Lok Sabha Election Results 2024 Live देशात कोणाची सत्ता येणार, हे चित्र स्पष्ट होण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर भाजपा काहीसा मागे पडल्याचे चित्र समोर आले. इंडिया आघाडीने अनेक प्रमुख जागांवर भाजपाचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे ज्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भाजपाचे प्रबळ वर्चस्व होते त्याच उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपा पिछाडीवर गेली आहे. थोड्याच वेळात निकलाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याच विषयी थोडक्यात जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढे काय?

निकाल जाहीर झाल्यानंतर आणि निवडणूक आयोगाकडून नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रपती सर्वात जास्त जागा जिंकलेल्या पक्षाला बहुसंख्य खासदारांचा पाठिंबा सिद्ध करण्यासाठी बोलवतील. त्याआधी, प्रत्येक विजयी उमेदवाराला मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून निवडणुकीचे प्रमाणपत्र दिले जाईल.

हेही वाचा : Lok Sabha Election Results Live Updates : ब्रिजभूषण सिंह यांचे चिरंजीव करण भूषण सिंहांचा दीड लाखांच्या मताधिक्याने विजय

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रमाणपत्र मिळाल्याच्या पावतीवर उमेदवाराला स्वाक्षरी करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर ती पावती ताबडतोब नोंदणीकृत पोस्टाने लोकसभेच्या महासचिवांकडे पाठवली जाईल. या प्रमाणपत्रांना फॉर्म २२ म्हणून ओळखले जाते. निवडून आलेले उमेदवार लोकसभेत सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी जातात, तेव्हा त्यांची ओळख पडताळण्यासाठी हे प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना दाखवणे आवश्यक असते. त्यानंतर निवडणूक आयोग निवडून आलेल्या खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे सुपूर्द करेल आणि पुढील प्रक्रिया सुरू होईल.

हेही वाचा : सत्ताधारी ‘आप’ला पंजाबमध्ये फटका; भाजपा शून्य तर काँग्रेसला ‘इतक्या’ जागांवर आघाडी

२०१९ मध्ये निवडणूक आयोगाने निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी २५ मे रोजी राष्ट्रपतींना यादी सुपूर्द केली होती. त्याच दिवशी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एनडीएला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आणि ३० मे रोजी शपथविधी पार पडला. २००४ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. सरकार स्थापनेसाठी यूपीएला आमंत्रित केले गेले. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २७२ चा आकडा पार करण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, २७२ जागा मिळवण्यात भाजपाला अपयश आले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After loksabha election result what next rac
Show comments