मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू पाच दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. भारताबरोबरच्या संबंधांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी मोहम्मद मुइज्जू भारतात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुइज्जू ६ ते १० ऑक्टोबर या पाच दिवसांच्या भेटीसाठी नवी दिल्ली येथे पोहोचले. विमानतळावर त्यांचे राज्यमंत्री (परराष्ट्र व्यवहार) कीर्ती वर्धन सिंग यांनी स्वागत केले. गेल्या नोव्हेंबरमध्ये मालदीवमधील ‘इंडिया आउट’ मोहिमेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांना तडा गेल्याने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुइज्जू भारत दौर्‍यावर नक्की कोणत्या कारणासाठी आले आहेत? या दौर्‍यामागचा त्यांचा उद्देश काय? त्याविषयी जाणून घेऊ.

मुइज्जू भारतात कोणाकोणाची भेट घेणार?

चार महिन्यांपूर्वी मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुइज्जू भारतात आले होते. मात्र, त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय राज्य दौरा आहे. रविवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. फर्स्ट लेडी साजिधा मोहम्मद यांच्यासमवेत भारतात आलेल्या मुइज्जू यांचे सोमवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मालदीवच्या अध्यक्षांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. व्यावसायिक कार्यक्रमांसाठी ते मुंबई, बंगळुरूलाही जाणार आहेत.

चार महिन्यांपूर्वी मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुइज्जू भारतात आले होते. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : विश्लेषण: तुरुंगातील जातीभेदाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो? महाराष्ट्र अपवाद का?

भारत भेटीमागील मुइज्जू यांचा उद्देश काय?

भारत भेटीपूर्वी मुइज्जू म्हणाले की, मालदीवचा आर्थिक भार कमी करणे, हे त्यांचे मुख्य लक्ष्य आहे. “भारताला आमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे आणि आमचा सर्वांत मोठा विकास भागीदार म्हणून, आमचा भार कमी करण्यासाठी, आमच्यासमोर असलेल्या आव्हानांवर चांगले पर्याय आणि उपाय शोधण्यासाठी ते नेहमीच तयार असतील,” असे मुइज्जू यांनी ‘बीबीसी’ला एका लेखी मुलाखतीत सांगितले. मालदीवच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान चलन अदलाबदल आणि कर्जाची विनंती केली, असे सांगण्यात येत आहे. भारताने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी मालदीवला १.४ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत देऊ केली आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, मालदीवच्या परकीय चलनाचा साठा ४४० दशलक्ष डॉलर्सपर्यंत घसरल्याने हा देश कर्जात बुडेल, असे चित्र आहे.

मोदी आणि मुइज्जू यांनी परस्परहिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा केली असण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, मालदीव हा भारताचा हिंद महासागर प्रदेशातील (आयओआर) प्रमुख शेजारी आहे आणि पंतप्रधानांच्या ‘सागर’ (सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन) आणि भारताच्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीचा भाग आहे. मुइज्जू यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यातील चर्चा द्विपक्षीय सहकार्य मजबूत करणे आणि दोन राष्ट्रांमधील दीर्घकालीन संबंध वाढविणे यांवर लक्ष केंद्रित करील. तसेच, राष्ट्राध्यक्ष मालदीवच्या विकासात आणि वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रांशी द्विपक्षीय संबंध वाढविणे, राष्ट्रासाठी गतिशील आणि सक्रिय परराष्ट्र धोरण सुनिश्चित करणे यांसाठी वचनबद्ध आहेत, असेही त्यात म्हटले आहे. मुइज्जू यांची भेट ही भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुधारण्याची चिन्हे आहेत.

भारत-मालदीव संबंध का बिघडले?

मुइज्जू यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांना तडा गेला. लवकरच त्यांनी भारताला आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले. मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना काढून टाकण्याचा त्यांचा मानस होता. या सैन्याची उपस्थिती मुइज्जूच्या नेतृत्वाखालील मालदीव सरकार आणि भारत यांच्यातील वादाचे एक मोठे कारण ठरले. भारताने १० मेच्या अंतिम मुदतीपूर्वी बेटमय या देशातून आपल्या ८० हून अधिक लष्करी कर्मचार्‍यांना परत येण्यास सांगितले. मालदीवला भेट दिलेली दोन हेलिकॉप्टर्स आणि डॉर्नियर विमाने भारतीय सैन्याद्वारे चालवली जायची आणि त्यांची देखभाल केली जायची. भारतीय सैन्याच्या मुद्द्याव्यतिरिक्त लक्षद्वीप बेटांच्या प्रचाराला उत्तर देताना मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे मालदीवशी असलेल्या भारताच्या संबंधांना आणखी तडा गेला. या संदर्भात मुइज्जू सरकारने दोन कनिष्ठ मंत्र्यांना निलंबित करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

