What is toxic masculinity : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘अॅडलेसन्स’ नावाची एक वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. अगदी आठवडाभरातच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. एका १३ वर्षीय किशोरवयीन मुलाची कथा या वेबसीरिजमधून दाखवण्यात आली आहे. ज्याला अल्पवयीन मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली जाते. काहींनी या वेबसीरिजचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तर काहीजण मालिकेच्या कथेवरून दिग्गदर्शकांना लक्ष्य करीत आहेत. दरम्यान, या वेबसीरिजमुळे ‘विखारी पौरुषत्वाची (Toxic Masculinity) पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ते नेमकं काय आहे? विखारी पौरुषत्व कशामुळे वाढतं? याबाबत जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

विखारी पौरुषत्व म्हणजे काय?

पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त कमकुवत असतात, असा संभ्रम पूर्वीपासून अनेकांच्या मनात आहे. पैसा कमावणं आणि घर चालवण्याची जबाबदारी पुरुषांची असते. महिलांनी फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी सांभाळाव्यात हा सामाजिक विचारसणीचा एक भाग आहे. आजही बऱ्याच भागांत घरातील अंतिम निर्णय पुरुषच घेतात. वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माच्या आधारे यात काही फरक असू शकतो; परंतु व्यक्तीची प्रतिमा बऱ्याच अंशी सारखीच राहिली आहे. या पुरुषी भावनांमध्ये सामान्यतः विविध वर्तनांचा समावेश असतो, ज्यामध्ये कठोर असणे, आक्रमक असणे, जोखीम घेणे, कमी किंवा अजिबात भावना न दाखवणे, पैसा आणि सत्तेचा पाठलाग करणे यांचा समावेश असतो.

विखारी पौरुषत्व वाढण्यास कोण कारणीभूत?

मुलगा जसजसा मोठा होतो, तसतसे त्याचे पालक त्याला कठोर करण्याचा प्रयत्न करतात. काही जण ‘मर्द को दर्द नही होता’, ‘बायकांसारखे काय रडतो,’ ‘जमत नसेल तर बांगड्या भर,’ ‘असा कसा मर्द?’ अशा अनेक बोचऱ्या शब्दप्रयोगांचा त्याच्यावर मारा केला जातो. ‘द कॉन्व्हर्सेशन’च्या मते, पालक, समवयस्क, माध्यमे आणि शिक्षण प्रणाली यातून अपेक्षित वर्तनाला बळकटी मिळते. एक चांगला पुरुष कसा असायला हवा. त्यानं काय करावं आणि काय करू नये या सर्वांबाबत एक ठरावीक विचारसरणी कदाचित पूर्वीपासूनच ठरलेली आहे.

आणखी वाचा : पाकिस्तानी तरुण व्हिसाविना मुंबईत येऊन वडापाव खाऊन गेला? हे शक्य आहे का? 

विखारी पौरुषत्वाची लक्षणं कोणती?

विखारी पुरुषांमध्ये अनेक प्रकारची विचित्र लक्षणं दिसून येतात. ते सतत कुणावरही शंका घेतात, एखाद्या व्यक्तीला गुलाम करण्याचा प्रयत्न करतात, कधीही कुणाचंही काहीही ऐकून घेत नाहीत. कोणतीही गोष्ट शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जातात. अशा व्यक्ती त्यांच्या जीवनातील लोकांसाठी, विशेषतः महिलांसाठी आणि एकूणच समाजासाठी हानिकारक असतात. अलीकडच्या काळात विखारी पौरुषत्व या शब्दाचा व्यापक वापर झाला असला तरी त्याची उत्पत्ती २० व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली आहे, असं ‘वेबएमडी’मधील वृत्तात म्हटलं आहे.

विखारी पौरुषत्वामुळे काय परिणाम होतात?

