्यात लष्करी क्रीडा संस्थेत सुविधा आहेत. पण, त्या सर्वांना सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे साई किंवा खेलो इंडियाची एक-दोन केंद्रे महाराष्ट्रात सुरू झाल्यास तिरंदाजांना फायदाच होईल. साताऱ्यातील प्रवीण सावंत यांच्यासारख्या प्रयत्नशील प्रशिक्षकांना आधारच मिळेल.
कम्पाऊंड प्रकार ऑलिम्पिकमध्ये का नाही?
या मागील एक मुख्य कारण म्हणजे या प्रकारातील तिरंदाजी स्पर्धेने एक तर प्रासंगिकता गमावली आहे. कम्पाऊंडमध्ये तंत्रज्ञानाचा अधिक वापर होत असल्यामुळे अजून या प्रकाराकडे गांभीर्याने बघितले जात नाही. दुसरे आणखी एक कारण म्हणजे कम्पाऊंडसाठी लागणारी उपकरणे ही तुलनेने महाग आहेत आणि ती सहज उपलब्ध होत नाहीत. आता बर्लिन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत केवळ ७० टक्के देशांनी सहभाग घेतला होता.
कम्पाऊंड प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये समावेश शक्य होईल का?
वर्ल्ड आर्चरी (जागतिक तिरंदाजी) ही तिरंदाजी खेळावर नियंत्रण असणारी शिखर संघटना कम्पाऊंडचा समावेश ऑलिम्पिकमध्ये व्हावा यासाठी काही वर्षांपासून आग्रही आहे. अमेरिका, कोलंबिया, मेक्सिको या देशांत हा क्रीडा प्रकार खूप लोकप्रिय आहे. आता २०२८ ऑलिम्पिक अमेरिकेत होणार आहे. या स्पर्धेत या खेळाचा प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश होणार असून, त्यानंतर २०३२ मधील ऑलिम्पिकमध्ये या क्रीडा प्रकाराचा समावेश अपेक्षित आहे. मात्र, या सर्वांचा निर्णय या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीवर अवलंबून असेल.