संजय जाधव

देशभरात घरांच्या किमतीत वाढ झाल्याने परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट होत आहे. यंदा पहिल्या सहामाहीत एकूण घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण २० टक्क्यांवर घसरले. देशातील निवासी बांधकाम बाजारपेठेत परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्राला करोना संकटाच्या काळात सर्वाधिक फटका बसला होता. त्यानंतर अद्याप परवडणाऱ्या घरांचे क्षेत्र सावरलेले दिसत नाही. मागील दोन वर्षांत व्याजदरवाढीमुळे परवडणाऱ्या घरांच्या कर्जाचे मासिक हप्ते (ईएमआय) सुमारे २० टक्क्यांनी वाढले असून, ग्राहकही खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत. परवडणाऱ्या घरांच्या मागणीसोबत त्यांचा पुरवठाही कमी झाला आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांना घरघर लागली आहे का?

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी

देशभरात नेमकी परिस्थिती कशी?

मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था ‘अनारॉक रिसर्च’ने देशातील गृहनिर्माण क्षेत्राचा जानेवारी ते जून या सहामाहीतील अहवाल नुकताच जाहीर केला. यात देशातील दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या सात महानगरांचा आढावा घेण्यात आला. या अहवालानुसार, पहिल्या सहामाहीत देशात दोन लाख २९ हजार घरांची विक्री झाली. यात परवडणाऱ्या म्हणजेच ४० लाख रुपये किमतीच्या आतील घरांची संख्या ४६ हजार ६५० आहे. पहिल्या सहामाहीत एकूण विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण २० टक्क्यांवर आले. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत हे प्रमाण ३१ टक्के होते. मागील वर्षीच्या पहिल्या सहामाहीत एक लाख ८४ हजार घरांची विक्री झाली आणि त्यात परवडणाऱ्या घरांची संख्या ५७ हजार ६० होती.

पुणे, मुंबईत स्थिती काय?

देशात परवडणाऱ्या घरांची सर्वाधिक विक्री मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये झाली आहे. देशातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मुंबईचा सर्वाधिक ३७ टक्के वाटा आहे. पुण्याचा २१ टक्के आणि दिल्लीचा १९ टक्के वाटा आहे. परवडणाऱ्या घरांची सर्वात कमी विक्री हैदराबादमध्ये झाली असून, एकूण विक्रीतील वाटा केवळ दोन टक्के आहे. परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट होण्यामागे घरांच्या वाढलेल्या किमती कारणीभूत आहेत. देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये एकूण घरांच्या पुरवठय़ात परवडणाऱ्या घरांची संख्या पहिल्या सहामाहीत १८ टक्क्यांवर आली. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ती २३ टक्के होती. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचा पुरवठा कमी झाल्याचे दिसत आहे. त्याच वेळी त्यांची खरेदी करणारे ग्राहकही कमी होत आहेत.

मासिक हप्त्यातील वाढ किती?

मागील दोन वर्षांत व्याजदरात वाढ झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका परवडणारी घरे घेणाऱ्या ग्राहकांना बसला आहे. सुमारे ३० लाख रुपयांचे गृहकर्ज असेल, तर २०२१ मध्ये ६.७ टक्के व्याजदरानुसार मासिक हप्ता २२ हजार ७०० रुपये होता. त्याच कर्जासाठी आता व्याजदर ९.१५ टक्क्यांवर जाऊन मासिक हप्ता २७ हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे. मासिक हप्तय़ात चार हजार ६०० रुपये म्हणजेच २० टक्के वाढ झाली आहे. याचबरोबर आता एकूण कर्जापेक्षा व्याजाची रक्कम जास्त झाली आहे. त्यामुळे २० वर्षांच्या कालावधीसाठी ३० लाखांचे गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीच्या कर्जावरील एकूण व्याज ३५.५ लाख रुपयांवर पोहोचणार आहे.

नेमका परिणाम काय?

करोनानंतर परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात घसरण झाली. त्यानंतर मागील दोन वर्षांत या घरांच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे विकासकांकडून अशा घरांचा पुरवठाही कमी झाला आहे. जमिनीच्या वाढलेल्या भावामुळे परवडणाऱ्या घरांचा पुरवठा कमी झाला आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करणे यामुळे परवडणाऱ्या घरांची बांधणी कमी झाली आहे. मागील वर्षभरापासून घरांच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे परवडणारी घरे घेणारे ग्राहक खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत. याच वेळी जमिनीच्या किमती वाढल्याने विकासक परवडणाऱ्या घरांऐवजी मध्यम अथवा आलिशान घरांच्या प्रकल्पाची उभारणी करण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचा पुरवठा आणि मागणीत घट होण्याची चिन्हे आहेत.

sanjay.jadhav@expressindia. com