महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत थेट शिंदे गट-भाजपा सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी पक्षात उघड-उघड दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी पक्षफुटीचे परिणाम राष्ट्रीय राजकरणावरही होत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी देशातील सर्व पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे या प्रयत्नांचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच बिहारमध्येही महाराष्ट्रासारखीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये काय राजकीय घडामोडी घडत आहेत? नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षात बंडखोरी होणार का? हे जाणून घेऊ या…

महायुतीतील घटकपक्षांत खदखद?

महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षामध्ये बंडखोरी झाल्यामुळे बिहारामध्येही अशाच प्रकारे राजकीय नाट्य रंगणार आहे, असा दावा केला जात आहे. भाजपाचे पुढचे टार्गेट बिहारचे मुख्यमंत्री तथा संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार हे आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यापासून बिहारमध्ये राजकीय अस्थिरतेच्या काही घटनादेखील घडल्या आहेत. बिहारमधील महायुतीचे घटकपक्ष असलेल्या जेडीयू, आरजेडी, काँग्रेस तसेच अन्य पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे नितीश कुमार यांनी त्यांच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे.

yogi Adityanath told mahavikas aghadi problem
काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Chembur Marwari Chawl, citizens vote vidhan sabha boycott, vote boycott, rehabilitation,
मुंबई : दीड हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
review of the development works was presented in the campaign of the candidate in Byculla Mumbai news
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.

बिहारच्या महायुतीमध्ये काय घडतंय?

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांमध्ये सध्या अस्थितरता निर्माण झाल्याचा दावा केला. नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षात बंडखोरी होण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली. “बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये जदयू पक्षाचे आमदार नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी आरजेडी पक्षासोबत युती केल्यामुळे आमदारांमध्ये नाराजी आहे. उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. ते विरोधकांच्या पटणा येथील बैठकीला अनुपस्थित होते,” अशी शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

जेडीयू पक्षात धुसफूस?

जेडीयू पक्षात कोणत्याही क्षणी बंडाळी होऊ शकते, असा दावाही आठवले यांनी केला आहे. जेडीयू पक्षातील नेत्यांना आरजेडी पक्षासोबत केलेली युती आवडलेली नाही. नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणून आरजेडी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांच्याकडे पाहिले जात आहे. यालाच जेडीयू पक्षाच्या नेत्यांचा विरोध आहे. तसेच विरोधी पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे देण्यासही जेडीयू पक्षाच्या नेत्यांचा विरोध आहे, असा दावा आठवले यांनी केला आहे.

दुसरीकडे लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी जेडीयू पक्षाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात बिहारमध्ये काय घडणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बिहारच्या राजकाणात खरंच भूकंप होणार?

मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. याच राजकीय अस्थिरतेचा भाजपा फायदा घेण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीतील आमदारांशी भाजपाचे नेते संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे नितीश कुमार यांनी जेडीयू पक्षातील प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. दुसरीकडे नितीश कुमार यांनी राष्ट्रीय स्तरावर राजकारण करावे, तर राज्याचे नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवावे अशी मागणी आरजेडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. हीच मागणी घेऊन नितीश कुमार यांच्यावर आरजेडी पक्षाकडून दबाव टाकला जात असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे बिहारमधील महायुतीमध्ये फूट पडते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अमित शाहांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करणे टाळले

मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसफूस असल्याचे म्हटले जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच २९ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाह बिहारच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी संपूर्ण दौऱ्यादरम्यान नितीश कुमार यांच्यावर टीका करणे टाळले. तसेच नितीश कुमार यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे बंद असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. अमित शाहांच्या या भूमिकेमुळे बिहारच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अरलेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुशीलकुमार मोदी यांनीदेखील राजभवनात जाऊन अरलेकर यांची भेट घेतली होती. नितीश कुमार आणि सुशीलकुमार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र ही भेट फक्त एक योगायोग आहे, असे अरलेकर यांनी सांगितले होते.

“अमित शाह यांनी नाक घासले तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही”

दरम्यान बिहारमध्ये कोणत्याही क्षणी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना सुशीलकुमार मोदी यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही नितीश कुमार यांना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही, असे अमित शाह यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी आमच्यासमोर नाक घासले तरी आम्ही त्यांना स्वीकारणार नाही. भाजपा त्यांचे सामान घेऊन चालणार नाही, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार मोदी यांनी दिली होती.

बिहारमध्ये पक्षीय बलाबल काय आहे?

बिहारमध्ये सत्तापालट घडवायचे असेल तर भाजपाला अगोदर संख्याबळ लक्षात घ्यावे लागले. सध्या येथे भाजपाचे ७४ आमदार आहेत. बहुमतासाठी १२२ आमदारांची गरज आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर भाजपाला आणखी ४८ आमदारांची गरज आहे. सध्या महायुतीमध्ये आरजेडी, जदयू, काँग्रेस, डावे पक्ष यांचा समावेश आहे. या सर्व पक्षांचे संख्याबळ १६० एवढे आहे. मागील महिन्यात माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा यांच्या पक्षाने नितीश कुमार यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे.

महायुतीतील घटकपक्ष काय प्रतिक्रिया देत आहेत?

महायुतीमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला जात असताना जदयू पक्षाचे प्रवक्ते राजीब रंजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल आहे. कसलीही अस्वस्थता नाही, असे त्यांनी सांगितले. आरजेडी पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. “नरेंद्र मोदी हे आरक्षणविरोधी आहेत. महाराष्ट्रप्रमाणेच बिहारमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा यात यशस्वी होणार नाही. बिहारमध्ये सर्वजण एकजुटीने उभे आहेत. मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत,” अशी प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात बिहारमध्ये नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.