पुरुषांचे स्वभाव आणि त्यांचं वर्तन यांचा समाजावर कसा नकारात्मक परिणाम होतो हे पाहूनच विखारी पौरुषत्व हा वाक्यांश तयार झाला, असं सांगितलं जातं. ‘MensCenter.org’ नुसार, महिलांचा लैंगिक छळ, घरगुती हिंसाचार, गुंडगिरी व स्त्रीद्वेष ही विखारी पौरुषत्वाची काही उदाहरणं आहेत. ‘Healthline.org’च्या मते, विखारी पौरुषत्वानं ग्रस्त असलेले लोक समलैंगिक संबंधही प्रस्थापित करतात. ते नेहमीच महिलांविरोधात बोलतात आणि त्यांचा अनादर करतात. महिलांना उपभोगाची वस्तू समजतात.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना तुच्छ वागणूक

‘वेबएमडी’नुसार, पुरुषांनी महिलेबरोबर संभोग केला, तर त्याची प्रशंसा केली जाते. परंतु, एखाद्या महिलेच्या संभोगाबाबत कोणाला कुणकुण लागली, तर तिची समाजात बदनामी केली जाते. विखारी पौरुषत्व हे पुरुषांना हवं ते मिळविण्यासाठी हिंसाचार आणि आक्रमकतेचा वापर करण्यास भाग पाडतं. कोणत्याही गोष्टीवर संताप व्यक्त करणं, एखाद्या महिलेचा पाठलाग करणं, संपत्ती मिळविण्यासाठी कुठल्याही थराला जाणं यांसारखी लक्षणं विखारी पौरुषत्व असलेल्या व्यक्तींमध्ये सहजपणे दिसून येतात. विशेष बाब म्हणजे विखारी पौरुषत्वाला केवळ पुरुषच नाही, तर महिलाही प्रोत्साहन देतात आणि त्यामुळे त्याचा त्यांचे संबंध आणि समाज यांवर विपरीत परिणाम होतो.

एकमेकांना समजून न घेण्याचा प्रयत्न

प्रेमात अजिबात रानटीपणा नसतो. जे लोक स्त्रियांना आपली संपत्ती मानतात, मनात द्वेषाची भावना तयार करतात, एखाद्या व्यक्तीचा सूड घेण्याचा प्रयत्न करतात, अशा वृत्तींतूनच विखारी पौरुषत्व जन्माला येतं. अशा वृत्तीच्या लोकांमुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढू शकतात. त्यामुळे समाजात लैंगिक असमानता आणखी वाढते. दरम्यान, असं वर्तन करणाऱ्या पुरुषांवरही त्याचा मोठा परिणाम होतो. Healthline.org नं २०१८ च्या संशोधनाचा हवाला देत असं म्हटलंय की, अशा वर्तनामुळे पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोपेची कमतरता आणि नैराश्यदेखील येऊ शकते.

विखारी पौरुषत्वाचा कसा प्रतिकार कराल?

‘Medical News Today’नुसार, विखारी पौरुषत्वामुळे पुरुष अतिशय विकृत आणि कठोर होतात. ते कोणत्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा विचार करीत नाहीत. संकेतस्थळानुसार, विखारी पौरुषत्वानं ग्रस्त असलेले लोक शैक्षणिकदृष्ट्या संघर्ष करतात. ते अमली पदार्थांच्या आहारी जाऊ शकतात, किरकोळ गोष्टींवरून स्वत:चे जीवनही संपवू शकतात. मानसिक समस्या निर्माण झाल्यानं त्यांचा इतरांबरोबरचा संपर्क तुटतो आणि ते एकटे पडतात. तज्ज्ञांच्या मते, विखारी पौरुषत्वापासून स्वत:चा किंवा मुलाचा बचाव केला जाऊ शकतो. त्यासाठी खालील गोष्टींचं पालन करायला हवं.

  • मुलांना सामाजिक प्रथा आणि संस्कृती शिकवणे.
  • पालकांनी त्यांच्या मुलांना अपमानित न करणे.
  • मुलांना शारीरिक शिक्षा देणे टाळणे.
  • मुलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण करणे.
  • मुलांना त्यांच्या भावनांवर योग्यरीत्या नियंत्रण ठेवण्यास शिकवणे.
  • मानसिक आरोग्य समस्यांवर उपचार करणे.
  • निरोगी नातेसंबंधांना प्रोत्साहन देणे.

