-रेश्मा राईकवार

एखादी गोष्ट कमीत कमी वेळात आणि कल्पकतेने लोकांपर्यंत पोहोचवणारे सशक्त माध्यम म्हणून जाहिरातींकडे पाहिले जाते. काही सेकंदांच्या या जाहिरातींच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण कल्पना आणि उठावदार आशयाच्या जोरावर आपले उत्पादन देशभर नव्हे जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्या जाहिरातींवर लाखोंनी खर्च करत असतात. मात्र सध्या जाहिराती कल्पक नसल्या तरी चालतील, पण त्या टीकेचा धनी होणार नाहीत ना याची चिंता जाहिरात कंपन्यांना सतावू लागली आहे. अमूक एका जाहिरातीत दाखवल्या गेलेल्या आशयामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे आढळून आले आहे, असे खुद्द अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय) जाहीर केले आहे. भावना दुखावतात या कारणास्तवच आणखी एक जाहिरात आता झोमॅटोे कंपनीला मागे घ्यावी लागली आहे. एरवीही बॉलिवूड कलाकारांवरून वाद सुरूच असतात. मात्र बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हाच या झोमॅटोच्या वादग्रस्त जाहिरातीत असल्यामुळे त्याच्या नावापुढे आणखी एक वाद नोंदवला गेला. 

धार्मिक भावना कशामुळे दुखावल्या?

झोमॅटोच्या जाहिरातीत हृतिक रोशनच्या तोंडी असलेल्या ‘उज्जैनमे थाली खाने का मन किया तो ‘महाकाल’ से ऑर्डर किया’ या संवादावर उज्जैनच्याच प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचे पुजारी आणि विश्वस्तांनी आक्षेप घेतला आहे. महाकाल हे भगवान शंकराचे नाव असल्याने अशा पद्धतीचा उल्लेख धार्मिक भावना दुखावणारा आहे, असा आक्षेप महाकालेश्वर मंदिराशी संबंधितांनी घेतला. त्यावर जाहिरातीतील महाकाल हा उल्लेख तेथील याच नावाच्या प्रसिद्ध रेस्तराँसंदर्भात करण्यात आला होता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. आम्ही जाहिरात मागे घेत आहोत, अशा शब्दांत झोमॅटोने सपशेल माफी मागितली आहे. मात्र या जाहिरातीमुळे माध्यमांमधून पुन्हा एकदा जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्या भावनांवर हल्ला केला जात असल्याची टीका जोर धरू लागली आहे.

याआधीही हृतिक आणि झोमॅटोची जाहिरात अडचणीत…

हृतिक रोशन आणि कतरिना कैफवर चित्रित झालेल्या आणखी एका झोमॅटोच्या जाहिरातीवर टीका झाली होती, मात्र त्यात कुठलाही धार्मिक आशय नव्हता. झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय प्रत्येक ग्राहकाला स्टार कलाकारासारखे वागवतात, अशा आशयाची ती जाहिरात होती. या निरर्थक जाहिरातीसाठी कलाकारांवर एवढा पैसा ओतण्यापेक्षा डिलिव्हरी बॉयना मिळणारे मानधन वाढवा, अशी टीका करण्यात आली होती.

हिंदू धर्मियांचे सण, प्रथा-चालीरितींवर जाहिरातीतून लक्ष्य?

हिंदू धर्मियांचे सण वा प्रथा-चालीरितींवर जाणीवपूर्वक हल्ला केला जातो आहे, असा आरोप करत गेल्या एक-दोन वर्षांत अनेक जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश पसरवू पाहणाऱ्या जाहिरातीही या बंदीपासून वाचल्या नाहीत.

सर्फ एक्सेलने लहान मुलांना घेऊन खास होळीच्या निमित्ताने जाहिरात केली होती. लहानग्यांच्या निरागस मनांत हा अमूक धर्माचा, तो तमूक धर्माचा अशा कल्पना नसतात. ते एकमेकांमध्ये सहज मिसळून जातात, एकत्र खेळत आनंद लुटतात. अशा वेळी कपड्यांवरचे रंगांचे डागही सुंदर भासतात, असा काहीसा अर्थ असलेल्या या जाहिरातीत होळीच्या रंगांचा मुद्दामहून डाग असा उल्लेख करण्यात आला आहे इथपासून ते लहान मुलांचा वापर करून लव्ह जिहादचा प्रसार जाहिरातीतून केला जातो आहे, अशी टीका करण्यात आली होती.

