-अनिकेत साठे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरच्या सीमा भागात चिनी सैनिकांशी पुन्हा संघर्ष झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत भारताने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी – ५ या क्षेपणास्त्राची नव्याने चाचणी केली. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता राखणारे हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. मागील १० वर्षांपासून त्याच्या चाचण्या होत आहेत. त्यातून नव्याने समाविष्ट होणारे तंत्रज्ञान, प्रणालीचे प्रमाणीकरण केले जाते. अग्नीची विस्तारणारी मारक क्षमता चीनला व्यूहात्मक दृष्टीने शह देण्यास कामी येणार आहे.

चाचण्यांची श्रृंखला का?

ओडिशाच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) नुकतीच अग्नी – ५ या क्षेपणास्त्राची पुन्हा यशस्वी उड्डाण चाचणी केली. साडेपाच हजार किलोमीटरवर लक्ष्य भेदण्याची त्याची क्षमता आहे. गेल्या वर्षी चीनने ध्वनीहून पाचपट गतीने मार्गक्रमण करणाऱ्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. त्यानंतर भारताने काही महिन्यात (ऑक्टोबर २०२१) अग्नी – ५ ची चाचणी घेतली. नुकत्याच झालेल्या चाचणीत क्षेपणास्त्राची उड्डाण कामगिरी जोखण्यात आली. त्यावरील नव्या तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करण्यात आले. समुद्रात तैनात मालमत्ता, रडार, पल्ला मापन आणि मार्गक्रमणाचा वेध घेणाऱ्या यंत्रणांचे मूल्यमापन करण्यात आले. कोणतेही क्षेपणास्त्र भात्यात समाविष्ट करण्याआधी विविध निकषांवर त्यांची पडताळणी केली जाते. अग्नीच्या चाचण्या हा त्याचाच एक भाग होय.

उद्दिष्ट काय?

अग्नी – ५ च्या चाचणीत क्षेपणास्त्राचे वजन सुमारे २० टक्क्यांनी कमी केल्याचे सांगितले जाते. पोलादाच्या जागी मिश्र धातूचा वापरातून ते साध्य करण्यास संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा सक्षम आहेत. क्षेपणास्त्राचे वजन कमी झाल्यामुळे त्याची मारक क्षमता सात हजार किलोमीटरपर्यंत विस्तारू शकते. अग्नी मालिकेतील अग्नी – ३ या क्षेपणास्त्राचे वजन सुमारे ४० टन आहे. ते ३ हजार किलोमीटरच्या लक्ष्यावर मारा करू शकते. अग्नी – ४ चे वजन २० टनांहून जास्त असून त्याची मारक क्षमता ४ हजार किलोमीटर आहे.

क्षमता किती?

भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या इतिहासात अग्नी – ५ हे सर्वाधिक दूरवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. साडेपाच हजार व त्याहून अधिक किलोमीटर मारक क्षमतेची क्षेपणास्त्रे आंतरखंडीय (आयसीबीएम) म्हणून ओळखली जातात. अग्नी – ५ आणि त्यापुढील आवृत्त्या आठ ते १० हजार किलोमीटर मारक क्षमतेच्या असतील. अग्नी – ५ च्या टप्प्यात बीजिंगसह चीनच्या उत्तरेकडील भाग, जवळपास संपूर्ण अशिया खंड व युरोपातील काही भाग येतो. डीआरडीओने अग्नी – १ आणि २ साठी रस्ता आणि रेल्वेतून डागण्याची यंत्रणा विकसित केलेली आहे. त्यामुळे जलदपणे तैनात करून ते कुठूनही डागता येईल. अग्नी -५ दीड टन ही अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असणारी तीन टप्प्यातील घन इंधनावर आधारित क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्यात एकाच वेळी वेगवेगळ्या १० लक्ष्यांवर अण्वस्त्र आणि स्फोटके डागण्याचे तंत्रज्ञान अंतर्भूत राहील. मार्गदर्शन प्रणाली, इलेक्ट्रॉनिक प्रणालीचे अद्ययावतीकरणामुळे त्याचा माग काढून निष्प्रभ करणे सोपे असणार नाही.  

क्षेपणास्त्रांचा विकास कसा ?

शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली १९८० च्या कालखंडात एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्या अंतर्गत अग्नी क्षेपणास्त्रावर काम सुरू झाले. अग्नी – १ या ८०० किलोमीटर मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्राने सुरू झालेला प्रवास आता अग्नी – ५ द्वारे साडेपाच हजार किलोमीटरवर पोहोचला आहे. अग्नी – २ हे दोन हजार किलोमीटर, अग्नी – ३ अडीच हजार किलोमीटर तर अग्नी – ४ हे चार किलोमीटर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अग्नी – ६ आणि अग्नी – ७ द्वारे आठ ते १० हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याचे नियोजन आहे. अग्नी मालिकेतील १ ते ३ ही क्षेपणास्त्रे सैन्य दलात समाविष्ट झाली आहेत. पुढील आवृत्त्या समाविष्ट करण्यासाठी चाचण्यांची श्रृंखला प्रगतीपथावर आहे.

गरज का?

शेजारील चीनचा विस्तारवादी दृष्टिकोन वारंवार प्रगट होत आहे. चीनच्या भात्यात १५ हजारहून अधिक किलोमीटरवर मारा करणारी डोंगफेंग – ४१ सारखी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत. पाकिस्तानलादेखील तो क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुरवत आहे. आता चीनकडून ध्वनीहून पाच पट अधिक वेगाने मार्गक्रमण करणााऱ्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा विकास होत आहे. विलक्षण गतीमुळे अशा क्षेपणास्त्राचा माग काढण्यास रडार यंत्रणेला मर्यादा येते. चीनची भारतातील कुठल्याही शहरावर क्षेपणास्त्र हल्ल्याची क्षमता आहे. जागतिक पटलावर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची स्पर्धा सुरू आहे. या परिस्थितीत संपूर्ण चीन माऱ्याच्या टप्प्यात आणणे आणि इतरांनाही शह देण्याकरिता अग्नीची मारक क्षमता विस्तारण्याचे धोरण पुढे न्यावे लागणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agni v ballistic missile can target china print exp scsg