Twitter Circle Explained: अनेकदा असं होतं की आपल्याला काही मतं किंवा विचारही आपल्या जवळच्या व्यक्तींसह शेअर करायचे असतात. अलीकडे प्रत्येक संवादात सोशल मीडिया हे मूळ माध्यम असल्याने असं धरून चालू की तुम्हाला याच सोशल मीडियाच्या ऑनलाईन मंचावर आपलं मत आपल्या खास व्यक्तींसह शेअर करायचंय. पण अशा वेळी आपल्या फॉलोवर्स मधील किंवा मित्रांच्या यादीतील इतरांचं काय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वापरकर्त्यांची गरज लक्षात घेता फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाटसऍपसहित सर्वच सोशल मीडिया साईट्सवर क्लोज फ्रेंड्स अशी संकल्पना तयार करण्यात आली आहे. या तरतुदीचे नाव प्रत्येक ठिकाणी वेगळे असले तरी त्याचा मूळ हेतू हा आपल्याला काही निवडक व्यक्तींसह संवाद साधण्याची मुभा देणे हा आहे. अनेकांना ठाऊक नसेल पण मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरमध्येही ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. ३० ऑगस्ट २०२२ ला याबाबत ट्विटरने अधिकृत घोषणा केली आहे. तुम्हालाही ही तरतूद नेमकी कशी वापरता येईल याविषयी जाणून घेऊयात…

ट्विटर सर्कल कसे काम करते?

ट्विटरच्या या नवीन सुविधेचे नाव ट्विटर सर्कल असे आहे. या सर्कलच्या माध्यमातून वापरकर्त्यांना काही निवडक फॉलोवर्ससह आपले ट्वीट शेअर करण्याची मुभा दिली जाते. प्रत्येक ट्वीट करताना ते कोण पाहू शकतं याची निवड आपण करू शकता. ट्विटर सर्कल ही सुविधा आयओएस, अँड्रॉइड व Twitter.com वर प्रत्येक वापरकर्त्यासाठी उपलब्ध आहे.

ट्विटर सर्कल कसे वापरावे?

तुम्ही ट्विटर वर पोस्ट करण्यापूर्वी, तुम्हाला तुमचे ट्वीट सर्व फॉलोवर्ससह किंवा काही निवडक व्यक्तींसह शेअर करण्याचा पर्याय निवडता येतो. तुम्ही ट्विटर सर्कल मध्ये १५० जणांना समाविष्ट करू शकता. तुम्हाला इच्छेनुसार या सर्कलमधून कोणालाही समाविष्ट करण्याची किंवा वगळण्याची मुभा देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ट्विटर तुमच्या ट्विटर सर्कलमध्ये झालेल्या बदलांबद्दल कोणालाही माहिती देत नाही. जर तुम्ही एखाद्या फॉलोवरला सुरुवातीला या सर्कलमध्ये समाविष्ट केले असेल आणि नंतर काढून टाकले असेल तरीही याबाबत अधिसूचना प्राप्त होणार नाही.

इंस्टाग्रामप्रमाणेच तुम्ही तुमच्या निवडक व्यक्तींसह शेअर केलेले ट्विट हिरव्या बॉर्डरसह दिसतील. यामुळे तुमच्या सर्कलमध्ये असणाऱ्या व्यक्तींना याविषयी माहिती कळते. तुम्ही निवडलेले फॉलोवर्सचं तुमचं ट्वीट रिट्विट किंवा शेअर करू शकतात. याव्यतिरिक्त, तुमचे ट्विटर खाते सार्वजनिक असले तरीही, या ट्विट्सची सर्व प्रत्युत्तरे खाजगी असतील. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला फक्त एक ट्विटर सर्कल ठेवण्याची परवानगी आहे.

इतर ऍप्सवर कशी आहे सोय?

इंस्टाग्रामवर निवडक व्यक्तींसह आपले फोटो व्हिडीओ शेअर करण्याची मुभा आहे. क्लोज फ्रेंड्स म्हणजेच जवळच्या मित्रांची यादी आपण तयार करू शकता. ट्विटरप्रमाणेच तुम्ही ज्या व्यक्तींना क्लोज फ्रेंड्सच्या यादीत समाविष्ट करता तेव्हा त्यांच्या प्रोफाईलच्या कडांना हिरव्या रंगाची किनार दिसून येते. आपण ही सुविधा केवळ स्टोरीज शेअर करताना वापरू शकता. जर तुम्हाला रील्स किंवा फोटो शेअर करताना निवडक व्यक्तींनीच ते पाहावे असं वाटत असेल तर आपल्याला पोस्ट करण्यापूर्वी ‘ओन्ली शेअर विथ’ म्हणजेच ‘यांसह शेअर करा’ असा पर्याय निवडता येतो.

व्हाटसऍप वापरकर्त्यांना सुद्धा ही सुविधा वापरता येते. सेटिंग्समध्ये जाऊन आपल्याला प्रायव्हसी पर्याय निवडायचा आहे. त्यात तुम्हाला प्रोफाइल फोटो, स्टेटस व लास्ट सीन असे तीन पर्याय दिसतील. यापैकी हवा तो पर्याय निवडून तुम्ही त्यात सर्वांना दाखवा, काही व्यक्तींना निवडा व कोणालाच दाखवू नका असे पर्याय दिले जातात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After instagram twitter circle allows people to select close friends list how to use it on android and ios svs