शनिवार मध्यरात्री अचानक मोठ्या सायरनच्या आवाजाने इस्रायली लोक जागे झाले. हा आवाज म्हणजे इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यापासून सुरक्षितपणे लपण्याचा इशारा होता. या सायरनचा आवाज इस्रायली लोकांसाठी नवीन नाही, पण यावेळी हा हल्ला नक्कीच अभूतपूर्व होता. इराणने इस्रायलच्या दिशेने ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती, ज्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ३० क्रूझ क्षेपणास्त्रे आणि किलर ड्रोन यांचा समावेश होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर इस्रायलचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. इस्रायली हवाई संरक्षणाने ‘एरो एरियल डिफेन्स सिस्टीम’च्या मदतीने इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इस्त्रायलच्या हद्दीत पोहोचण्यापूर्वीच नष्ट केली, असंही इस्रायली लष्कराने सांगितले.
हेही वाचाः इराणसह दहशतवादी गटांचा मिळून इस्रायलवर हल्ला; काय आहे ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स?
आतापर्यंत काय झाले?
इराणने इस्रायलवर क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हवाई हल्ले केले. ज्या हल्ल्यांची संख्या ३०० पेक्षा जास्त असल्याची सांगितली जात आहे. या घटनेमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे, असे इस्रायल संरक्षण दल (आयडीएफ) ने सांगितले. २ एप्रिल रोजी सीरियातील दमास्कस येथील त्याच्या राजनैतिक परिसरावर इस्रायलने हवाई हल्ले केले होते, त्यालाच इराणने प्रत्युत्तर दिले आहे. सीरियातील इराणच्या दूतावासावरील हल्ल्यात वरिष्ठ लष्करी जनरलसह १३ लोक मारले गेले होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खेमेनी यांनी याचा बदला घेण्याची शपथ घेतली होती.
हेही वाचाः iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याने कोणत्या प्रकारचे नुकसान झाले?
संकटाच्या पहिल्या काही तासांमध्ये कोणतेही लक्षणीय नुकसान झाले नाही. इस्त्रायली हवाई संरक्षण, अमेरिका, ब्रिटिश आणि जॉर्डन सैन्याने मिळून जॉर्डन, इराक आणि सीरियावरील बहुसंख्य क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इस्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वीच रोखली, असेही इस्त्रायल संरक्षण दल (आयडीएफ) ने सांगितले. इराण आणि इस्रायल यांच्यात भौगोलिक अंतर खूप आहे, जे क्षेपणास्त्राला पार करण्यासाठी वेगानुसार १५ मिनिटे ते सुमारे २ तासांपर्यंत वेळ लागू शकतो.
शनिवारी (१३ एप्रिल) मध्यरात्री सुरू झालेले हल्ले इराण सोडून इराक, सीरिया आणि येमेनमधून सुरू करण्यात आले, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सांगितले. इराण या प्रदेशातील अनेक संघर्षग्रस्त देशांमध्ये लष्करी उपस्थिती राखतो आणि या देशांतील गटांना इराणच्या सैन्याचा पाठिंबा आहे. तसेच इराणचं त्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे पुरवतो.
इराणचा हल्ला महत्त्वाचा का आहे?
खरं तर इराण आणि इस्रायलमधील कटू संघर्ष हा काही नवा नाही. त्या दोन्ही देशांमध्ये एकमेकांविरुद्ध गुप्त लष्करी कारवाया करण्याचा मोठा इतिहास असला तरी इराणने इस्रायलमधील लष्करी तळांवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्यांनंतर इराणने म्हटले आहे की, दमास्कसमधील इराणच्या दूतावासावरील इस्रायली हल्ल्याचा मुद्दा संपला, आता असे मानले जाऊ शकते. आता त्यावर इस्रायलची प्रतिक्रिया पाहणे आवश्यक आहे.
अमेरिकेनं नेमकं काय म्हटले आहे?
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसेच इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिकेची बांधिलकी कायम असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले. इराणच्या हल्ल्याला एकत्रित राजनैतिक प्रतिसाद देण्यासाठी ते आता जी ७ ची बैठक बोलावणार आहेत. या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील समस्या वाढण्याची भीती जो बायडेना यांना वाटतेय. कारण अमेरिकेत पुन्हा निवडणुकीचे वेध लागले आहेत. गाझामधील युद्ध सुरू असताना अमेरिकेने तिथली आपली उपस्थिती कमी केली आहे.