अमेरिकेत मेंदूच्या विकासाविषयीचा एक अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासात मुलींच्या मेंदूची चाचणी करण्यात आली. त्यात असे आढळून आले की, करोना काळात लॉकडाउननंतर मुलींचे मेंदू अपेक्षेपेक्षा खूप वेगाने वाढत आहेत. संशोधकांनी या बदलासाठी करोना काळातील विलगीकरणाला जबाबदार धरले. हा अभ्यास करोना काळात आणि त्याआधी केलेल्या मुलींच्या चाचणीवर आधारित आहे. या अभ्यासातून नक्की काय माहिती समोर आली? मुलींच्या मेंदूमध्ये झालेल्या या बदलांचा काय परिणाम होणार? याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात सोमवारी प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये कॉर्टिकल थिनिंगची चाचणी प्रकाशित करण्यात आली. ही एक अशी प्रक्रिया आहे, जी बालपणाच्या उत्तरार्धात किंवा पौगंडावस्थेत सुरू होते. या प्रक्रियेत मेंदू निरर्थक सायनॅप्सची (दोन मज्जातंतू पेशींमधील एक लहान जागा) छाटणी करतो आणि त्याचा बाह्य स्तर संकुचित करतो. कॉर्टेक्स थिन म्हणजेच पातळ होणे वाईट आहे, असे नाही. कारण- शास्त्रज्ञ ही प्रक्रिया मेंदू परिपक्व करणारी आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवणारी आहे, असे सांगतात. परंतु, तणावपूर्ण परिस्थितीत ही प्रक्रिया अधिक गतिमान होते आणि कॉर्टिकल थिनिंगच्या प्रक्रियेची गती नैराश्य आणि चिंतेमुळे वाढते.

करोना काळात लॉकडाउननंतर मुलींचे मेंदू अपेक्षेपेक्षा खूप वेगाने वाढत आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?

अभ्यासातील निष्कर्ष काय आहेत?

संचारबंदी उठू लागल्यानंतर २०२१ मध्ये घेतलेल्या चाचण्यांमध्ये असे आढळून आले होते की, त्या काळात मुले आणि मुली दोघांच्याही मेंदूंची जलद गतीने वाढ होत आहे आणि कॉर्टिकल पातळ होत आहे. परंतु, मुलींमध्ये याचे लक्षणीय प्रमाण दिसून आले. मुलींमध्ये कॉर्टिकल पातळ होण्याचे प्रमाण सरासरी ४.२ वर्षांनी अधिक वेगाने वाढल्याचे दिसून आले आणि मुलांमध्ये कॉर्टिकल पातळ होण्याचे प्रमाण सरासरी १.४ वर्षे अधिक वेगाने वाढत असल्याचे लक्षात आले. अभ्यासाच्या सह-लेखिका पॅट्रिशिया के. कुहलच्या म्हणण्यानुसार, हा निष्कर्ष सूचित करतो, “प्रयोगशाळेत आलेल्या १४ वर्षीय मुलीचा मेंदू आता १८ वर्षांच्या मुलीसारखा दिसतो.”

कुहल यांनी या परिस्थितीसाठी साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या सामाजिक वंचिततेला जबाबदार धरले. या साथीच्या रोगाचा किशोरवयीन मुलींना जास्त फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. कारण- मुली परस्परसंवादावर अधिक अवलंबून असतात, असे त्या म्हणाल्या. मुली विशेषतः आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर सतत संवाद साधत असतात. हा समस्यांच्या निराकरणाचा आणि स्वतःला तणावमुक्त करण्याचा त्यांचा एक मार्ग असतो. मात्र, करोना काळात यात अनेक अडथळे आले. साथीच्या आजारादरम्यान किशोरवयीन मुलांचे आरोग्य बिघडल्याचे बरेच पुरावे आहेत. परंतु, या अभ्यासाने करोना काळात मुलांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामाचा आणखी एक पुरावा दिला आहे.

हेही वाचा : ‘या’ राज्यात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी; कारण काय? फटाक्यांमुळे शरीराचे किती नुकसान होते?

इतर संशोधकांनी या निष्कर्षाचे वर्णन धक्कादायक म्हणून केले असले तरी कॉर्टिकल पातळ होणे हे नुकसानीचे लक्षण आहे, असे मानण्यास त्यांनी नकार दिलाय. कॉर्टिकल पातळ होणे ही समस्याच असू शकते, असे नाही. हे परिपक्व बदलाचे लक्षणही असू शकते, असे बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानव विकास संस्थेचे रोनाल्ड ई. डहल यांनी सांगितले. संशोधकांनी १६० मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांसह या अभ्यासाला सुरुवात केली होती. या अभ्यासासाठी २०१८ मध्ये ९ ते १७ वयोगटातील मुलांची पहिली चाचणी घेण्यात आली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ageing of teen girl brains during the pandemic rac