दत्ता जाधव
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आजघडीला सर्वाधिक भीषण अन्नटंचाईचा सामना करीत आहेत. पाकिस्तानात सध्या १९४७ पासूनची उच्चांकी महागाई आहे. अफगाणिस्तानमधील अन्नधान्य टंचाईची मोजदादच नाही. इतकी भीषण अन्नटंचाई का निर्माण झाली ?
जगभरातील अन्नटंचाईची स्थिती काय?
जागतिक अन्न कार्यक्रमाच्या अहवालात म्हटले आहे, की पाकिस्तान, मध्य आफ्रिकन देश, इथिओपिया, केनिया, कांगो सीरिया, म्यानमारमध्ये तीव्र अन्नटंचाईचा इशारा देण्यात आला आहे. या देशांमध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे ही अन्नटंचाई जास्त धोकादायक ठरणार आहे. अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) तसेच जागतिक अन्न कार्यक्रम (डब्लूएफपी) यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तीव्र अन्नटंचाईचा अंदाज व्यक्त करताना उभय देशांतील आर्थिक आणि राजकीय संकट बिकट झाल्यास अन्न असुरक्षा आणखी तीव्र होईल, असे म्हटले आहे. हे लवकरच जगातील सर्वाधिक अन्नटंचाई असलेले देश ठरतील, असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे.
पाकिस्तानमधील टंचाईची स्थिती काय ?
पाकिस्तानमध्ये आता आशिया खंडातील सर्वाधिक महागाई आहे. दिवाळखोरीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानाला कर्ज देण्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नकार दिला आहे. एका डॉलरच्या तुलनेत २८३.८८ पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. मे महिन्यात महागाईचा दर १३.७३ टक्के होता, तोच महागाईचा दर आता उच्चांकी ३८ टक्क्यांवर पोचला आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पाकिस्तानमध्ये सामान्यांची अन्न सुरक्षा अडचणीत आली आहे. गव्हाचे पीठ १४० ते १६० पाकिस्तानी रुपये किलो, तांदूळ ३५० रुपये, साखर १२० रुपये, बटाटा ८० रुपये, कांदा ९० रुपये, टोमॅटो १०० रुपये, खाद्यतेल ५०० रुपये, दूध १८० रुपये, पेट्रोल २८० पाकिस्तांनी रुपयांवर गेले आहे.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती काय ?
आर्थिक संकट निर्माण झाले, की पाकिस्तान मदतीसाठी जागतिक बँकेच्या दारात उभे राहतो. पण, या वेळी जागतिक बँकेनेही कर्ज देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी अरबी राष्ट्रांवर अवलंबून असतो. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही अरबी देशाने मदत केलेली नाही. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने तीन अब्ज डॉलर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्याकडूनही अद्याप मदत मिळालेली नाही. परकीय गंगाजळीची कमतरता आणि डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या पाकिस्तानी रुपयामुळे अन्नधान्य आयात करण्याची क्षमता क्षीण झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक अन्नपदार्थ, इंधन आणि खाद्यपदार्थाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील ८५ लाखांहून अधिक लोकसंख्येला सप्टेंबर ते डिसेंबर २०२३ या काळात अत्यंत तीव्र अन्न टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यताही संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे.
अफगाणिस्तानची स्थिती अधिक भयावह?
अफगाणिस्तानमध्ये आजघडीला ७० टक्क्यांहून अधिक लोकांना दिवसातून दोन वेळचे पोटभर जेवण मिळत नाही. आर्थिक आणि राजकीय संकटांमुळे सर्वसामान्य लोकांची धान्य खरेदी करण्याची शक्ती क्षीण झाली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अन्नधान्याची, आर्थिक मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान व्यापारी भागीदार, शेजारी देश आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील अनागोंदी अफगाणिस्तानवरील अन्न संकट अधिक गंभीर करणारे ठरण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानातील अन्नटंचाईची मोजदादच नाही. किती अन्नधान्य उत्पादन झाले, किती आयात झाले, किती अन्नधान्यांची गरज आहे, याबाबतची कोणतीच ठोस माहिती मिळत नाही. त्यामुळे अफगाणिस्तानमधील लोकांचे भविष्य अंधकारमय आहे.
जगाने अन्नटंचाईची चिंता का करावी ?
अस्थिरतेमुळे पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. सध्याच्या राजकीय, आर्थिक अनागोंदीच्या परिस्थितीमुळे गव्हाच्या पिठासारख्या मूलभूत गरजांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गव्हाच्या पिठाच्या टंचाईमुळे मार्च-एप्रिलमध्ये पाकिस्तान सरकारने देशभरात मोफत पीठ वितरण केंद्र निर्माण केले होते. या केंद्रांवर चेंगराचेंगरी झाली. अनेक लोक ठार झाले, जखमी झाले. पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात अन्नटंचाई अधिक असल्यामुळे राजकीय अशांतता आणि अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानचा वायव्य सरहद्द प्रांत नेहमीच अशांत राहिला आहे. या भागावर पाकिस्तानचे पूर्ण नियंत्रण नाही. स्थानिक वांशिक टोळय़ांचे येथे वर्चस्व आहे. अफगाणिस्तानची अवस्था तर आणखी बिकट आहे. शासन व्यवस्था नाही. तालिबानी सरकारला राजकीय मान्यता नाही. अशा अवस्थेत या ठिकाणी मूलतत्त्ववादी, दहशतवादी कारवाया वाढण्याची, अमली पदार्थाची शेती आणि व्यापार वाढण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम दक्षिण आशिया, मध्य आशियावर होणार आहे.dattatray.jadhav@expressindia.com