युवा सशक्तीकरण, माहिती आणि कला मंत्रालयातील मलशा शरीफ व मरियम शिउना यांच्या टिप्पण्या आणि सहकारी मंत्री अब्दुल्ला महझूम मजिद यांच्या वक्तव्यांनी भारतात मोठा गोंधळ निर्माण केला. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ‘मालदीववर बहिष्कार घाला’, अशी मोहीम सुरू केली. काही भारतीय सेलिब्रिटींनीही स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. या घटनांमुळे दोन्ही देशांमध्ये राजनैतिक वाद निर्माण झाले आहेत. वादाच्या या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मालदीवसाठी भारत हा पर्यटनाचा सर्वांत मोठा स्रोत आहे, ज्याची अर्थव्यवस्था या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

दोन राष्ट्रांमधील संबंध कसे सुधारत आहेत?

अलीकडच्या काही महिन्यांत भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुधारत आहेत. मुइज्जू यांना चीनसमर्थक नेता म्हणूनही पाहिले जाते. त्यांनी त्यांच्या राज्य भेटीपूर्वी भारतविरोधी वक्तव्ये कमी केली आहेत. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या प्रिन्सटन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या संवादादरम्यान मालदीवचे अध्यक्ष म्हणाले की, मालदीव कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. “आम्ही कधीही कोणत्याही एका देशाच्या विरोधात नाही. हे ‘इंडिया आऊट’ नाही. मालदीवला त्यांच्या भूमीवर परकीय लष्करी उपस्थितीमुळे गंभीर समस्येचा सामना करावा लागला. मालदीवच्या जनतेला देशात एकही परदेशी सैनिक नको आहे,” असे त्यांनी सांगितले. मुइज्जू म्हणाले की, त्यांच्या सरकारने पंतप्रधान मोदींचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई केली. “असे कोणी बोलू नये. त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. कोणाचाही अपमान मी स्वीकारणार नाही; मग तो नेता असो वा सामान्य. प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा असते,” असेही ते म्हणाले. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

मोदींविरोधात निंदनीय टिप्पणी करणार्‍या शरीफ आणि शिउना या दोन कनिष्ठ मंत्र्यांनीही राजीनामा दिला. सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘एचटी’ला सांगितले की, मुइज्जू यांच्या भारत दौऱ्याला राज्य भेटीचा दर्जा देण्यात आला आहे; ज्यामुळे द्विपक्षीय संबंध पुन्हा स्थापित करण्याचा विचार भारत करीत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, “ही भेट मालदीवबरोबरच्या संबंधांना भारत देत असलेल्या महत्त्वाची साक्ष आहे आणि दोन्ही देशांमधील सहकार्य व मजबूत संबंधांना आणखी गती देईल.” ऑगस्टमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मालदीवला भेट दिली आणि त्यांच्या समकक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचीही भेट घेतली होती. त्यांच्याआधी मालदीवचे परराष्ट्रमंत्री मुसा जमीर हे मे महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते.

हेही वाचा : पर्यावरण बदलामुळे पर्यटकांमध्ये वाढतंय ‘लास्ट चान्स टुरिझम’; कारण काय? काय आहे हा ट्रेंड?

“मालदीव हा आमच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाचा एक भाग आहे. भारतासाठी शेजारी प्राधान्य स्थानी आहेत आणि शेजारचा मालदीवही आमच्यासाठी प्राधान्य स्थानी आहे. आम्ही इतिहास आणि नातेसंबंधातील सर्वांत जवळचे बंधदेखील सामायिक करतो,” असे जयशंकर मालदीव भेटीदरम्यान म्हणाले होते. दोन्ही देश ४०० दशलक्ष डॉलर्सच्या चलन अदलाबदल करारावरही आवश्यक पावले उचलत आहेत. मुइज्जू यांच्या भारत भेटीमुळे मालदीवमधील पर्यटनाला चालना मिळू शकते. मालदीव आता आपल्या ‘वेलकम इंडिया’ मोहिमेद्वारे भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे.