इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-३ ला मोठे यश प्राप्त झाले. २३ ऑगस्टच्या सायंकाळी इस्रोच्या थेट प्रक्षेपणाकडे अनेकांचे डोळे लागले होते. चांद्रयान-२ च्या अंशतः अपयशानंतर या मोहिमेत यश मिळण्यासाठी वैज्ञानिकांनी आटोकाट प्रयत्न केले होते. विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी अवतरण झाल्यानंतर वैज्ञानिकांच्या मेहनतीचे चीज झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रावर उतरल्यानंतर चार तासांनी विक्रम लँडरमधून एक रॅम्प उघडला गेला, ज्यातून सहा चाकांचे आणि २६ किलो वजन असलेले प्रग्यान रोव्हर बाहेर पडले. प्रग्यान रोव्हर हळूहळू पुढे सरकून ५०० मीटर अंतरापर्यंत प्रवास करून चंद्रावरील पृष्ठभागाचे परीक्षण करणार आहे. विक्रम लँडरवर चार आणि प्रग्यान रोव्हरवर दोन असे एकूण सहा पेलोड्स (उपकरणे) लावलेले आहेत, ज्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरील अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सर्व संशोधन एक चांद्रदिवस म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवस चालणार आहे.

हे वाचा >> चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करण्यासाठी झटलेले रिअल ‘हिरो’

चांद्रयान-३ वरील पेलोड्सच्या वैज्ञानिक संशोधनाचे दोन भाग आहेत. एक म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर होणारे भूकंप, खनिज रचना आणि इलेक्ट्रॉन व अणू-रेणूंचा अभ्यास करणे. तसेच चांद्रयान-१ मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाच्या स्वरुपातील पाणी आढळून आले होते, त्याचाही अभ्यास या मोहिमेत करण्यात येणार आहे.

विक्रम लँडरवरील चार पेलोड्सद्वारे होणारे प्रयोग

  • विक्रम लँडर मॉड्यूलमध्ये पेलोड्सपैकी एकाचे नाव “रेडिओ ॲनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड ॲटमॉस्फिअर” (RAMBHA) असे आहे. हे पेलोड्स चंद्राच्या पृष्ठभागावरील इलेक्ट्रॉन्स आणि आयोन्स (अणू-रेणू) यांच्यामध्ये काळानुरूप काय बदल झाले याचा अभ्यास करून माहिती गोळा करणार आहे.
  • चास्टे (ChaSTE) म्हणजेच “चंद्रास सरफेस थर्मो फिजिकल एक्परिमेंट” या पेलोड्सद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरील थर्मल प्रॉपर्टीजचा (तापमानाचा) अभ्यास केला जाणार आहे.
  • इल्सा (ILSA) म्हणजे “द इन्स्ट्रूमेंट फॉर लूनार सिस्मिक ॲक्टिव्हिटी” हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास करणार आहे. या माध्यमातून चंद्राच्या कवच आणि आवरणाच्या रचनेचा अभ्यास केला जाणार आहे. भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती करायची झाल्यास तेथील पृष्ठभागावरील क्रियाकलपांची इत्थंभूत माहिती गोळा करण्याचे काम या उपकरणाद्वारे होईल.
  • लेझर रेट्रोरिफ्लेक्टर (LRA) या पेलोड्सद्वारे चंद्राच्या गतिशीलतेचा अभ्यास केला जाईल. हे उपकरण नासाकडून इस्रोला देण्यात आले आहे. भविष्यात चंद्रावर हाती घेण्यात येणाऱ्या मोहिमांसाठी अचूक मोजमाप करण्यासाठी हे उपकरण महत्त्वाचे संशोधन करणार आहे.

प्रग्यान रोव्हरवरील दोन पेलोड्स वैज्ञानिक प्रयोग करतील

  • लिब्स (LIBS) अर्थात “लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप” हे पेलोड चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक आणि खनिज रचनेचा अभ्यास करेल.
  • द अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) हे पेलोड चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या माती आणि खडकातील मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टीटानियम (कथील) आणि लोह या खनिजांच्या रचनेचा अभ्यास करेल.

पाण्याचा शोध

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बरेच भाग पूर्णपणे अंधारात असून तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. उत्तर ध्रुवाच्या तुलनेत दक्षिण ध्रुव गडद काळोखात आहे. त्यामुळे या ठिकाणी बर्फाच्या स्वरूपात पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यता आहे.

हे वाचा >> चांद्रयान ३ चे प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरलं, आता ‘अशोक स्तंभाचा’ ठसा कसा उमटवणार? Video पाहा

चांद्रयान-१ (२२ ऑक्टोबर २००८) वरील उपकरणांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील वातावरणात पाणी आणि हायड्रॉक्सिल (OH) यांचे कण अस्तित्त्वात असल्याचा महत्त्वाचा शोध लावला होता. या शोधावर आता पुढे आणखी संशोधन करण्याचे काम चांद्रयान-३ मोहिमेद्वारे केला जाईल. भारताच्या मून इम्पॅक्ट प्रोब (MIP) या पेलोडला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर उतरविण्यात आले होते. चंद्राच्या वातावरणात असलेले पाणी आणि हायड्रॉक्सिल कणांचा प्रयोग याद्वारे केला गेला होता.

चांद्रयान-१ वरील दुसऱ्या मिनी-सार (mini-SAR) या पेलोडद्वारे कायम काळोखात असलेल्या दक्षिण ध्रुवानजीकच्या विवरांमधील पाण्याच्या बर्फाशी सुसंगत नमुने शोधले गेले; तर तिसरे पेलोड नासाकडून देण्यात आले होते. याचे नाव मून मायनरलॉजी मॅपर अर्थात एम३ (M3) असे होते. चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या उपस्थितीची खात्री करण्याचे काम या पेलोडद्वारे करण्यात आले.

चांद्रयान-२ मोहीम २२ जुलै २०१९ रोजी राबविण्यात आली होती. चांद्रयान-१ च्या माध्यमातून जे पुरावे समोर आले होते, त्यावर अधिक अभ्यास विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरद्वारे केला जाणार होता. मात्र, दुर्दैवाने त्याचे सेफ लँडिंग होऊ शकले नाही.

चंद्राच्या पृष्ठभागाखाली असलेली लाव्हा ट्यूब

चांद्रयान-१ वर असलेल्या कॅमेरा आणि हायपरस्पेक्ट्रल इमेजरने चंद्राच्या पृष्ठभागाखालील लाव्हा ट्यूब शोधून काढली होती. वैज्ञानिकांच्या मते भविष्यात जर चंद्रावर मानवी वसाहत करायची झाल्यास, ही लाव्हा ट्यूब सुरक्षित वातावरण प्रदान करू शकते. चंद्राच्या पृष्ठभागावरील धोकादायक किरणोत्सर्ग, लहान उल्कांचा प्रभाव, टोकाचे तापमान आणि धुळीच्या वादळांपासून सरंक्षण करण्यासाठी याची मदत होऊ शकते, असे वैज्ञानिकांचे अनुमान आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After chandrayaan 3 landing the experiments lunar quakes and water ice on moon know all fact kvg