सीएट टायर्स आणि आमिर खान…

असाच धार्मिक वाद आमिर खानवर चित्रित झालेल्या सीएट टायर्सच्या जाहिरातीवरून झडला. या जाहिरातीत आमिरने दिवाळीत रस्त्यावर फटाके फोडू नका, असा संदेश दिला होता. हिंदूंना दिवाळीत रस्त्यावर फटाके फोडू नका असे सांगणारा आमिर रस्त्यावर नमाज पडणाऱ्यांना सोयीस्करपणे विसरला, अशी टीका त्याच्यावर करण्यात आली.

तनिष्कची ‘एकत्वम’ जाहिरात…

हिंदू-मुसलमान ऐक्याचा संदेश देणारी तनिष्कची एक जाहिरातही अशीच अडचणीत आली. आपल्या हिंदू सुनेचा ओटीभरण सोहळा मुस्लिम कुटुंबियांकडून आयोजित केला जातो, अशी जाहिरात तनिष्कने केली होती. एका मुस्लिम कुटुंबात ओटीभरण सोहळा कसा आयोजित केला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करत हा लव्ह जिहादचाच प्रसार असल्याची टीका या जाहिरातीवर करण्यात आली. अखेर तनिष्कला जाहिरात मागे घ्यावी लागली. तेव्हा तनिष्कसारख्या टाटाच्या इतक्या मोठ्या ब्रॅण्डने या मूठभर ट्रोलर्सना घाबरत जाहिरात मागे घेतल्याबद्दल अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.

हिंदू सणांची जाहिरात आणि…

दिवाळीसाठी खास पारंपरिक कपड्यांच्या कलेक्शनला ‘जश्न ए रिवाज’ हा उर्दू शब्द वापरत जाहिरात केल्याबद्दल फॅब इंडियावर टीका झाली. तर अक्षय तृतियेनिमित्त केलेल्या दागिन्यांच्या जाहिरातीत करीना कपूरने कुंकू लावले नाही म्हणून मलाबार गोल्डवर टीका झाली. अखेर मलाबार गोल्डने करीनाच्या जाहिरातीऐवजी साडी, दागिने, कपाळी कुंकू असा पारंपरिक साज लेऊन तयार झालेल्या अभिनेत्री तमन्ना भाटियावरची जाहिरात प्रसिद्ध केली.

लैंगिकतेच्या वा व्यक्तिवादाच्या नवकल्पनांनाही विरोध?

नव्या पिढीचे नवे विचार मांडू पाहणाऱ्या जाहिरातींवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्टवर चित्रित झालेली मान्यवरच्या ‘मोहे’ या खास कलेक्शनची जाहिरात हे त्याचे उदाहरण. कन्यादान हा हिंदू विवाहपद्धतीतील महत्त्वाचा विधी… या जाहिरातीतून मुलगी म्हणजे ओझे, तिचे लग्न करून तिला सासरी पाठवले म्हणजे आपण मोकळे झालो, ही भावना मनात न ठेवता कन्येचा मान ठेवायला शिकूया… कन्यादान ऐवजी कन्यामान असा विचार या जाहिरातीतून मांडला होता. त्यावर हिंदू धर्माच्या रितीरिवाजांमध्ये नको त्या पद्धतीने ढवळाढवळ केली जात असल्याची टीका करत जाहिरातीवर बंदी आणण्याची मागणी झाली. तर दुसरीकडे विवाहित समलिंगी स्त्री दाम्पत्याने करवा चौथ साजरा केला, अशा आशयाची ‘फेम ब्लीच’ची जाहिरात डाबर कंपनीने केली होती. याही जाहिरातीवर सडकून टीका करण्यात आली. समाजमाध्यमांवर या जाहिरातीचा निषेध करणाऱ्या पोस्ट पसरवल्या गेल्या.

धार्मिक वादाचा रंग अधिक…

गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या जाहिरातींसंदर्भात ज्या तक्रारी अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडियाकडे आल्या त्यात धार्मिक भावना दुखावल्या आहेत म्हणून करण्यात आलेल्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. धार्मिक भावनांबरोबरच कन्यादानसारख्या समतेचा पुरस्कार करणाऱ्या, समलिंगींच्या भावना-त्यांचे अधिकार याबद्दल म्हणणे मांडणाऱ्या जाहिरातींवरही टीका करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे यापुढे जाहिरातींवर लाखो खर्च करताना त्यातील कल्पकता, वैचारिकता बाद होऊन केवळ उत्पादनाचे गुणगान पहायला मिळणार का, अशा प्रकारे जाहिरातींवर बंदी घातली गेली आणि त्याला गुन्हा मानले गेले तर जाहिराती कशा करायच्या, असा प्रश्न कंपन्यांसमोर असल्याचेही एएससीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Story img Loader