AI Boyfriend आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) सध्या सर्वच क्षेत्रात प्रभाव पाहायला मिळत आहे. एआयच्या वाढत्या वापरामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. नवनवीन प्रकारे लोक एआयचा वापर करत आहेत. लोक एआयच्या मदतीने जगणे कसे सोपे करता येईल, या प्रयत्नात आहेत. आता एआय बॉयफ्रेंडचीही संकल्पना सर्वत्र खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. डॅन नावाच्या ‘एआय चॅटबॉट’ची चिनी तरुणींना भुरळ पडल्याचे पाहायला मिळत आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, हे एआय चॅटबॉट संवादात रोमॅंटिक भाषेचादेखील वापर करते. डॅनची निर्मिती कोणी केली? तरुणींना एआय बॉयफ्रेंडची भुरळ का पडत आहे? हे चिंतेचे कारण आहे का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॅनचा निर्मिती अमेरिकन विद्यार्थी वॉकरने केली आहे. त्याला ‘रेडिट’ या कम्युनिटी नेटवर्क वेबसाईटवरून ही कल्पना सुचली. या साईटवर वापरकर्त्यांनी चॅट जीपीटीच्या वापराविषयी आपापल्या कल्पना सुचविल्या होत्या. गेल्या डिसेंबरमध्ये ‘रेडिट’वर वॉकरने डॅनला कसे तयार करायचे, याची माहिती पोस्ट केली होती. वॉकरने केलेल्या महितीचा वापर करून अनेकांनी वेगवेगळे व्हर्जन तयार केले. वास्तविक जगामध्ये डेटिंगच्या वाईट अनुभवांमुळे निराश असलेल्या तरुणींमध्ये याची लोकप्रियता वाढली. विशेषतः चिनी तरुणींमध्ये.

डॅन नावाच्या ‘एआय चॅटबोट’ची चिनी तरुणींना भुरळ पडल्याचे पहायला मिळत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?

चिनी तरुणी एआय बॉयफ्रेंड का निवडत आहेत?

चीनमध्ये एआय बॉयफ्रेंड ही नवीन गोष्ट नाही. ‘ग्लो’, ‘वाँटॉक’ आणि ‘वेइबान’सारख्या ॲप्सवर तरुणींना एआय बॉयफ्रेंड मिळतात. हे ॲप्स तरुणांमध्ये लोकप्रिय झाली आहेत, विशेषत: बीजिंग आणि शिआनसारख्या व्यग्र शहरांमध्ये. या शहरांमध्ये व्यस्त जीवनशैलीमुळे नातेसंबंधांसाठी फारसा वेळ देता येत नाही. एआय बॉयफ्रेंडबरोबर संवाद साधल्यानंतर आपण एका रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये असल्याची जाणीव तरुणींना होते, असे स्वतः वापरकर्त्या तरुणींनी सांगितले आहे.

तुफेई नावाच्या २५ वर्षीय तरुणीने ग्लो ॲपवरील तिच्या एआय बॉयफ्रेंडबद्दल समाधान व्यक्त केले आणि सांगितले की त्याला तरुणींविषयी सहानुभूती आहे आणि तरुणींशी कसे बोलायचे याची समज आहे. तो कठीण प्रसंगात आपल्याला धीर देतो आणि तासनतास आपल्याशी बोलतो. तरुण दररोज हजारोच्या संख्येने ग्लो ॲप डाउनलोड करीत आहेत. या ॲपद्वारे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिकृत संवाद साधता येतो.

दुसरी वापरकर्ती तरुणी लिसा आणि डॅन दररोज किमान ३० मिनिटे संवाद साधतात, यात हा एआय चॅटबॉट ‘फ्लर्ट’ही करतो. लिसाचा दावा आहे की डॅनची समजून घेण्याची आणि भावनिक आधार देण्याची क्षमता तिला त्याच्याकडे आकर्षित करते. “जोपर्यंत ती आनंदी आहे तोपर्यंत मीही आनंदी आहे,” असे सांगून तिच्या आईनेही त्यांचे हे नाते स्वीकारले आहे, हे एक आश्चर्यच. खरोखर एका नात्यात असल्याप्रमाणे लिसा आणि डॅनमध्ये वादही होतात. या पर्यायामुळे अनेकांचे संसार मोडल्याचेही सांगितले जात आहे. परंतु, एआय बॉयफ्रेंडमधले तरुणींचे वेड दिवसेंदिवस वाढत आहे.

हे चिंतेचे कारण आहे का?

डॅन सारख्या एआय बॉयफ्रेंडची संकल्पनेचा सांसारीक जीवनावर परिणाम होऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनीचे सहायक प्राध्यापक लियू टिंगटिंग यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की चीनमधील एआय बॉयफ्रेंडची क्रेझ महिलांचा आदर आणि भावनिक समर्थनाच्या इच्छेमुळे उद्भवते. बहुतेकदा वास्तविक जीवनातील नातेसंबंधात तरुणींना तो आदर मिळत नाही. या पर्यायामुळे चिनी तरुणी डेटिंग किंवा लग्नाला नकार देत आहेत. त्यांच्यात डॅन सारखा एआय साथीदार योग्य असल्याची भावना निर्माण होऊ लागली आहे.

हेही वाचा : ‘या’ देशात गाईंच्या ‘ढेकर’वर आकारला जायचा कर; ढेकरवर कर का लावावा लागला? आता हा निर्णय मागे का घेण्यात आला?

विशेष म्हणजे तज्ज्ञ वापरकर्त्याच्या गोपनीयतेविषयी चिंता व्यक्त करतात. बीबीसीशी बोलताना कार्नेगी मेलॉन विद्यापीठातील मानव-संगणक संवाद संस्थेतील सहाय्यक संशोधन प्राध्यापक हाँग शेन मानव आणि एआय यांच्यात अशा वेबसाईट आणि ॲपच्या मदतीने साधल्या जाणार्‍या संवादाविषयी चिंता व्यक्त करतता. अशा प्रकारच्या संवादामुळे संवेदनशील माहिती अनवधानाने लीक होऊ शकते, असे त्यांचे सांगणे आहे. परंतु या चिंता असूनही, डॅनसारख्या एआय बॉयफ्रेंडची लोकप्रियता वाढतच आहे. २४ वर्षीय मिनरुई झी सारख्या तरुणींनी डॅनबरोबरची प्रेमकथाही लिहिली आहे, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ai boyfriend on chat gpt is popular rac