हेही वाचा : India Remittances : अमेरिकेतून भारतात येणारा पैसा अचानक कसा वाढला? त्यामागची कारणं काय?

विखारी पौरुषत्वाचे समाजावर काय परिणाम?

‘वेबएमडी’नुसार, अमेरिकेतील एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की, २२ टक्के पुरुषांना घरकामातून सूट हवी आहे. ही कामं महिलांनीच करावी, असं त्यांचं म्हणणं आहे; तर ४४ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, महिलांनी घरच सांभाळावं. बाहेरील सर्व जबाबदाऱ्या पुरुष पार पाडतील. २८ टक्के लोकांनी म्हटलं आहे की, घरातील सर्व कामं महिलांनीच करावीत. पुरुषांनी स्वयंपाक करणं, साफसफाई करणं यांसारख्या गोष्टींपासून दूर राहायला हवं. दुसऱ्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की, घरातील अंतिम निर्णय आमचाच असेल, असं अमेरिकेतील ३४ टक्के पुरुषांना वाटतं. ४६ टक्के पुरुषांचं असं मत आहे की, जोडीदारानं त्यांना प्रत्येक गोष्ट सांगावी. २३ टक्के पुरुषांनी म्हटलंय की, महिलांकडून तुम्हाला सन्मान हवा असेल, तर त्यांना नजरेसमोरच ठेवावं लागेल.

‘अॅडलेसन्स’ वेब सीरिज इतकी चर्चेत का?

‘अॅडलेसन्स’ वेब सीरिज सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्यामागचं कारण म्हणजे ही मालिका एका किशोरवयीन मुलाबरोबर घडलेल्या प्रसंगावर आधारित आहेत. या मालिकेचे निर्माती करणारे ग्रॅहम म्हणाले, “एके दिवशी मी वर्तमानपत्रात एका १३ वर्षीय मुलाबद्दल एक लेख वाचला, ज्याने अल्पवयीन मुलीची हत्या केली होती. तीन आठवड्यांनंतर मी बातम्या पाहताना मला अशाच प्रकारची आणखी एक घटना घडल्याचं दिसून आलं. त्यात एका तरुण मुलानं त्याच्या मैत्रिणीचा चाकूनं भोसकून खून केला होता. या घटनांनी माझं मन दुखावलं आणि या घटना वेब सीरिजच्या माध्यमातून समाजासमोर आणाव्यात, अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. सहसा वर्तमानपत्रांत वाचलेल्या घटना लोकांच्या लक्षात राहत नाहीत. मात्र, टीव्ही शो किंवा चित्रपटांत दाखवलेल्या प्रसंगांमुळे ते सावधगिरी बाळगतात. या घटनांकडे अनेकांचं लक्ष्य वेधण्यासाठी आम्ही ही वेब सीरिज तयार केली आहे.”

भारतात विखारी पौरुषत्वाची समस्या किती प्रमाणात?

भारतात महिलांचा मातेसमान आदर केला जातो. मात्र, काही विशिष्ट समुदाय महिलांचे अधिकार दडपण्याचे प्रयत्न करताना दिसून येतात. ते महिलांना फक्त उपभोगाची वस्तू समजतात. त्यांनी बाहेरच्या दुनियेकडे लक्ष देऊ नये. चूल आणि मूल हीच जबाबदारी पार पाडावी, असं या समुदायातील लोकांना वाटतं. दररोज भारतातील वर्तमानपत्रांची पानं महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी भरलेली असतात. लैंगिक अत्याचार, हुंड्यासाठी छळ, एकतर्फी प्रेमातून जीवघेणे हल्ले किंवा छेडछाड यांसारख्या घटना दररोज वर्तमानपत्रांत येतात. विशेष म्हणजे काही राजकारणी या घटनांमागे महिलांनाच कारणीभूत धरताना दिसून येतात. विखारी पौरुषत्वाचा सामना करणं इतकं सोपं नाही. परंतु, प्रत्येकानं एकमेकांबरोबर बंधुभावानं वागलं, तर त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adolescence netflix web series new show what is toxic masculinity teenage boys sdp